मी गेलो तो चौथा दिवस होता. आणि मी पोचेपर्यंत दुपार झाली होती.
चेन्नई ते वायनाडच्या प्रवासात अनेक भागात स्वयंसेवकांची गर्दी झालेली दिसत होती. बस वगैरे काहीच वाहनं नाहीत. अनोळखी लोकांना विनंती करून मला त्यांच्यासोबत प्रवास करावा लागला.
एका पाठोपाठ रुग्णवाहिकांची ये-जा सुरू असल्याने जणू काही युद्धभूमीवर आल्यासारखं वाटत होतं. लोक मृतदेहांचा शोध घेत होते. त्यासाठी मोठमोठाली अवजारं आणि यंत्रं कामाला लागली होती. चूरमाला, अट्टामला आणि मुंडक्कई ही नगरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. इथे वस्तीच्या, निवारा असेल अशी एकही खूण उरली नव्हती. इथल्या रहिवाशांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. आपल्या जिवलगांचे मृतदेह त्यांना ओळखू देखील येत नव्हते.
नदीकिनारी शव आणि राडारोडा पसरलेला होता. त्यामुळे मृतदेह शोधणारे सगळेच काठीचा आधार घेत नदीच्या काठाने फिरत होते. त्या मलब्यात पाय रुतू नये यासाठी सगळी धडपड सुरू होती. माझा पाय मात्र रुतला. मृतदेहांची ओळख पटवणं अशक्यप्राय होतं. काही अवशेष इथे तिथे विखुरले होते. निसर्गाशी माझं फोर खोल असं नातं आहे. पण हा अनुभव माझ्यासाठी भयानक होता.
भाषेचा अडसर असल्याने मी झालेला विध्वंस केवळ पाहू शकत होतो. मी तिथल्या कुणालाही कसलीही तसदी दिली नाही. मी लवकर येणार होतो पण तब्येतीच्या कारणाने येऊ शकलो नाही.
पाण्याचा प्रवाह जात होतो त्याच्यासोबत मी देखील तीनेक किलोमीटर चालत गेलो. घरं जमिनीत गाडलेली दिसत होती. काहींची निशाणी देखील उरली नव्हती. सगळीकडे सेवाभावी कार्यकर्ते मृतदेहांचा शोध घेत होते. सैन्यदलही अथकपणे शोधकाम करत होतं. सगळे जण एकमेकांच्या साथीने काम करत होते. एकमेकांना खाणं-पाणी देत देत आशा न सोडता काम सुरू होतं. त्यांच्यातल्या एकजुटीचं मला खरंच आश्चर्य वाटत होतं.































