“सर्वात पहिल्यांदा मला हंगुल दिसला तेव्हा मी इतका भारावून गेलो की माझं पाऊलच तिथून हलेना,” शाबिर हुसैन भट सांगतो. काश्मीरमध्येच दिसणाऱ्या आणि आता विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या काळविटासारख्या प्राण्याचं (Cervus elaphus hanglu) दर्शन व्हावं म्हणून तो पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत राहिला.
आज वीस वर्षांनंतरही काश्मीरमधल्या या १४१ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या अभयारण्यातल्या पशु-पक्षी आणि झाडझाडोऱ्याचं त्याचं वेड बिलकुल कमी झालेलं नाही. “त्या हंगुलने माझ्यात काही तरी चेतवलं. आणि हो हिमालयी अस्वलानेसुद्धा.”
या अभयारण्यात त्याची ओळख ‘दाचिगमचा विश्वकोष’ अशीच आहे. “आजवर मी झाडांच्या ४०० प्रजाती, पक्ष्यांच्या २०० हून अधिक आणि या भागात आढळणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या प्रजाती ओळखल्या आहेत,” तो सांगतो. या अभयारण्यात कस्तुरीमृग, हिमालयातलं तपकिरी अस्वल, हिमबिबट्या आणि सुवर्णगरूडसुद्धा आढळतात.
















