“स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही कधी कधी परिस्थिती फार बिकट व्हायची,” नल्लकन्न सांगतात. “लोक म्हणायचे, तुम्ही नाही जिंकू शकणार. जगातल्या सगळ्यात बलशाली साम्राज्याला तुम्ही आव्हान देताय... पण त्या सगळ्या धमक्या, इशाऱ्यांवर मात करत आम्ही पुढे जात राहिलो. आणि म्हणूनच आज आपण इथे आहोत.”
आर. नल्लकन्न
*****
“पिवळ्या पेटीला मत द्या!” घोषणा सुरूच होत्या. “शुभकारक मंजल पेट्टीलाच मत द्या!”
इंग्रज राजवटीत १९३७ साली मद्रास
प्रांतात निवडणुका लागल्या होत्या. तेव्हाचा हा प्रसंग.
तरुणांचा एक गट ढोल वाजवत जोरजोरात
प्रचार करत होता. यातले बहुतेक मत देण्याच्या वयाचेही नव्हते. आणि असते तरी
त्यांना मतदान करता आलं नसतं. सगळ्याच प्रौढांना मतदानाचा हक्क नव्हता.
जमीन किंवा इतर संपत्तीधारकांना आणि
गावपाड्यांमध्ये केवळ सधन व्यक्तींनाच मतदान करता यायचं.
असा हक्क नसतानाही जोषात प्रचार
करणारी तरुणाई हे नित्याचंच चित्र होतं.
१९३५ साली जुलै महिन्यात ‘जस्टिस’ या
जस्टिस पार्टीच्या वृत्तपत्रात फक्त फक्त रागच नाही तर भरपूर हेटाळणी करत एक बातमी
आली होतीः
कुठल्याही खेडेगावात जा, अगदी दुर्गम
भागात गेलात तरी तुम्हाला काँग्रेसी खादीचे कपडे आणि गांधी टोप्या घातलेले, तिरंगा उंचावून
धरणारे टवाळ गट दिसणारच. यातले जवळपास ऐंशी टक्के पुरुष, कार्यकर्ते किंवा
स्वयंसेवक शहरी आणि ग्रामीण भागातल्या मत, पत, संपत्ती आणि नोकरी नसणाऱ्या शेकडो
लोकांपैकी आहेत...
१९३७ साली या तरुणांच्या जत्थ्यात सामील होते आर. नल्लकन्न. वय जेमतेम १२
वर्षं. आज [२०२२] वयाच्या ९७ व्या वर्षी ते आम्हाला तो सगळा प्रसंग अगदी हसत
वर्णून सांगतायत. त्या ‘टवाळां’मध्ये आपणही कसे होतो तेही. “ज्यांच्या नावे जमीन
होती, जे दहा रुपये किंवा त्याहून जास्त भूमी कर भरत होते असेच लोक मत देऊ शकत,”
ते सांगतात. १९३७ च्या निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये थोड्या जास्त लोकांचा समावेश
करण्यात आला. तरीही, “प्रौढांपैकी १५-२० टक्क्यांहून जास्त लोकांना मतदान करता
येईल असं काही कुणाच्या मनात नव्हतं,” ते सांगतात. “एका मतदारसंघात १,००० ते २,०००
हून जास्त मतदार नव्हते.”
नल्लकन्न यांचा जन्म “श्रीवैकुंठमचा. त्या काळी तिरुनेलवेलीमध्ये होतं ते.” आता श्रीवैकुंठम तालुका तमिळ नाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात आहे. (१९९७ पर्यंत या जिल्ह्याचा उल्लेख तुतिकोरिन असा केला जात असे.)
नल्लकन्न फार लवकर अशा
कारवाया करू लागले.
“अगदी पोरवयात. माझ्या गावाच्या जवळच
असलेल्या थूथुकुडीमध्ये गिरणी कामगारांनी संप केला. हार्वे मिल्सचा कामगार गट
होता. या संपाचं नाव पुढे पंचलई [कापड गिरणी] कामगार संप असं पडलं.”
“त्यांना पाठिंबा म्हणून आमच्या
गावातल्या प्रत्येक घरातून तांदूळ गोळा करून थूथुकुडीत संपकऱ्यांच्या घरी पाठवला
जायचा. माझ्यासारखी बारकी पोरं तांदूळ गोळा करायचं काम करायची.” लोक गरीब होते, पण
“प्रत्येक घरातून काही ना काही मदत मिळायची. मी तर फक्त ५ किंवा ६ वर्षांचा होतो.
कामगारांच्या या लढ्याला लोकांनी दिलेलं बळ पाहून माझ्यावर फार खोल परिणाम झाला
होता. राजकारणात मी फार लवकर काम करायला लागणार हे तेव्हाच पक्कं झालं होतं.”
आम्ही त्यांना पुन्हा एकदा १९३७ च्या
निवडणुकांकडे घेऊन येतो. मंजल पेट्टी किंवा पिवळ्या पेटीला मत द्या म्हणजे नक्की
काय?
“त्या काळी मद्रासमध्ये फक्त दोन
पक्ष होते,” नल्लकन्न सांगतात. “काँग्रेस आणि जस्टिस पार्टी. पक्षांची ओळख
चिन्हांऐवजी मतपेटीच्या रंगावरून होत असे. आम्ही तेव्हा काँग्रेसचा प्रचार करत
होतो. आणि आम्हाला पिवळी पेटी दिली होती. जस्टिस पार्टीला पाच्चई पेटी – म्हणजे
हिरवी पेटी. आपण कोणत्या पक्षाला मत देतोय हे मतदाराला कळावं यासाठी हा त्या काळचा
सगळ्यात सोपा मार्ग होता.”
आणि हो, तेव्हाही निवडणुकांची धामधूम
आजसारखीच असायची. द हिंदूमधल्या वृत्तानुसार, “देवदासी प्रचारक तंजावुर कमुकन्नमल
सगळ्यांनी ‘स्नफ बॉक्स’ला मत द्या असा प्रचार करायच्या!” त्या काळी तपकिरीच्या
पेटीचा रंग सोनेरी किंवा पिवळा ठरलेला असे. “पिवळी पेटी मतांनी भरून टाका” असा एक
मथळा तेव्हा द हिंदूमध्ये वाचायला मिळतो.
“मी १२ वर्षांचा, त्यामुळे अर्थातच
मत देता येणार नव्हतं,” नल्लकन्न सांगतात. “पण मला जमेल तितका जोरात मी प्रचार
केला होता.” त्यानंतर तीनच वर्षांत ते निवडणुकीपल्याडच्या राजकारणात उतरले. तेही
“पराई (एक प्रकारचा ढोल) वाजवत, घोषणा देत.”
पण आता ते काँग्रेस समर्थक नव्हते. “मी १५ वर्षांचा असल्यापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) सदस्य आहे,” नल्लकन्न, त्यांच्या मित्रमंडळींसाठी ‘कॉम्रेड आरएनके’ सांगतात. वय भरत नसल्यामुळे अधिकृतरित्या त्यांना सदस्यत्व मिळायला काही वर्षं लागली. पण नंतरचं काही दशकं तमिळ नाडूमध्ये कम्युनिस्ट चळवळीचे आरएनके एक अग्रणी नेते म्हणून उदयाला आले. आणि आता ते मंजल पेट्टीला नाही तर मतदारांना सेनगोडी (लाल बावटा) ला मत देण्याचं आवाहन करत होते.
*****
“आमच्या तिरुनेलवेलीमध्ये एकच शाळा होती. त्यामुळे तिचं नाव होतं, ‘स्कूल’. बास.”
चेन्नईमधल्या त्यांच्या कचेरीत आम्ही
आरएनकेंशी बोलत होतो. मेजाजवळच्या फळीवर काही अर्धपुतळे आणि छोट्या पूर्णाकृती.
लेनिल, मार्क्स, पेरियार त्यांच्या अगदी बाजूलाच. त्यांच्यामागे मोठा सोनेरी
रंगाचा आंबेडकरांचा पुतळा आणि या सगळ्याला पार्श्वभूमी होती क्रांतिकारी तमिळ कवी
सुब्रमण्य भारती यांच्या मोठ्याशा चित्राची. पेरियार यांच्या अर्धपुतळ्यामागे भगत
सिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांचं एक रेखाचित्र. आणि या सगळ्यांच्या शेजारी एक
दिनदर्शिका. ‘पाणी कमी वापरा’ असा संदेश देणारी.
२५ जून २०२२. नल्लकन्न आणि आमची ही
तिसरी भेट. त्यांची पहिली मुलाखत २०१९ साली घेतली होती. त्यांच्या कचेरीतल्या या
सगळ्या वस्तू, पुतळे, रेखाचित्रं पाहिली की त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली,
कोणत्या मुशीतून तयार झाली ते समजतं.
“मला विचाराल तर भरतियार माझ्यासाठी
सर्वात जास्त प्रेरणादायी कवी होते,” नल्लकन्न सांगतात. “त्यांच्या कविता आणि
गाण्यांवर अनेकदा बंदी घालण्यात यायची.” ‘सुतिंतरा पल्लू’ (स्वातंत्र्याचं गाणं)
या विलक्षण गाण्यातल्या काही ओळी ते म्हणतात. “माझ्या मते ते १९०९ मध्ये या ओळी
लिहीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली. त्या आधी अडतीस वर्षं!”
आम्ही नाचू, आम्ही गाऊ
स्वातंत्र्याचा आनंद लुटू
ब्राह्मणांना ‘सर’ म्हणण्याचा काळ
गेला
गोऱ्यांना ‘लॉर्ड’ म्हणण्याचा काळही गेला
आम्हालाच भीक मागणाऱ्यांना सलाम
ठोकण्याचे दिवस सरले
आमचीच खिल्ली उडवणाऱ्यांची सेवा करण्याचे दिवसही गेले
आता सर्वत्र घोष फक्त स्वातंत्र्याचा...
१९२१ साली भारतींचं निधन झालं. नल्लकन्न यांच्या जन्माआधी चार वर्षं. पण हे गाणं त्याही आधी लिहिलं गेलंय. आरएनकेंच्या संघर्षाच्या काळात या गाण्याने त्यांना प्रेरित केलं. वयाच्या १२ वर्षाआधीच त्यांना भारती यांनी लिहिलेली अनेक गाणी आणि कविता तोंडपाठ होत्या. आणि अगदी आजही यातली काही गाणी, त्यातल्या ओळी घडाघडा म्हणून दाखवू शकतात. “यातली काही मी शाळेतले हिंदी पंडित पल्लवेसम चेट्टियार यांच्याकडून शिकलो,” ते सांगतात. आणि अर्थातच यातली कुठलीच शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नव्हती.
“एस. सत्यमूर्ती आमच्या शाळेत आले
होते. तेव्हा त्यांनी मला भारतियार यांचं पुस्तक दिलं होतं. त्यांच्या कवितांचा
संग्रह होता. देसिय गीतम.” सत्यमूर्ती स्वातंत्र्यसैनिक होते. एक राजकारणी आणि
कलोपासकदेखील. १९१७ साली रशियात झालेल्या क्रांतीचं कौतुक करणारे भारती पहिलेच.
त्यावर त्यांनी एक गाणंही लिहिलं होतं.
भारती यांच्याबद्दलची आस्था तसंच
गेली ऐंशी वर्षं शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लढ्यांमधला त्यांचा सहभाग या अंगाने
नल्लकन्न यांच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचा आमचा प्रयत्न योग्य होता.
कारण त्याशिवाय ‘कॉम्रेड आरएनके’
यांची कहाणी सांगणं तसं अवघडच. फारच कमी लोक त्यांच्याइतके नम्र असतात. ते स्वतःला
कुठल्याही मोठ्या घटनेच्या, संप किंवा लढ्याच्या केंद्रस्थानी ठेवत नाहीत. तसं
सुचवलं तर ते शांतपणे पण ठाम राहून असं काहीही नाकारतात. खरं तर काही लढ्यांमधली
त्यांची भूमिका मोलाची आणि मध्यवर्तीच होती. पण कितीही
प्रयत्न करा, त्यांच्याकडून काही तसं वर्णन तुम्हाला मिळत नाही.
“कॉम्रेड आरएनकेंनी आमच्या
राज्यातल्या शेतकरी चळवळीचा पाया घातलाय,” जी. रामकृष्णन सांगतात. ‘जीआर’
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य आहेत. पण भाकपच्या या ९७ वर्षीय
नेत्याचं योगदान सांगताना ते क्षणभरही अडखळच नाहीत. “इतक्या साऱ्या दशकांमध्ये –
अगदी मिसरुड फुटलं नव्हतं तेव्हापासून ते आणि सोबत श्रीनिवास राव यांनी राज्यभर
किसान सभेची मेढ रोवली. आणि डावी चळवळीसाठी आजही ते बलस्थानी आहेत. नल्लकन्न यांनी
तमिळ नाडूच्या कानाकोपऱ्यात अथक संघर्ष आणि आंदोलनं केली तेव्हाच हे होऊ शकलं.”
नल्लकन्न यांचा संघर्ष पाहिला तर
शेतकऱ्यांचे लढे आणि वसाहतवादाविरोधातील आंदोलन आपल्याला वेगळं काढता येत नाही.
शिवाय त्या काळातल्या तमिळ नाडूसाठी फार कळीचे असलेले सरंजामशाहीविरोधातील लढेही
याच संघर्षांच्या गाभ्याशी होते. आणि १९४७ नंतरही ते सुरूच राहिल्याचं दिसतं.
त्यांचा लढा केवळ इंग्रजांपासून सुटका होऊन स्वराज्य मिळण्यापुरता सीमित नव्हता.
कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले आणि आजही
लढतायत.
“आम्ही रात्रीच्या अंधारात त्यांच्यावर हल्ला करायचो. दगड गोटे मारायचो आणि त्यांना पिटाळून लावायचो. तीच तर आमची शस्त्रं होती. कधी कधी मात्र ठरवून हल्ले व्हायचे. १९४० च्या दशकात जी आंदोलनं झाली त्यात हे सतत घडत होतं. आम्ही पोरवयात होतो पण आम्ही लढायचो. दिवस रात्र, तेही आमच्या शस्त्रास्त्रांनी.”
पण कुणासोबत? कुणाला हाकलून लावायचं?
आणि कुठे?
“आमच्या गावाशेजारी उप्पालम
[मिठागरं] होते. सगळे इंग्रजांच्या ताब्यात. तिथल्या कामगारांची अवस्था भयंकर
होती. त्या आधी काही दशकं कापडगिरण्यांच्या परिसरात कसे लढे उभे राहिले तसंच या
मिठागरांमध्ये आंदोलनं झाली. लोकांचाही पाठिंबा आणि सहानुभूती होती.”
“पोलिस मिठागर मालकांचे दलाल
असल्यासारखे वागायचे. अशाच एका झटापटीत एक उप-निरीक्षक मारला गेला. तिथल्या पोलिस
ठाण्यावरही हल्ला झाला होता. त्यानंतर गस्त घालण्यासाठी एक फिरतं पथक सुरू केलं होतं. ते
दिवसा मिठागरांत जायचे आणि रात्री आमच्या गावात मुक्काम करायचे. तेव्हाच आम्ही
त्यांना तिथून हाकलून लावायचो.” एक
दोन वर्षं या अशा झटापटी आणि आंदोलनं सुरू होती. कदाचित जास्तच. “पण १९४२ साल
उजाडलं आणि चले जाव चळवळ सुरू झाली. मग हा संघर्ष आणखी पेटला.”
नल्लकन्न यांनी किशोरवयातच या सगळ्यात भाग घेतलेला त्यांच्या वडलांना, रामसामी थेवर यांना फारसं रुचलं नव्हतं. थेवर यांची ४-५ एकर जमीन होती. सहा मुलं. छोट्या आरएनकेंना घरी किती तरी वेळा शिक्षा व्हायची. कधी कधी तर त्यांचे वडील शाळेची फीसुद्धा भरायचे नाहीत.
“लोक त्यांना सांगायचे, ‘पोरगा
अभ्यास करतो का नाही? सारखा कुठे तरी घसा फोडत असतो. काँग्रेसमधे गेलाय असं
वाटायला लागलंय’.” महिन्याच्या १४ ते २४ तारखेच्या आत शाळेची फी भरावी लागायची.
“मी फीचा विषय काढला तर ते माझ्यावर खेकसायचे – ‘अभ्यास वगैरे बास झालं. शेतात
चुलत्यांबरोबर कामाला लागा’.”
“शेवटची तारीख जवळ यायला लागली की
त्यांच्या जवळचं कुणी तरी त्यांची समजूत काढायचं. मी जे काही करतोय, जसं बोलतोय ते
मी करणार नाही असा ते शब्द द्यायचे. मगच ते फी भरायचे.”
पण, “माझं जगणं, माझे विचार किंवा
वागण्याला ते जितका विरोध करायचे तितका माझ्यातला बंडखोरपणा वाढत गेला. मी द हिंदू
कॉलेज, मदुराईमधून तमिळमध्ये इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. खरं तर हे कॉलेज
तिरुनेलवेली जंक्शनला होतं. पण नाव मात्र हिंदू कॉलेज, मदुरई. मी फक्त दोन वर्षं
शिकलो. पुढे काही मला जमलं नाही.”
कारण आंदोलनांमध्येच त्यांचा सगळा वेळ जात होता. आणि खरं तर आंदोलनं सुरू करण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता. अर्थात नल्लकन्न स्वतः काही हे सांगत नाहीत. एक तरुण नेता म्हणून आरएनकेंचा उदय होत होता. पण असा नेता ज्याला मोठ्या पदाची अपेक्षा नव्हती. खरं तर त्यांनी अशा संधी टाळल्याच.
आरएनके इतक्या साऱ्या विविध आंदोलनांमध्ये होते की त्यांची तारीखवार संगती लावणं महाकठीण काम आहे.
स्वातंत्र्यलढ्यातले कोणते क्षण
त्यांच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे होते? ते अगदी सहज सांगतात, “चले जाव चळवळ
आणि त्यातले लढे.” तेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते. पण चळवळींमध्ये त्यांना विशेष
मान होता. वय वर्षं १२ ते १५ या तीन वर्षांत काँग्रेस समर्थक असलेले नल्लकन्न
कम्युनिस्टही झाले.
ते कुठल्या लढ्यांमध्ये, निदर्शनं
आणि आंदोलनांमध्ये भाग घ्यायचे? किंवा स्वतः सुरू करायचे?
सुरुवातीच्या काळात, “आमच्याकडे
भोंगे असायचे. पत्र्याचे. आम्ही गावात किंवा शहरात शक्य तितक्या खुर्च्या आणि
टेबलं गोळा करायचो आणि गाणी म्हणायचो. वक्त्याला त्यावर उभं राहून जमावापुढे भाषण
करता यावं यासाठी टेबल लागायचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही होवो, लोक गर्दी
करायचे.” लोकांना गोळा करण्यासाठी आपण काय करायचो हा तपशील आताही ते सांगत नाहीत.
त्यांच्यासारखं पायदळ होतं म्हणून तर या गोष्टी शक्य होत होत्या.
“नंतरच्या काळात जीवानंदम
यांच्यासारखे वक्ते त्याच टेबलांवर उभं राहून फार मोठ्या जमावापुढे भाषण करायचे.
माइक नाही. काही नाही. गरजच नसायची.”
“पुढे, हळूहळू आमच्याकडे जरा बरे
माइक आणि स्पीकर आले. त्यातलेसुद्धा सगळ्यात आवडते म्हणजे, ‘शिकागो माइक’. किंवा
शिकागो रेडिओ सिस्टिम. अर्थात दर वेळी काही ते परवडायचे नाहीत,” नल्लकन्न सांगतात.
इंग्रज आंदोलन चिरडून टाकायचे तेव्हा? एकमेकांशी कसा संपर्क साधायचे?
“किती तरी वेळा असं घडायचं. रॉयल
इंडियन नेव्हीचं बंड झालं [१९४६] त्यानंतर झालंच होतं. कम्युनिस्टांवर मोठ्या
प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. त्या आधीही धाडी टाकतच होते. इंग्रजसुद्धा गावांमध्ये पक्षाच्या एकन् एक
कार्यालयात झडती घ्यायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे थांबलं नाहीच. तेव्हा तर
पक्षावर बंदीच घातली होती की. आमची वार्तापत्रं होती. मासिकं होती. जनशक्तीच घ्या
ना. पण आम्ही इतर मार्गांनीही एकमेकांशी संपर्क साधायचो. त्यातल्या काही तर शेकडो
वर्षांपूर्वीच्या युक्त्या होत्या.”
“कट्टबोम्मनच्या काळापासूनच लोक
घरावर लिंबाची डहाळी लावत असत. अठराव्या शतकात इंग्रजांविरुद्ध लढलेला हा लोकप्रिय
लढवय्या. घरात कुणाला देवी आल्या आहेत किंवा कुणी आजारी असल्याची ही खूण. पण हीच
खूण घरात गुप्त बैठक चालू आहे हे सांगण्यासाठी वापरली जायची.”
“घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला
तर समजायचं की बैठक अजून सुरू आहे. गारापाशी शेणाचा पो ओला असेल तर बैठक सुरू आणि
वाळलेला पो म्हणजे आल्या पावली निघून जा. धोका आहे. किंवा बैठक संपली.”
आरएनकेंसाठी स्वातंत्र्यलढ्यात
सगळ्यात प्रेरणादायी असं काय होतं?
“कम्युनिस्ट पक्ष आमच्यासाठी
प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत होता.”
*****
“मला अटक झाल्यावर मी मिशा का उतरवल्या?” आरएनके हसू लागतात. “मी कधीच उतरवल्या नाहीत. आणि खरं तर चेहरा लपवण्यासाठी मी त्या कधी वाढवल्याही नाहीत. तसंच असतं तर मी मिशी वाढूच दिली नसती ना?”
“ऐका. पोलिसांनी सिगरेटनी माझी मिशी
जाळून टाकली. मद्रास शहरातल्या एका इन्स्पेक्टर कृष्णमूर्तींनी माझा जो काही छळ
केला त्याचा हाही एक भाग होता. त्यांनी मध्यरात्री २ वाजता माझे हात बांधून टाकले
आणि सकाळी १० वाजता मोकळे केले. त्यानंतर त्यांनी खूप वेळ मला दंडुक्यानी मारहाण
केली.”
इथेसुद्धा, त्यांच्या आवाजात कुठलाही
वैयक्तिक राग नाही. त्यांना छळणाऱ्या माणसाला लाखोली नाही. इतरही अनेक
स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ही कासियत मला आढळली आहे. आरएनकेंनी नंतर बदला घेण्यासाठी
वगैरे त्या पोलिस निरीक्षकाचा शोधही घेतला नाही. किंवा असं काही करावं हे
त्यांच्या मनातही आलं नाही.
“ही घटना १९४८ सालची,” ते सांगतात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची. “अनेक प्रांतांमध्ये, मद्रासमध्येही पक्षावर
बंदी घालण्यात आली होती. १९५१ पर्यंत तीच स्थिती होती.”
“पण एक गोष्ट लक्षात घ्या. सरंजामशाहीविरोधातही लढे सुरू होते आणि ते लढणं क्रमप्राप्त होतं. त्याची किंमत आम्हाला चुकवावीच लागणार होती. ही लढाई १९४७ च्या फार आधी सुरू झाली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मोठा काळ सुरूच राहिली.”
“स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणा
आणि सरंजामशाहीविरोधात लढा – आमच्यासाठी हे सारं एकमेकांत गुंफलेलं होतं. आमचं काम
तसंच सुरू होतं.”
“आम्ही रास्त आणि समान मजुरीसाठी
लढलो. अस्पृश्यता निर्मूलनासाठी झगडलो. मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात आम्ही फार
गांभीर्याने उतरलो होतो.”
“जमीनदारी व्यवस्थेचं निर्मूलन
व्हावं यासाठी तमिळ नाडूमध्ये फोर मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. राज्यात
जमीनदारीच्या मोठ्या व्यवस्था सुरू होत्या. मिरासदारी [वारसा हक्काने ताब्यात
असलेली जमीन], इनामदारी [सत्ताधाऱ्यांनी व्यक्ती किंवा संस्थांना मोफत देऊन टाकलेल्या
जमिनी] व्यवस्थांविरोधात आमचा संघर्ष सुरूच होता. आणि या सगळ्या लढ्यांच्या
अग्रस्थानी कम्युनिस्ट होते हे लक्षात घ्या. हे काही साधेसुधे जमीनदार नव्हते.
त्यांच्या स्वतःच्या सशस्त्र सेना होत्या, पाळलेले गुंड होते.”
“पुन्नियार सांबसिवा अय्यर, नेदुमानम
सामियप्पा मुदलियार, पूंडी वंडियारसारखे लोक होते. त्यांच्या मालकीची हजारो एकर
सुपीक जमीन होती.”
इतिहासाचं एक जबरदस्त पर्वच
आमच्यासमोर उलगडत होतं. आणि तेही ज्याने हा इतिहास घडवला साक्षात त्याच्याकडूनच
आम्ही ते ऐकत होतो.
स्वातंत्र्यलढा, सामाजिक सुधारणा आणि सरंजामशाहीला विरोध – हे एकच होतं. रास्त व समान मजुरी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी झगडलो. मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात फार गांभीर्याने उतरलो
“ब्राह्मदेयम आणि देवदानम या प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू होत्या.”
“पहिल्या व्यवस्थेत राजे महाराजे
ब्राह्मणांना फुकटात जमिनी दिल्या जायच्या. त्यांच्याकडे सत्ता होती आणि
जमिनीतूनही त्यांचा नफाच होत होता. ते स्वतः कधीच त्या जमिनी कसले नाहीत. पण सगळा
मलिदा मात्र त्यांनाच मिळायचा. देवदानम व्यवस्थेमध्ये जमिनी देवळांसाठी दिल्या
जायच्या. कधी कधी तर एखादं अख्खं गावच देवळाच्या नावे केलं जायचं. मग छोटे खंडकरी
शेतकरी किंवा मजूर त्या देवळाच्या मर्जीवर जगायचे. त्यांच्या बाजूने कुणी काही
बोललं तर त्याला तिथून सहज हाकलून दिलं जायचं.”
“लक्षात घ्या. या संस्थांच्या किंवा
मठांच्या ताब्यात सहा लाख एकर जमीन होती. आजही असेल कदाचित. पण लोकांनी न कचरता
सातत्याने संघर्ष केला म्हणून त्यांच्या सत्तेला लगाम बसला.”
“तमिळ नाडू जमीनदारी निर्मूलन कायदा
१९४८ साली लागू झाला. पण त्याची भरपाई जमीनदार आणि मोठ्या जमीनमालकांना मिळाली.
ज्यांनी त्यांच्या जमिनीत घाम गाळला, त्यांना नाही. जे खंडकरी सुखवस्तू होते
त्यांना थोडा फार लाभ मिळाला. पण शेतात राबणाऱ्या गरिबाच्या हातात काहीही पडलं
नाही. १९४७-४९ या काळात देवस्थानांच्या या जमिनींमधून किती तरी लोकांना हाकलून
दिल्याचा इतिहास आहे. आणि म्हणूनच आम्ही प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलं – ‘शेतीची
मालकी मिळाल्यावर शेतकरी खरा सुखी होईल’.”
“आमचे लढे हे असे होते. १९४८ ते १९६० या काळात
आम्ही त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. मुख्यमंत्रीपदी
असलेल्या सी. राजगोपालाचारी [राजाजी] यांनी जमीनदार आणि मठांची बाजू घेतली. आमचा
नारा होता, ‘कसेल त्याची जमीन’. राजाजींचं म्हणणं होतं ज्याच्याकडे कागदपत्रं आहेत
तोच जमिनीचा मालक. पण आम्ही केलेल्या संघर्षानंतर ही देवस्थानं आणि मठांकडची
निरंकुश सत्ता कोलमडून पडली. आम्ही पिकांच्या काढणीचे सगळे नियम वगैरे धुडकावून
लावले. आम्ही त्यांची गुलामगिरी करायला नकार दिला.”
“अर्थातच, सामाजिक लढ्यांपासून हा
संघर्ष वेगळा काढता येत नाही.”
“एका रात्री एका देवळासमोर निदर्शनं
सुरू होती आणि मी त्याचा साक्षीदार होतो. सगळ्या मंदिरांमध्ये रथयात्रा असतात.
दोराने रथ पुढे ओढून नेणारे सगळे शेतकरी असायचे. आम्ही जाहीर केलं की जर गावातून
होणाऱ्या हकालपट्ट्या थांबल्या नाहीत तर शेतकरी येऊन रथ ओढणार नाहीत. तसंच आलेल्या
धान्यातला काही भाग पुढच्या पेरणीसाठी आमच्यापाशी ठेवण्याचा हक्क आम्हाला असल्याचं
आम्ही ठामपणे सांगत होतो.”
स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या लढ्यांबद्दल नल्लकन्न आळीपाळीने बोलत राहतात. कधी कधी आम्ही पुरते गोंधळून जातो. पण त्या काळात सगळ्या गोष्टी किती गुंतागुंतीच्या होत्या हेही आमच्या लक्षात येऊ लागतं. अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांसाठी संघर्ष सुरू होता. आणि त्यातल्या काही लढ्यांना विशिष्ट असा कालावधी नव्हता. विशिष्ट तारखा नव्हत्या. पण आरएनकेंसारखे लोक अशा स्वातंत्र्यांसाठी लढत राहिले. अथक. अविरत.
“आम्ही अनेक दशकं मजुरांना होणारी
मारहाण आणि अत्याचारांविरोधातही लढलो.”
“१९४३ पर्यंत दलित मजुरांना सर्रास
चाबकाने फोडून काढलं जात होतं. आणि त्या वणांवर चक्क शेणाचं पाणी ओतलं जायचं.
पहाटे ४-५ वाजता किंवा कोंबडा आरवला की त्यांना कामावर हजर व्हावं लागायचं.
मिरासदाराच्या घरी जायचं, गोठ्यातली जनावरं धुवायची, शेणघाण काढायची. आणि त्यानंतर
रानात पाणी द्यायचं. तंजावुर जिल्ह्यात तिरुतुरइपूंडीजवळ एक गाव होतं. तिथे आम्ही
निदर्शनं केली होती.”
“किसान सभेच्या श्रीनिवास रावांच्या
नेतृत्वात विराट मोर्चा निघाला होता. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती – ‘लाल
बावटा हातात घेतला म्हणून जर तुम्हाला मारलं, तर उलटवार कला.’ अखेर मिरासदार आणि
मुदलियार लोकांनी तिरुतुरइपूंडीमध्ये एका करारावर सह्या केल्या. चाबकाचे फटके,
शेणपाण्याचा वापर आणि इतरही जुलमी प्रथा बंद करण्यात येतील.”
१९४० ते १९६० या वीस वर्षांमध्ये,
किंबहुना त्यानंतरच्या काळात झालेल्या या प्रचंड संघर्षात आरएनकेंनी अतिशय कळीची
भूमिका निभावली आहे. पण त्यांच्या बोलण्यात त्याचा लवलेश नाही. श्रीनिवास राव
यांच्यानंतर ते तमिळ नाडू किसान सभेचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या
पायदळातला हा सैनिक १९४७ नंतरच्या दशकात मात्र शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या संघर्षात
आघाडीचा शिलेदार म्हणून उदयाला आला.
*****
दोघंही जाम खूश पण भावुकही झाले होते. आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्वातंत्र्यसैनिक असलेल्या एन. संकरय्यांच्या घरी एक मुलाखत घेत होतो. आणि या वेळी संकरय्या आणि नल्लकन्न दोघेही एकत्र होते. तब्बल ऐंशी वर्षं एकमेकांसोबत काम केलेल्या हे दोघं कॉम्रेड ज्या पद्धतीने एकमेकांशी बोलतात, ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या आम्हा सगळ्यांचा ऊर भरून आला.
कडवटपणा, खेद, दुःख आहे का? साठ वर्षांपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडली आणि दोघांनी वेगळी वाट निवडली. पक्षातली ही फूट फार सहजसोपी नव्हती.
“तसं असलं तरी आम्ही अनेक
मुद्द्यांवर, अनेक लढ्यांमध्ये एकत्र काम केलंय,” नल्लकन्न सांगतात. “आणि
एकमेकांविषयी मनात असलेली भावना पूर्वीसारखीच. तशीच.”
“आम्ही दोघं भेटतो ना,” संकरय्या
म्हणतात, “तेव्हा आजही आम्ही एकाच पक्षाचे असतो.”
आजचा धार्मिक उन्माद, द्वेष आणि
हिंसेकडे तुम्ही कसं पाहता? हा देश एकसंध राहणार का? ज्या देशाला त्यांनी
स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच देशाचं काय होणार?
“स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही कधी
कधी परिस्थिती फार बिकट व्हायची,” नल्लकन्न सांगतात. “लोक म्हणायचे, तुम्ही नाही
जिंकू शकणार. जगातल्या सगळ्यात बलशाली साम्राज्याला तुम्ही आव्हान देताय.
आमच्यातल्या काही जणांच्या घरच्यांना लोक सांगायचे की यांना अशा लढ्यात पाठवू नका.
पण त्या सगळ्या धमक्या, इशाऱ्यांवर मात करत आम्ही पुढे जात राहिलो. आणि म्हणूनच आज
आपण इथे आहोत.”
आज व्यापक स्तरावर एकजूट व्हायला हवी
असं दोघांनाही वाटतं. पूर्वीसारखं एकमेकांना साद घालण्याची, एकमेकांकडून शिकण्याची
आज गरज आहे. “मला तर वाटतं ईएमएस [नंबूदिरिपाद] सुद्धा आपल्या खोलीत गांधींचा फोटो
ठेवत असत,” आरएनके म्हणतात.
सध्या सुरू असलेलं राजकारण
आमच्यासारख्या लाखो लोकांची झोप उडवत असताना हे दोघं इतके स्थिरचित्त आणि आशावादी
कसे काय असू शकतात? नल्लकन्न इतकंच म्हणतात, “याहून भयानक काळ आम्ही पाहिलाय.”
ता.क.
२०२२ साली स्वातंत्र्यदिनी तमिळ नाडू शासनाने आरएनकेंना मानाच्या तगइसल तमिळार पुरस्काराने सन्मानित केलं. द लास्ट हिरोजः फूटसोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम हे पुस्तक तेव्हा प्रकाशित होण्याच्या मार्गावर होतं. तमिळ नाडूचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. २०२१ साली राज्यासाठी आणि तमिळ जनतेसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या नावाजलेल्या तमिळ व्यक्तिमत्त्वाला हा पुरस्कार घोषित करण्यात आला. सेंट जॉर्ज किल्ल्याच्या ऐतिहासिक चिरेबंदी वास्तूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आरएनकेंना १० लाख रुपये रोख आणि हा पुरस्कार बहाल केला.
आणि अर्थातच आर. नल्लकन्न यांनी
विनम्रपणे पुरस्कार स्वीकारला पण १० लाख रुपये लागलीच मुख्यमंत्री मदत निधीला दान
करून टाकले. आणि चांगल्या कामासाठी म्हणून त्यामध्ये आपले स्वतःचे ५,००० रुपये
घालायला ते विसरले नाहीत.