घराच्या जराशा सावलीत खुर्ची टाकून गोमा रामा हजारे नुसते बसून राहिले होते. गावातल्या ओसाड रस्त्यावर नजर लावून. वेळ काढत.
अधून मधून त्यांची विचारपूस करायला येणाऱ्यांशी काही बोलायचं, नाही तर परत एकटेच. आठवडाभरापूर्वी त्यांच्या पत्नीचा आजारपणात मृत्यू झाला. त्यानंतर कुणी ना कुणी येऊन त्यांची हालहवाल विचारून जातं.
एप्रिल निम्मा सरलाय. तिन्ही सांजा व्हायची वेळ आहे. ५ वाजलेत. हवेत प्रचंड गरमा आहे. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातल्या पळसगावमध्ये आम्ही आहोत. बांबू आणि सागाच्या गर्द वनात लपलेलं हे छोटं गाव. गावात सन्नाटा पसरलाय. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणारे. सध्याचे विद्यमान खासदार भाजपाचे अशोक नेते पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत. पण गावात कसलाही उत्साह नाही. असली तर चिंताच आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून गोमादादांच्या हाताला काम नाहीये. खरं तर या काळात साठी पार केलेले दादा आणि त्यांच्यासारखे अनेक जण जंगलात मोहाची फुलं, तेंदूपत्ता गोळा करत असतात. बांबू कापणं किंवा शेतातली इतर कामंही सुरू असतात.
“पण या वर्षी नाहीच,” गोमा दादा म्हणतात. “जीव कोण धोक्यात घालेल?”
“सगळे घरात बसून आहेत,” ते सांगतात. दिवसभर अंगाची लाही लाही होते. बाहेर पडणं शक्य नाही. गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना अशा संचारबंदीची खरं तर सवय आहे. गेल्या चार दशकांपासून इथे सशस्त्र माओवादी आणि सुरक्षा दल आणि पोलिसांमधला संघर्ष सुरू आहे. पण या वेळी पाहुणे भलतेच कुणी आहेत. आणि त्यांच्यामुळे जीव आणि जीविका दोन्हीला अगदी थेट धोका निर्माण झालाय.
पळसगावच्या आसपास २३ जंगली हत्तींचा एक कळप वस्तीला आलाय. त्यात जास्त करून हत्तिणी आणि त्यांची पिल्लं आहेत.














