मे महिना सुरू झालाय. प्रचंड उकाडा पण हवा थोडी कुंद. मोहा गावातल्या हजरत सय्यद अलवी (रहमतुल्ला अलैहि) दर्ग्यात लोकांची वर्दळ सुरू आहे. चाळीस एक कुटुंबांच्या कंदुऱ्या सुरू आहेत. त्यातही मुस्लिम कमी, हिंदूच जास्त. तावरज खेड्याच्या ढोबळे परिवाराची दर वर्षी इथे कंदुरी असतेच. आज आम्ही त्यांचे पाहुणे होतो. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या या २०० वर्षांहून जुन्या दर्ग्यात चांगलीच लगबग सुरू होती.
शेतीची कामं उन्हाळ्यात जराशी कमी असल्याने, लोकांना थोडी उसंत असते. आणि तेव्हाच मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात, खास करून उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांमधले दर्गे लोकांनी फुलून गेलेले असतात. गुरुवार आणि रविवार या दोन दिवशी लोक आपापल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत मोठ्या संख्येने इथे येतात. बकरे चढवून मटणाचा ‘निवद’ दाखवायचा, पीर पूजायचा, एकत्र जेवायचं आणि जेवू घालायचं. अशा कंदुऱ्या जागोजागी होत असतात.
“किती तरी पिढ्यांपासून आम्ही हे करतोय,” साठीच्या भागीरथी कदम म्हणजे आमची भागा मावशी सांगते. ती उस्मानाबादच्या येडशीत राहते. मराठवाड्यात ६०० हून अधिक वर्षं मुस्लिम राजवट होती. त्यातही २२४ वर्षं हा प्रांत हैद्राबाद संस्थानात निजामाच्या अंमलाखाली होता. इस्लाम इथे परका नाही. धर्माच्या भिंतीपल्याड जात दर्गे आणि पीर लोकांच्या श्रद्धेत आणि उपासनेत मिसळून गेले आहेत.
“आम्ही गडाला म्हणजे गड देवदरीला जातो. खेड्याची लोकं इथे मोहाला येतात. आणि तुमच्या गावचे (बोरगाव बु., जि. लातूर) तिथे शेऱ्याला जातात,” भागा मावशी सांगते. कधी काळी प्रत्येक दर्ग्याला काही गावं वाटून दिली गेली आणि आजही ती परंपरा अखंड सुरू आहे.
इथे मोहाच्या दर्ग्यामध्ये प्रत्येक झाडाखाली, पत्र्याच्या किंवा ताडपत्रीच्या सावलीत लोकांनी चुली मांडल्या आहेत. आणि त्यावर निवदाचा स्वयंपाक सुरू आहे. मटण शिजेपर्यंत बाया भाकरी करतायत. कुठे गडी आणि बाया आपापसात गप्पा मारत बसले आहेत. मुलांचा गोंधळ आणि दंगा सुरू आहे. हवेत गरमा असला तरी पश्चिमेकडे ढग येऊ लागल्यामुळे जरासं झाकोळून आलंय आणि उन्हाचा चटका जरासा कमी झालाय. दर्ग्यात आत आल्यावर दोन्ही बाजूला असणारी चिंचेची झाडंदेखील गार सावली देतायत. दर्ग्यात आतमध्ये एक दगडात बांधलेली ९० फूट खोल बारव आहे. आता पाण्याने तळ गाठला असला तरी “पावसाळ्यात वरपर्यंत पाणी भरतं,” तिथे आलेले एक काका मला सांगतात.




















