पारी वाचनालयासाठी २०२४ हे वर्ष अगदी विशेष होतं. या वर्षी आमच्या वाचनालयामध्ये आजवरच्या तुलनेत सर्वाधिक पुस्तकं आणि इतर अहवाल दाखल झाले. यामध्ये कायदे, नवी-जुनी पुस्तकं, जाहीरनामे, विवेचनात्मक निबंध, लेखसंग्रह, संदर्भसूची, शासकीय अहवाल, पत्रकं, सर्वेक्षण अहवाल आणि लेख अशा विविध संसाधनांचा समावेश होता.
आमच्या उच्चांकापलिकडे इतर काही उच्चांक मोडले जात होते. २०२४ हे आजवरचं सर्वाधिक तापमान असलेलं वर्ष म्हणून नोंदवलं गेलं आहे. याआधी २०२३ या वर्षाने हा ‘मान’ पटकावला होता. बदलत्या वातावरणामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर विपरित परिणाम व्हायला लागले आहेत. या प्रजातींमधली दर पाचातली एक विलुप्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पक्ष्यांप्रमाणेच भारतातल्या स्पांग, झील, सरोवर, तलाव, ताल, कोला, बिल आणि चेवुरु अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाणथळ जागाही आता धोक्यात आल्या आहेत.
प्रदूषण आणि उष्णतेचा जवळचा संबंध आहे हे आता सिद्ध झालं आहे. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये कणद्रव्य किंवा धूलिकण, धूरकणांमुळे झालेलं हवेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं होतं. भारतात या कणद्रव्यांचं प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे घनमीटरमागे ५४.४ मायक्रोग्राम इतकं नोंदवलं गेलं. नवी दिल्ली मध्ये तर हे प्रमाण १०२.१ मायक्रोग्राम इतकं वाईट झालं आणि त्यातून एक हास्यफीत तयार झाली. ॲपआधारित सेवा पुरवणाऱ्या एका कामगाराचे अनुभव आपण त्यात वाचू-पाहू शकतो.







