अल्युमिनियमच्या एका मोठ्या भगुल्यातली बटाटा-वाटाण्याची भाजी ढवळायचं काम चालू आहे. प्रकाश भगत शरीराचा भार डाव्या पायावर देतात, उजवा पाय हवेत उचलला गेलाय. तोल सांभाळण्यासाठी लाकडाच्या काठीचा आधार आहे.
“मला वाटतं मी १० वर्षांचा असल्यापासून काठी घेऊनच चालतोय,” ५२ वर्षीय भगत सांगतात. “मी लहान होतो ना तेव्हापासून पाय उचलूनच चालावं लागतंय मला. माझे आई-वडील सांगायचे, की कुठली तर नस ओढली गेली होती.”
अपंगत्व असलं तरी भगत यांचा निर्धार मात्र ठाम आहे. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातल्या त्यांच्या पारगावमधून दिल्लीला जाणाऱ्या वाहन जत्थ्यात शेतकऱ्यांनी सामील व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्यासोबत जायचं ठरवलं. “मी इथे येण्यामागे पण कारण आहे,” भाजीची चव घेत ती ठीकठाक झाल्याचं बघच ते सांगतात.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे संसदेत रेटून पारित केले. त्या विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि २१ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले सुमारे २,००० शेतकरी नाशिकमध्ये जमले. १,४०० किलोमीटर दूर दिल्लीला जाण्यासाठी त्यांचा चारचाकी वाहनांचा जत्था इथून निघणार होता.
पारगावहून एकूण ३९ जणांनी जत्थ्यासोबत जायचं ठरवलं. “या देशाच्या शेतकऱ्याची फसवणूक सुरू आहे,” भगत सांगतात. “खरं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी हमीभाव मिळायला पाहिजे. पण हे नवे कृषी कायदे त्यांना कर्जाच्या खाईत ढकलणार आहेत. शेतकरी पिळवणूक करणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या दावणीला बांधले जाणार आहेत. या कायद्यांची झळ आता पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना लगेच जाणवत असली आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त असली तरी सगळ्या देशभरातल्या शेतकऱ्यांवर याचा काही परिणाम होणार नाही असं समजणं चुकीचं ठरेल.”






