मीराबाईंची गाण्यातील समज उच्च दर्जाची आहे. गाण्यातील तांत्रिकता व त्यातील तांत्रिक समज, सादरीकरण उत्तम आहे. त्या दिमडीच्या वेगवेगळ्या भागावर आघात करून वेगवेगळे सूर काढतात. कीर्तनात, भजनात, पोवाड्यात त्यांचे ताल सूर बदलतात. त्यात कमालीचा समन्वय असतो. सगळ्या चर्मवाद्यांचा तसा परिचितच ठेका आहे, पण तो ठेका हळूहळू पकड घेतो. हे शास्त्रीय संगीत नाही. तो एक रांगडा मस्त खेळ आहे. त्या मधली सहजता भारी आहे. त्यांनीच खंजिरीला जिवंत ठेवले आहे.
खंजिरी हे वाद्य ग्रामगीताकार संत तुकडोजी महाराज त्यांच्या भजनांत वाजवीत असत. सध्या त्यांचे शिष्य सत्यपाल चिंचोलीकर सप्त-खंजिरी वाजवतात. यामध्ये सात खंजिरींचे आवाज आणि स्वर निर्माण होतात. सांगलीचे देवानंद माळी आणि साताऱ्याचे म्हलारी गजभरे असे खंजिरी वादन करणारे अनेक पुरुष कलाकार महाराष्ट्रात आहेत परंतु मीरा उमप यांच्याइतके प्रभावी खंजिरीवादन करणारी स्त्री कलाकार दुसरी नाही. उत्कृष्ट अभिनय, खड्या परंतु सुरेल आवाजात गायन, अधून-मधून विनोदी कोट्या करीत मीरा उमप संपूर्ण श्रोत्यांना खिळवून ठेवतात.
मराठवाड्यातील या तरुणीचा गोड गळा आणि खंजिरीवरची पकड संगीतातील जाणते शाहीर रत्नाकर कुलकर्णी यांनी हेरली आणि तरुणपणीच मीरा उमप यांना प्रोत्साहन दिले. बीड जिल्ह्यातील शासकीय प्रचार कार्यक्रमात मीरा उमप यांनी वयाच्या विसाव्या वर्षी शाहिरी क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्यातील अंगभूत शाहिरी कौशल्य जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रशासकीय प्रचार कार्याचे कार्यक्रम करण्याची संधी दिली. मीराबाईंनी या संधीचे सोने केले. आरोग्य, दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती यावर आधारित समाज प्रबोधन गीते त्या अतिशय प्रभावीरित्या सादर करतात.
“मला सगळ्या कथा, सप्ताह, सगळे रामायण पाठ, महाभारत पाठ, सत्यवान सावित्री पाठ. महादेवाची सगळी शास्त्रं, पुराणं यांची पारायणं करत सगळा महाराष्ट्र मी पालथा घातला. पण यामध्ये मला काही समाधान मिळाले नाही. आणि समाजाला काही दिशा मिळाली नाही.
बहुजन समाजाच्या सामाजिक दुःखावरील उपाय बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा आदी महापुरुषांच्या विचारधारेत आहे. विजयकुमार गवई यांनी आंबेडकरी चळवळीचं गाणं शिकवलं. आणि मी प्रथमच वामन दादा कर्डक यांचं गाणं गायले.”
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
लयी नाही मागत भर माझं इवलंसं गाडगं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
आणि मी सगळे पोथी पुराण त्या दिवशी सर्व सोडून दिलं आणि भीमगीत गायला सुरुवात केली. मी प्रथम नागपूरला वामन दादांच गाण गायले आणि लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला.”