रायपूरच्या उपनगरांमधल्या वीटभट्ट्यांवर जेवणाची सुटी झालीये. इथले कामगार झटपट दोन घास तोंडात टाकतायत किंवा आपल्या तात्पुरत्या खोपटांमध्ये दोन क्षण विश्रांती घेतायत.
“आम्ही सतन्याचे आहोत,” आपल्या मातीच्या झोपडीतून बाहेर येता येता एक बाई सांगते. इथले बहुतेक कामगार मध्य प्रदेशातून इथे कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खरिपाच्या कापण्या झाल्या की हे लोक छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये येतात आणि पुढचे सहा महिने, मे-जूनपर्यंत इथे काम करतात. भारतातल्या वीटभट्ट्यांवर किमान १ कोटी ते २ कोटी ३० लाख लोक काम करत असल्याचा अंदाज आहे (भारतातील वीटभट्ट्यांवरील वेठबिगारी, २०१७)
या वर्षी ते काम संपवून घरी परत जातील तोवर केंद्रात नवं सरकार आलं असेल. आपल्या नेत्यांची निवड करत असताना इथल्या स्थलांतरित कामगारांची भूमिका नक्की काय असणार हे काही निश्चितपणे सांगता येत नाही.
“मत कधी टाकायचंय ते आम्हाला सांगतील ना,” आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर एक बाई आम्हाला सांगते.
बहुधा ही माहिती त्यांना त्यांचा मुकादम संजय प्रजापती देत असणार. झोपड्यांपासून काही अंतरावर उभा असलेला प्रजापती आम्हाला सांगतो, “सतनामध्ये मतदान कधी आहे त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाहीये. आम्हाला कळालं तर आम्ही त्यांना सांगू.” संजय आणि इथले बरेचसे कामगार प्रजापती समाजाचे आहेत आणि मध्य प्रदेशात त्यांची गणना इतर मागासवर्गीयांमध्ये होते.









