झारखंडच्या चेचरिया गावातल्या सविता देवीच्या घरच्या मातीच्या भिंतीवर बाबासाहेबांची तसबीर घरावर लक्ष ठेवत असल्यासारखी भासते. “बाबासाहेबांनी आम्हाला [मतदानाचा हक्क] दिलाय, आणि म्हणून आम्ही मत देतोय,” सविता देवी म्हणते.
आपल्या एक बिघा (पाऊण एकर) जमिनीत ती खरिपात भात आणि मका घेतात आणि रब्बीला गहू, हरभरा आणि तेलबिया. आपल्या परसात काही भाजीपाला करावा असाही तिचा विचार होता. “पण गेल्या दोन वर्षांपासून, पाणीच नाहीये,” ती म्हणते. सलग दोन वर्षं दुष्काळ पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर आता कर्ज झालं आहे.
बत्तीस वर्षीय सविता देवी पलामू जिल्ह्यातल्या या गावी आपल्या चार मुलांसोबत राहते. तिचा नवरा, प्रमोद राम इथून २,००० किलोमीटर दूर बंगळुरूमध्ये कामाला गेला आहे. “सरकार काही आम्हाला नोकऱ्या देत नाहीये,” रोजंदारीवर काम करणारी सविता देवी म्हणते. “मुलांचं कसंबसं पोट भरतंय.”
प्रमोद बांधकामावर काम करतो आणि महिन्याला त्याला १०,००० ते १२,००० रुपये मिळतात. कधी कधी तो ट्रकवर चालक म्हणून काम करतो. पण हे काम वर्षभर मिळत नाही. “घरची माणसं चार चार महिने घरी बसून राहिली तर आमच्यावर मागून खायची वेळ येईल. [स्थलांतर सोडून] दुसरा काय पर्याय आहे?” सविता विचारते.
चेचरिया गावाची लोकसंख्या ९६० (जनगणना, २०११). इथले बहुतेक सगळे जण कामाच्या शोधात गाव सोडून जातात कारण “इथे कामच नाहीये. इथेच नोकऱ्या मिळाल्या असत्या तर आम्ही बाहेर का बरं जाऊ?” सविता देवीच्या ६० वर्षीय सासूबाई सुरपाती देवी विचारतात.












