आम्ही बोलत असताना पाल भगवान कार्तिक यांच्या मुखवट्याला चिकण मातीने आकार देत आहेत आणि आपल्या तरबेज हातांनी तिच्यावर सुबक काम करत आहेत. त्यासाठी ते एक कुंचला आणि बांबू पासून तयार केलेलं तासायचं अवजार, चियारी वापरतात.
जवळच्या एका कार्यशाळेत गोपाळ पाल यांनी मातीच्या ढाच्यावर तलम वस्त्र चिकटवण्यासाठी एक गोंद तयार केलाय, जेणेकरून त्याला त्वचेचं रूप येईल. गोपाल मूळचे उत्तर कोलकात्याहून १२० किलोमीटर दूर नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. इथले पुष्कळ कारागीर – सगळे पुरुष – याच जिल्ह्यातून आले आहेत; त्यांच्यातील बहुतांश लोक याच भागात कार्यशाळेच्या मालकांनी दिलेल्या खोलीत राहतात. कामाच्या हंगामाच्या काही महिने आधीच कारागिरांना कामावर घेतलं जातं. ते आठ तासांच्या पाळींमध्ये काम करतात, पण शारदीय नवरात्राच्या काही दिवस आधी मात्र ते रात्रभर काम करतात. तेव्हा जास्त वेळ काम केल्याचा त्यांना मोबदलाही मिळतो.
कुमारतुलीतील कुंभारांची पहिली पिढी सुमारे ३०० वर्षांपूर्वी कृष्णानगर येथून स्थलांतरित झाली. ते बागबाझार घाटानजीक नव्यानेच वसलेल्या कुमारतुलीत राहू लागले, जेणेकरून नदीच्या किनाऱ्यावरील माती सहजपणे आणता यावी. मग ते जमीनदारांच्या घरी काम करू लागले, ठाकूरदालनांमध्ये (जमीनदारांच्या राहत्या घरी सणासुदीकरिता राखून ठेवण्यात आलेला भाग) दुर्गा पूजेच्या काही आठवडे आधी ते मूर्ती घडवत असत.