हिंगोली जिल्ह्यातलं १३०० वस्तीचं नवलगव्हाण गाव. संध्याकाळचे सहा वाजले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा मोर्चा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाकडे वळतो आणि तयारी सुरू होते. मैदान झाडलं जातं. पांढऱ्या फक्कीने सीमारेषा आखल्या जातात. अंधारून आलं तरी दिव्याच्या उजेडात सामन्याची सगळी तयारी होते.
निळ्या गणवेशातली ८ ते १६ वयोगटातली मुलं मैदानात हजर असतात. सात सात जणांचे संघ बनतात आणि खेळाला सुरुवात होते.
‘कबड्ड! कबड्डी! कबड्डी!’
आणि मग सूर्य मावळल्यानंतरही कबड्डीचे डाव रंगत जातात. गावकरी मंडळी शेजारी-पाजारी आणि घरची मंडळीही मुलांचा खेळ पहायला मैदानात जमलेली दिसतात.
एक खेळाडू चाल करतो. समोरच्या जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्श करून बाद करत शड्डू ठोकत सुखरूप निसटून आपल्या हद्दीत यायची चढाओढ लागते. तोंडाने कबड्डी कबड्डी म्हणत रहायचं. पकडला गेला तर मात्र बाद.












