अगदी झिजलेल्या चपलासुद्धा कष्टकरी जिवापाड जपतात. माल लादणाऱ्या आणि उतरवणाऱ्या माथाड्यांच्या चपलांना खड्डे पडलेले असतात आणि त्या आतून झिजलेल्या असतात. एखाद्या लाकूडतोड्याच्या चपलेत काटे सापडणारच. माझ्या स्वतःच्या स्लिपर मी कितीदा तरी काटापिन लावून वापरल्या आहेत.
देशभर इथेतिथे फिरत असताना मी लोकांच्या चपलांचे फोटो काढलेत. आणि त्या फोटोंमधून त्या चपलांमागच्या कहाण्या शोधण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्या गोष्टी शोधत असतानाच माझा स्वतःचा प्रवास सुद्धा कुठे तरी मला सापडत गेलाय.
इतक्यात कधी तरी मी ओडिशाच्या जाजपूरला गेलो होतो कामानिमित्त. तिथे बाराबंकी आणि पुराणमंतिरा या गावांना जायची संधी मिळाली. आम्ही जिथे कुठे जायचो तिथे आदिवासी मंडळी जमलेली असायची त्या खोलीबाहेर पायताणं अगदी ओळीने मांडून ठेवलेली असायची.
सुरुवातीला माझं फारसं काही लक्ष नव्हतं. पण तीन दिवसांनंतर मात्र त्या झिजलेल्या, विटलेल्या चपलांकडे माझं लक्ष जायला लागलं. काहींना अगदी भोकं पडलेली होती.
























