“मिरची में आग लग गई.”
२ डिसेंबर १९८४ ची रात्र. भोपाळमध्ये राहणारी नुसरत जहाँ श्वास कोंडून जागी झाली. डोळ्याची प्रचंड आग होत होती आणि पाणी यायला लागलं होतं. तिचं सह वर्षांचं मूल रडायला लागलं. त्या आवाजाने तिचा नवरा मुहम्मद शफीक जागा झाला.
“कयामत का मंज़र था,” आता सत्तरीचे असलेले शफीक चाचा सांगतात. नवाब कॉलनीमधल्या त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो. मध्य प्रदेशाच्या राजधानीवर आलेल्या भोपाळ वायू दुर्घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आपत्तीच्या आठवणी ते सांगत होते. आज त्या घटनेला ४० वर्षं पूर्ण होतायत.
एका कागदाच्या कारखान्यात शफीक चाचा रोजंदारीवर काम करत होते. त्या दुर्घटनेनंतरची अनेक वर्षं या विषारी वायूमुळे झालेले परिणाम त्यांनी भोगले, त्यावर उपचार घेण्यासाठी इथे तिथे खेटा मारल्या. पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या त्यांच्या विहिरीचं पाणी दूषित होतं आणि १८ वर्षं ते तेच पाणी वापरत होते. त्यानेही परिस्थिती अधिक वाईट झाली. पाण्याने डोळे चुरचुरायचे, ते सांगतात. पण तेवढा एकच स्रोत होता. २०१२ साली संभावना क्लिनिकने पाण्याची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये विषारी घटक असल्याचं समजलं. त्यानंतर त्या परिसरातल्या बोअरवेल सरकारने बंद केल्या होत्या.
१९८४ च्या त्या काळरात्री शफीक चाचा आणि इतर हजारो लोकांच्या घरात जो विषारी वायू शिरला तो युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड (यूसीआयएल) या कंपनीतून आला होता. तेव्हा या कंपनीची मालकी युनियम कार्बाईड कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीकडे होती. २ डिसेंबरच्या रात्री वायुगळती झाली. अत्यंत विषारी असलेल्या मेथिल आयसोसायनाइटची यूसीआयएलच्या कारखान्यातून गळती सुरू झाली. जगभरातल्या औद्योगिक आपत्तींमधली सर्वात भयानक आपत्ती त्यानंतर अवतरली.











