लोक्खीकांतो महातो. दिसायला देखणे. चालण्या-बोलण्यात रुबाब. वयाच्या ९७ व्या वर्षी देखील स्वच्छ मोकळा आवाज. पाहताक्षणी रबींद्रनाथ टागोरांचा भास व्हावा असं रुप.
२०२२ साली मार्च महिन्यात आम्ही लोक्खीदादूंना भेटलो. पश्चिम बंगालच्या पिर्रामधलं विटा-मातीचं, बिना-गिलाव्याचं एका खोलीचं त्यांचं घर. आपले परमप्रिय मित्र थेलू महातोंशेजारी लोक्खीदादू बसले होते.
तेव्हा थेलूदादूंचं वय होतं १०३ वर्षं. २०२३ साली ते वारले. वाचाः थेलू महातोंची विहीर आणि आठवणींचे आवर्त
या भागातल्या हयात असलेल्या मोजक्या काही स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणजे थेलू दादू. ऐंशी वर्षांपूर्वी ते पुरुलियातल्या पोलिस ठाण्यावर चालून गेले होते. वर्ष होतं १९४२. आणि त्यांच्या भागातल्या चले जाव चळवळीतला हा एक उठाव होता.
पोलिस ठाण्याला घेराव घालण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यात १७ वर्षांहून मोठी मंडळी सामील झाली. त्यामुळे की काय लोक्खी दादू त्या मोर्चात नव्हते कारण त्यांचं वय तेवढं भरत नव्हतं.
आपल्या मनात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेत थेलू दादू किंवा लोक्खी दादू दोघंही बिलकुलच बसत नाहीत. सरकारी आणि उच्चभ्रू समाजाने तयार केलेल्या प्रतिमांमध्ये तर नाहीच नाही. मोर्चांमध्ये खोगीरभरती म्हणून जमा झालेली बिनचेहऱ्याची मंडळी नाहीत ही. आपापल्या विषयाची त्यांना अगदी सखोल जाण आहे. थेलूदादूंसाठी शेती आणि लोक्खीदादूंसाठी गाणं आणि विविध सांस्कृतिक बाबी म्हणजे हातखंडा.


