जसदीप कौरला जेंव्हा चांगला अभ्यास करण्यासाठी स्मार्टफोन विकत घ्यायचा होता, तेंव्हा तिच्या आईवडिलांनी तिला रु. १०,००० उसने दिले. ते पैसे परत देण्यासाठी या १८ वर्षीय मुलीने २०२३ मध्ये आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या भातलावणी करण्यात घालवल्या.
आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेतात काम करणारी ती एकटीच नसून तिच्यासारखे अनेक तरुण दलित विद्यार्थी पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात आहेत.
“आम्ही मजेसाठी शेतात राबत नाही, घरी नाईलाज आहे म्हणून राबतो,” जसदीप म्हणते. तिचं कुटुंब पंजाबमधील मजहबी शीख या अनुसुचित जातीचं आहे; तिच्या समाजातील बहुतांश लोकांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसून ते उच्चवर्णीय शेतकऱ्यांच्या जमिनीत मजुरी करतात.
तिच्या आईवडिलांनी गाय विकत घेण्यासाठी एका सूक्ष्म वित्तीय संस्थेकडून रु. ३८,००० चं कर्ज घेतलं होतं, त्यातून काही पैसे त्यांनी तिला उधार दिले. या गायीचं दूध रु. ४० प्रति लिटर या दराने विकून त्यांच्या घरखर्चात मदत होते. श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील खुंडे हलाल या त्यांच्या गावात रोजगाराच्या संधी दुर्मिळच आहेत – येथील ३३ टक्के गावकरी शेतमजूर आहेत.
जसदीपला जून महिन्यात एका कॉलेजच्या परीक्षेला बसायचं होतं तेंव्हा हा स्मार्टफोन कामी आला – तिने शेतमजुरीतून दोन तासांचा वेळ काढून ही ऑनलाईन परीक्षा दिली. “मला काम सोडणं परवडणार नव्हतं. मी जर काम बुडवून कॉलेजला गेली असती तर माझी त्या दिवशीची मजुरी कापल्या गेली असती,” ती म्हणते.



















