जूनचा महिना आणि त्यानंतरचे पावसाळ्याचे महिने म्हणजे सुनंदा सुपेंच्या पोटात गोळा येतो. याच काळात मोठ्या शंखांसारख्या दिसणाऱ्या मोठ्या गोगलगायी दारकवाडीतल्या त्यांच्या एकरभर शेतात नुसता उच्छाद मांडतात.
“काही पण पेरा, त्या खातात – साळी, सोयाबीन, भुईमूग, काळा घेवडा, राजमा, काही पण,” त्या सांगतात. फळं पण सोडत नाहीत. आंबा, चिक्कू, पपई आणि पेरूसुद्धा त्यांच्या तडाख्यातून वाचत नाहीत. “हजाराच्या संख्येत दिसतात त्या गोगलगायी,” ४२ वर्षीय सुनंदाताई सांगतात. त्या शेती करतात.
सुनंदाताई महादेव कोळी आहेत आणि या समाजाची नोंद महाराष्ट्रात आदिवासी म्हणून केली आहे. त्या चासकमान धरणाशेजारीच आपली आई आणि भावासोबत राहतात. त्यांचं घर धरणाच्या अल्याड तर शेत पल्याड आहे. त्यामुळे त्यांना शेतात जायचं तर नावेने जायला लागतं. यायला-जायला प्रत्येकी अर्धा तास लागतो.
या गोगलगायींना इंग्रजीत जायंट आफ्रिकन स्नेल (Achatina fulica) असं म्हणतात. भारतात त्यांचा समावेश आक्रमक प्रजातींमध्ये केला जातो असं ग्लोबल इनव्हेजिव्ह स्पीशीज डेटाबेस नमूद करतो. ते विविध प्रकारच्या पिकांचा फडशा पाडतात. पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळात या मोठ्या गोगलगायी तिवई डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतांवर हल्ला करतात. त्या कधी कधी सप्टेंबरनंतरसुद्धा शेतात राहतात. २०२२ साली सुनंदाताईंची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गेल्या तीन वर्षांपासून त्यांना गोगलगायींचा त्रास सहन करावा लागतोय.












