“घरात साठवलेल्या कापसाचा रंग आणि वजन कमी होतंय. जेवढा रंग फिकट तेवढीच कमी किंमत आम्हाला मिळते,” असं चिंतित असलेले संदीप यादव सांगतात. ते मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील गोगाव तालुक्यात कपाशीचं पीक घेणारे शेतकरी आहेत. त्यांच्या मालासाठी ऑक्टोबर २०२२ पासून योग्य भाव मिळेल म्हणून ते वाट बघत आहेत.
कपाशीची लागवड खरगोन मध्ये २.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मध्य प्रदेशात इतर कोणत्याही जिल्ह्यात इतकी कपास होत नाही. पिकाची लागवड दरवर्षी मेमध्ये करण्यात येते तर ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत कापूस वेचायला येतो. ऑक्टोबर ते मे या आठ महिन्याच्या कालावधीत खरगोनच्या कपास बाजारपेठेत दररोज साधारण रू. ६ कोटींच्या कापसाची खरेदी केली जाते. मध्य प्रदेशच्या बेहरामपुरा गावातील आपल्या १८ एकर पैकी १० एकर जमिनीवर संदीप कपाशीचे पीक घेतो.
ऑक्टोबर २०२२ मध्ये साधारण ३० क्विंटल कपास झाली तेव्हा संदीप खूष होता. त्याच्या रानातली या मोसमातील पहिली वेचणी होती. त्याचा अंदाज होता की दुसर्या वेचणीतही त्याला इतकीच कपास होईल आणि खरंच २६ क्विंटल माल झाला.
काही दिवस गेले. पण संदीप त्याचा ३० क्विंटल कापूस खरगोनच्या बाजारपेठेत विकू शकला नाही. कारण व्यापार्यांनी संप पुकारल्याने मध्य प्रदेशातील सर्व बाजारपेठा ११ ऑक्टोबर पासून बंद होत्या. व्यापार्यांची मागणी होती की मंडी कर कमी केला जावा. हा कर १०० रूपयांच्या व्यवहारावर १.७० रुपये एवढा आहे. आणि हा अख्ख्या देशात सर्वात जास्त आहे. संप आठ दिवस चालला.
संप चालू होण्याआधी खरगोन कपाशी बाजारपेठेत उत्पादनाला भाव रू.८,७४० एवढा होता पण संप संपल्यावर तो रू. ८९० ने घटून रू. ७,८५० एवढा झाला. बाजारपेठा जेंव्हा १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा उघडल्या तेव्हा संदीपने त्याचा माल विकला नाही कारण किमती घसरल्या होत्या. “मी जर आता कपास विकली तर मला त्यात काहीच नफा होणार नाही,” असे ३४ वर्षांचा हा शेतकरी पारीशी ऑक्टोबर २०२२ मध्ये बोलताना म्हणाला होता.








