“कोलकाता, जयपूर, दिल्ली किंवा बॉम्बे, बांबूचे पोलो बॉल इथून देउलपूरहूनच जायचे,” रणजीतबाबू माल सांगतात. भारतात कुठे कुठे पोलो खेळलं जायचं त्या शहरांची यादीच ते देतात.
पश्चिम बंगालच्या देउलपूर या शहरातले ७१ वर्षीय रणजीतबाबू गेली चाळीस वर्षं गुआदुआ बांबूच्या मूलस्तंभापासून पोलोचे चेंडू तयार करतायत. या मुळांना इथे बंगाली भाषेत बान्सेर घोड़ा असं म्हणतात. या मुळांच्या आधारेच बांबू मजबूत वाढतो आणि पसरतो. आज अशा पद्धतीने बांबूच्या मुळापासून चेंडू बनवणारे ते शेवटचे ‘शिल्पकार’ म्हणजे कारागीर असून त्यांच्या सांगण्यानुसार ही कला काळाच्या पडद्याआड गेली आहे.
पण पोलो हा खेळ खेळला जात होता त्या १६० वर्षांच्या काळात हे बांबूचे चेंडू फक्त देउलपूरहमध्येच बनत होते. सुरुवातीला सैन्यदल आणि राजेरजवाड्यांमध्येच हा क्रीडाप्रकार खेळला जात होता. गंमत म्हणजे जगातलं पहिलं पोलो क्लब १८५९ साली आसामच्या सिलचरमध्ये सुरू करण्यात आलं आणि दुसरं १८६३ साली कोलकात्यात. आज खेळला जाणारा पोलो हा खेळ खरं तर मैतेइ समुदायाच्या सागोल कांग्जेई या खेळाची नवी आवृत्ती. आणि मैतेई लोक हा खेळ बांबूच्या चेंडूंनी खेळायचे.
१९४० च्या आसपास देऊलपूर गावामध्ये सहा-सात कुटुंबांच्या हाताखाली एकूण १२५ कारागीर हे काम करत होते आणि दर वर्षी जवळपास एक लाखांहून अधिक चेंडू तयार होत होते. “आमच्या कुशल शिल्पकारांना पोलोची बाजारपेठ कळायची,” रणजीतबाबू म्हणतात. हावडा जिल्ह्याच्या सर्वे अँड सेटलमेंट रिपोर्ट या इंग्रजकालीन अहवालातील नोंदी त्यांच्या बोलण्याला दुजोरा देणाऱ्या आहेतः “भारतामध्ये केवळ देउलपूर या गावीच पोलो चेंडू तयार होतात असं दिसून येतं.”
रणजीतबाबूंची पत्नी मिनोतीदी सांगतात की “पोलो चेंडू तयार करण्याचा व्यवसाय इथे इतका भरभराटीत होती की माझ्या वडलांनी मी केवळ १४ वर्षांची असताना माझं इथे लग्न करून दिलं.” आत साठी पार केलेल्या मिनोतीदी अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत या कामात हातभार लावत असत. हे कुटुंब माल समाजाचं असून पश्चिम बंगालमध्ये त्यांची नोंद अनुसूचित जातींमध्ये करण्यात येते. रणजीतबाबूंचं अख्खं आयुष्य देउलपूरमध्येच गेलं आहे.
आम्ही त्यांच्या घरी होतो. माडुर गवताच्या चटईवर बसून रणजीतबाबू जुन्या वर्तमानपत्रातली आणि मासिकातली कात्रणं चाळत होते. “जर लुंगी घातलेला कुणी तुम्हाला पोलो बॉल तयार करतानाचा फोटो मिळाला तर तो खात्रीने मीच असणार,” ते अगदी अभिमानाने मला सांगतात.














