२० डिसेंबर २०१४ रोजी पारीच्या वेबसाइटचं प्रकाशन झालं.
कुणी विचारलं की आमचं सगळ्यात मोठं यश काय? तर हेच की आम्ही अजूनही आहोत. माध्यमजगतामध्ये कॉर्पोरेट सत्ता शीर्षस्थ असतानाही पत्रकारितेची एक स्वतंत्र वेबसाइट टिकून आहे, आणि नुसती टिकून नाही पाय रोवून उभी आहे, हे आमचं यश. आज पारीवर दररोज १५ भाषांमध्ये मजकूर प्रकाशित होतो आहे. आणि ही वेबसाइट आमच्या न्यासाचं मुख्य काम आहे. तिची सुरुवात झाली तेव्हा संस्थेकडचा कॉर्पस निधी होता शून्य रुपये. कुठलाही सरकारी निधी ना कुणी देऊ केला, ना आम्ही मागितला. कॉर्पोरेट क्षेत्राकडून कुठलेही थेट अर्थसहाय्य नाही ना कसली गुंतवणूक. जाहिराती आम्हीच नाकारल्या. पारीवरचा मजकूर वाचता यावा यासाठी कुठलंही शुल्क नाही. ज्यांनी पारीवर यावं, इथला मजकूर वाचावा, पहावा, ऐकावा असं आम्हाला वाटतं त्यातले बहुतेक असं शुल्क असलं तर इथे येऊच शकणार नाहीत. ही वेबसाइट स्वयंस्फूर्तीने, स्वेच्छेने काम करणाऱ्या अनेकांच्या कष्टातून, कौशल्यातून साकार झाली आहे. अनेक पत्रकार, तंत्रज्ञ, कलाकार, अध्यापक आणि इतरही अनेकांनी आपला वेळ आणि कौशल्य पारीसाठी देऊ केलं आहे. शिवाय आमचे विश्वस्त, अनेक वाचक आणि हितचिंतक आणि आमच्या स्वातंत्र्याला धक्का न लावणाऱ्या काही फौंडेशन्सच्या सढळ मदतीतूनच आमचं काम भक्कमपणे उभं आहे.
प्रामाणिक आणि डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या आमच्या सदस्यांच्या सक्षम नेतृत्वात पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया – पारी भौगोलिक किंवा ऐतिहासिक ओळख असलेल्या भारताच्या ९५ प्रांतांमधून नेमाने वार्तांकन करत आहे. पारी ही भारताच्या गावपाड्यांना वाहून घेतलेली वेबसाइट आहे. या गावपाड्यांमध्ये राहणारे ९० कोटी लोक, त्यांची आयुष्यं, उपजीविका, त्यांची संस्कृती आणि ते बोलत असलेल्या अगदी विशेष अशा ८०० भाषा हे सगळं पारीवर यावं हाच आमचा हेतू आहे. साध्यासुध्या माणसांचं रोजचं जगणं टिपणं हा आमचा ध्यास आहे. आणि हे करत असताना पोटापाण्यासाठी शहरांमध्ये गेलेल्या स्थलांतरित कामगारांचाही मागोवा आम्ही घेतो. या तब्बल एक अब्ज लोकांच्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत, सांगायच्या आहेत.
पारीच्या अगदी प्रारंभापासूनच आम्हा संस्थापकांच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती. पारी पत्रकारितेची एक वेबसाइट असेलच पण सोबतच हा एक जिताजागता संग्रह असेल, याची खूणगाठ आम्ही बांधली होती. आणखी एक गोष्ट आम्ही पक्की ठरवून घेतली होती. ही वेबसाइट कॉर्पोरेट क्षेत्राने आखलेल्या ‘व्यावसायिक’ माध्यमाच्या वापरून गुळगुळीत झालेल्या व्याख्यांची चाकोरी धरणार नाही. तर मानवविद्या, विज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शास्त्रांची शिस्त, ज्ञान आणि बलस्थानं या वेबसाइटच्या उभारणीत मोलाची असतील. आणि म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या मंडळात पत्रकारितेचा दांडगा अनुभव असलेले लोक आणि त्यांच्या सोबत बाकी क्षेत्राचं सखोल ज्ञान असलेली मंडळी देखील सामील झाली.
आणि याचा परिपाक व्हायचा तो झालाच. वाद-विवाद, गैरसमज, अगदी कडूजार भांडणं आणि सावळागोंधळ. सगळं काही झालं. आणि त्यातून जे निर्माण झालं ते मात्र असामान्य होतं. अगदी खास. या वादांमध्येही सगळ्यांचं एका गोष्टीवर मात्र एकमत होतं आणि ते म्हणजे जो काही मजकूर पारीवर येईल त्यामध्ये आपला स्वतःचा आवाज पडद्यामागे असेल. भारतातले सामान्. साधेसुधे लोक इथे बोलतील. आणि त्यामुळेच वार्तांकन करायला जाणाऱ्या सगळ्या पत्रकार-वार्ताहरांसाठी तयार केलेली नियमावली देखील याच गोष्टीवर भर देते. लोक काय म्हणतायत ते तुमच्या लेखात येऊ द्या. तुमचा आवाज, तुमचं म्हणणं मागे असू दे. शिवाय आपण गोष्ट सांगणार आहोत. बातमीपत्र किंवा एखादा अभ्यासपूर्ण अहवालसुद्धा नाही मांडायचा. आणि खरं तर शक्य तिथे गावपाड्यातले शेतकरी, जंगला-वनांमध्ये राहणारे आदिवासी आणि इतर लोक, कामगार, विणकर, मच्छीमार आणि पोटापाण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे लोकच आपल्या स्वतःच्या गोष्टी सांगतील, लिहितील, चित्रित करतील हाच आमचा प्रयत्न आहे. लिहिणंच का, त्यांची गोष्ट म्हणजे त्यांचं गाणंही असेल कदाचित.














