आपल्या रानातल्या मोजक्या एरंडी पाहिल्या की नारायण गायकवाडांना त्यांच्या कोल्हापुरी चपलांची याद येते. शेवटची चप्पल वापरून २० वर्षं झाली असतील. “आम्ही कोल्हापुरी चपलेला एरंडीचं तेल चोळायचो. जास्त दिवस टिकायला,” ७७ वर्षांचे नारायण बापू सांगतात. इथल्या जगप्रसिद्ध चपला आणि एरंडीचं काय नातं आहे ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत जातं.
कोल्हापूर जिल्ह्यात एरंडीच्या तेलाचा मुख्य उपयोग म्हणजे कोल्हापुरी चपलांची मालिश. गुरांच्या चामड्यापासून बनवण्यात येणाऱ्या या चपला मऊ व्हाव्यात आणि त्यांचा आकार बिघडू नये म्हणून एरंडीचं तेल चोळलं जायचं. आणि अशी मालिश केली की मग किती तरी वर्षं चपला अगदी मऊसूत रहायच्या.
खरं तर एरंड (Ricinus communis) हे काही कोल्हापुरातलं स्थानिक पीक नाही. तरीही या भागात त्याची लागवड केली जायची. बारीक देठ आणि चमकदार हिरवी पानं असलेला एरंड वर्षभर कधीही लावता येतो. जगभराचा विचार केला तर भारतात या तेलबियांचं सर्वात जास्त उत्पादन होतं. २०२०-२१ साली १६.५ लाख टन इतकं उत्पादन झाल्याची नोंद आहे. भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळ नाडू, ओडिशा आणि राजस्थान या राज्यात एरंडीचं पीक जास्त घेतलं जातं.
“माझे वडील ९६ वर्षं जगले आणि त्यांनी दर वर्षी एरंडी लावल्या,” बापू सांगतात. आपल्या वडलांची ही परंपरा पुढे चालवत तेही आपल्या सव्वा तीन एकरात दर वर्षी एरंडी लावत आले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार त्यांच्या घरात गेली १५० वर्षं एरंडीचं पीक घेण्याची परंपरा सुरू आहे. “आम्ही एरंडीचं हे देशी वाण जतन केलंय. शंभरेक वर्षं जुनं असणार बघ,” बापू सांगतात. वर्तमानपत्रात त्यांनी या बिया नीट जपून ठेवल्या आहेत. “फक्त मी आणि बायको शेवकीण.”
वर्षभर कधीही एरंडी लावता येत असल्या तरी शक्यतो जून महिन्यात लागवड केली जाते आणि चार महिन्यांनंतर बिया तयार असतात. नारायण बापू आणि त्यांच्या पत्नी कुसुम काकी रानातल्या एरंडीपासून घरीच तेल काढतात. त्यांच्या भागात तेलाच्या अनेक मिल झाल्या असल्या तरी ते मात्र आजही हातानेच तेल गाळतात. कितीही वेळ लागला आणि मेहनत घ्यावी लागली तरी. “पूर्वीच्या काळी आम्ही दर तीन महिन्याला तेल काढत होतो,” बापू सांगतात.



















