“पश्मिना शालीला जी रेशमी चमक येते ना, ती आमच्यामुळे.”
अब्दुल माजिद लोन यांच्या घरात जिथे तिथे धागे आणि दोरे पडलेले दिसतायत. श्रीनगरच्या आपल्या घरी जमिनीवर बसलेले लोन हातातल्या वुत्सने पश्मिना शालीवरचे धागे काढून टाकतायत. शाल अगदी आताच विणून झालीये. “अशीही काही कला आहे हेच फार कुणाला माहित नाहीये,” ते सांगतात.
४२ वर्षीय लोन श्रीनगर जिल्ह्याच्या नवा कदल गावी राहतात. भारी किंमतीच्या पश्मिना शालींवर येणारे लोकरीचे धागे ते वुत्स नावाच्या एका उपकरणाऱ्या मदतीने हाताने काढून टाकतात. या कामाला पुरझगारी असं म्हणतात आणि एकट्या श्रीनगरमध्ये हे काम करणारे किमान २०० लोक आहेत. लोन गेल्या २० वर्षांपासून पुरझगार म्हणून काम करतायत आणि आठ तासांच्या कामाचे त्यांना २०० रुपये मिळतात.
हरतऱ्हेच्या पश्मिना शालींवरचे धागे असे हातानेच काढून टाकले जातात. मग शाल विणलेली, रंगवलेली किंवा भरतकाम केलेली असली, तरी. या शालीची लोकर इतकी नाजूक असते की कारागीर ज्या हलक्या हाताने काम करतात तसं कुठल्याही यंत्रावर होणं केवळ अशक्य.
वुत्सशिवाय पुरझगारी होणं केवळ अशक्य. “आमची सगळी कमाई वुत्सवर आणि तो चांगला आहे का नाही यावर अवलंबून असते,” लोन सांगतात. त्यांच्या समोरच्या लाकडी मागावर एक लोकरी शाल ताणून बसवलेली दिसते आणि ते त्या शालीकडे अगदी बारकाईने पाहत असतात. “या वुत्सशिवाय आम्हाला पश्मिना शालीवर असं सफाईने काम करणं शक्य नाही.”














