संध्याकाळ उलटून गेलीये. तमिळनाडूच्या वदनमेल्ली गावात श्री पोन्नीअम्मन तेरुकूदु मंदरमचे लोक करिआक्कूदुच्या प्रयोगासाठी तयार होतायत. हा खेळ नेहमीच रात्रभर सादर केला जातो. किती तरी पात्रं आणि किती तरी वेशांतरं असतात त्याच्यात.
पडद्यामागे लगबग सुरू आहे. ३३ वर्षांच्या शर्मीने चेहरा रंगवायला सुरुवात केलीये. लाल रंगाची पूड आणि तेल कालवून ती ओठ रंगवायला लागते आणि मेकअप किंवा अरिदारमचे काही साधे नियम सांगू लागते. “पुरुष आणि स्त्रियांचा अरिथारम वेगवेगळा असतो. तसंच पात्र आणि त्याची भूमिका किती छोटी किंवा मोठी आहे त्याप्रमाणेही त्यात बदल केला जातो.”
श्री पोन्नीअम्मन तेरुकूदु मंदरम ही नाटक मंडळी तमिळनाडूचा सर्वात जुना मानला जाणारा कलाप्रकार सादर करते. शर्मी आणि इतर तीन पारलिंगी कलाकार या १७ जणांच्या नाटक मंडळीत काम करतात. “माझ्या मागच्या पिढीचे कलाकारही तेरुकूदु सादर करायचे,” शरमी सांगते. “किती जुनं नाटक आहे वगैरे काही मला सांगता येणार नाही.”
तेरुकूदु हा पथनाट्याचा प्रकार आहे. यामध्ये रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमधल्या कथा आणि प्रसंग सादर केले जातात, तेही अख्खी रात्रभर. तेरुकूदुचे खेळ शक्यतो पांगुनी (एप्रिल) ते पुरत्तस्सी (सप्टेंबर) या काळात सादर केले जातात. शर्मी आणि तिचे सहकलाकार या काळात जवळपास दररोज एक खेळ करतात. महिन्याला १५-२० होतातच. एका खेळाचे प्रत्येक कलाकाराला ७००-८०० रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला १०,००० ते १५,००० रुपयांची कमाई होते.
पण हा काळ संपल्यानंतर या कलाकारांना कमाईचे पर्यायी स्रोत शोधण्यावाचून मार्ग नसतो. तेरुकूदुचाच एक वेगळा प्रकार करियाक्कूदु मयतीनंतर सादर केला जातो. हे कलाकार तो सादर करतात. “कुणाची मयत झाली तर मला आठवड्यातून दोन प्रयोग मिळतात,” शर्मी सांगते. ही नाटक मंडळी तिरुवल्लुर जिल्ह्याच्या पट्टरायपेरुंबुदुर गावात आहे. तिथून ६० किलोमीटरवर वदनमेल्लीमध्ये करियाक्कूदुची तयारी सुरू आहे.
























