“पानी ले लो! पानी!”
थांबा. पाण्याची भांडी आणि बादल्या काढू नका इतक्यात. कारण पाणी घेऊन येणारा हा टँकर जरा लहानच आहे म्हणायचा. प्लास्टिकची बाटली, एक जुनी रबराची चप्पल, प्लास्टिकच्या पाईपचा एक छोटासा तुकडा आणि काड्यांनी बनवलेल्या या टँकरमध्ये जास्तीत जास्त ग्लासभर पाणी बसेल.
बलवीर सिंग, भवानी सिंग, कैलाश कंवर आणि मोती सिंग यांची ही निर्मिती. सांवता गावातल्या या टोळीतला सगळ्यांची वयं ५ वर्षं आणि ते १३ वर्षं. राजस्थानच्या अगदी पूर्वेकडच्या भागातल्या त्यांच्या गावात आठवड्यातून दोनदा पाण्याचा टँकर येतो. आणि तो आला की घरच्या सगळ्यांना असा काही आनंद होतो की ते पाहून त्यांनी त्यांचा हा खेळण्यातला टँकर तयार केला.








