सकाळचे ९ वाजलेत. शनिवार-रविवारचा मुहूर्त साधून धमाल क्रिकेट खेळायला आलेल्या बच्चे कंपनीनी आझाद मैदान फुलून आलंय. खेळ रंगात आला की मधूनच हुर्यो आणि शिट्ट्या कानावर येतायत.
हे सामने सुरू आहेत तिथून मोजक्या ५० मीटर अंतरावर एक वेगळाच ‘खेळ’ सुरू आहे. ५,००० जणांची ही टीम मूकपणे आपला डाव टाकून बसलीये. हे काही खेळाडू नाहीत. गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी धरणं धरून बसलेल्या या राज्यभरातल्या आशा कार्यकर्त्या आहेत. ९ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पहिल्याच आठवड्यात किमान ५० आंदोलक महिलांना तब्येत ढासळल्यामुळे दवाखान्यात दाखल करावं लागलं आहे.
समोर गोंधळगर्दी असलेला रस्ता. तिशीची एक आशा तिथेच जमिनीवर बसते. चिंतातुर होत आजूबाजूला नजर टाकत ती लोकांच्या नजरा टाळायचा प्रयत्न करतीये. काही महिला तिच्या भोवती गोळा होतात. ओढणी आणि चादर घेऊन आडोसा तयार करतात आणि ती आशाताई पटकन कपडे बदलून घेते.
माथ्यावरचा सूर्य आग ओकत असतो. जेवायची वेळ होते. काही आशा आपलीच सहकारी रिटा चावरेभोवती गोळा होतात. कुणाच्या हातात रिकामे डबे, रिकाम्या ताटल्या किंवा नुसती झाकणं. ४७ वर्षीय रिटाताई घरनं खाणं बनवून घेऊन आलीये. ती आलेल्या प्रत्येकीला जेवण वाढते. “इथे आंदोलन करणाऱ्या ८० ते १०० आशांना मी जेवण देऊ शकतीये,” ती म्हणते. ठाणे जिल्ह्याच्या तिसगावहून रोज दोन तास प्रवास करत रिटाताई आझाद मैदानात येते. सोबत १७ आशा कार्यकर्त्या असतात.
“आम्ही आळीपाळीने डबा घेतोय, जेणेकरून कुणीच भुकेलं रोहू नये. पण आता आमची तब्येत बिघडायला लागलीये. आणि आता थकून गेलोय आम्ही,” ती सांगते. फेब्रुवारी महिना संपता संपता आम्ही त्यांच्याशी बोलत होतो.



















