शशी रुपेजांना एका गोष्टीची खात्री आहे. त्यांच्या नवऱ्याचं लक्ष त्यांच्यावर भरतकाम करत असतानाच गेलं असणार. “त्यांनी मला पाहिलं तेव्हा मी फुलकारी भरत असणार. मग काय त्यांना वाटलं असेल की कामाची दिसतीये,” त्या आठवणीत काही क्षण रमलेल्या शशींच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हाताने फुलकारीचं काम सुरूच असतं.

हिवाळ्याचे दिवस आहेत. शशी आणि त्यांची मैत्रीण बिमला घराबाहेर निवांत ऊन खात बसल्या आहेत. अनेक विषयांवरच्या गप्पा मारता मारता हाताने काम सुरूच आहे. गप्पा कितीही असू द्या, टोकदार सुयांचं काम झरझर सुरू असतं आणि नक्षी भरली जात असते.

“एक काळ असा होता, प्रत्येक घरात बाया फुलकारी भरत होत्या,” ५६ वर्षीय शशी सांगतात. त्या पतियाळाच्या रहिवासी आहेत. एका लाल ओढणीवरच्या फुलाचे टाके भरणं सुरू असतं.

विविध प्रकारच्या फुलांच्या विशिष्ट नक्षीला फुलकारी म्हणतात. दुपट्टा, सलवार कमीझ आणि साड्यांवर फुलकारी भरली जाते. नक्षी असलेल्या लाकडी ठशांच्या मदतीने कापडावर शाईने ठसे घेतले जातात. त्या आकारांमध्ये रंगीबेरंगी रेशमी आणि सुती धाग्यांनी भरतकाम केलं जातं.

PHOTO • Naveen Macro
PHOTO • Naveen Macro

शशी रुपेजा (चष्मा घातलेल्या) आपली मैत्रीण बिमला यांच्यासोबत फुलकारी भरतायत

PHOTO • Naveen Macro
PHOTO • Naveen Macro

भरतकाम करून केलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या नक्षीकामाला फुलकारी म्हणतात. उजवीकडेः लाकडी ठशांच्या मदतीने कापडावर नक्षी छापून घेतली जाते

“आमचं त्रिपुरी फुलकारीसाठी प्रसिद्धच आहे,” शशी सांगतात. त्या मूळच्या हरियाणाच्या. लग्नानंतर पंजाबच्या पतियाळात रहायला आल्या. सुमारे १८ वर्षांच्या असताना त्या लग्नानंतर त्रिपुरीमध्ये रहायला आलेल्या आपल्या बहिणीकडे आल्या होत्या. आणि तिथेच फुलकारी भरायला शिकल्या, “तिथल्या बायांचं काम फक्त पाहून,” त्या सांगतात. एक वर्षभराने त्यांचं तिथेच राहणाऱ्या विनोद कुमार यांच्याशी लग्न झालं.

फुलकारी या भरतकामाच्या प्रकारासाठी पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांना २०१० साली जीआय चिन्हांकन मिळालं. या भागातल्या अनेक बाया घरबसल्या काम म्हणून फुलकारी भरतात. २०-२५ कारागीर गटाने भरतकामाचं काम वाटून घेतात आणि घरी बसून पूर्ण करतात.

“आज मात्र हाताने फुलकारी भरणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रिया राहिल्या आहेत,” शशी सांगतात. आता मशीनवर केलेली स्वस्तात मिळणारी फुलकारी सगळीकडे मिळू लागली आहे. आणि तरी देखील बाजारात मात्र या कलेला खूप मोठी मागणी आहे. त्रिपुरीच्या मुख्य बाजारामध्ये फुलकारीची असंख्य दुकानं आहेत. तिथे हाताने भरलेल्या आणि मशीनवरची फुलकारी असलेली अनेक वस्त्रं तुम्हाला मिळू शकतात.

फुलकारीचं काम करून त्यांना पहिली कमाई मिळाली तेव्हा त्यांचं वय होतं २३ वर्षं. त्यांनी १० सलवार कमीझ आणून त्यावर फुलकारी भरून स्थानिक ग्राहकांना विकले होते. त्यातून त्यांना एकूण १,००० रुपये मिळाले होते. फुलकारीच्या या कामाने त्यांना संकटाच्या काळात तरून नेलंय. “मुलांची शिक्षणं होती, इतरही किती तरी खर्च.”

फिल्म पहाः चन्नन दी फुलकारी

शशी यांचे पती शिलाईकाम करायचे आणि धंद्यात त्यांचा जरा घाटा झाला होता. तेव्हाच शशी यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांची तब्येतही हळूहळू साथ देईनाशी झाली आणि मग शशी यांनी काम आपल्या हातात घेतलं. “माझे पती एका यात्रेला गेले होते, तिथून परत आल्यावर त्यांनी पाहिलं की मी दुकानाची सगळी मांडणी बदलून टाकलीये. त्यांना जरा धक्काच बसला,” शशी सांगतात. त्यांचं शिलाई मशीन त्यांनी काढून टाकलं होतं आणि त्या जागी आपले नक्षीकामाचे ठसे, चित्रं आणि धागे आणून ठेवले होते. आणि हे सगळं त्यांनी आपल्या बचत केलेल्या ५,००० रुपयांमधून घेतलं होतं.

आपण भरलेली फुलकारीची वस्त्रं विकण्यासाठी पतियाळाच्या लाहोरी गेटसारख्या वर्दळीच्या भागात गेल्याचं शशी यांना आठवतं. आज त्या फुलकारी भरणाऱ्या अगदी निष्णात कारागीर आहेत. इतकंच काय रेल्वेने ५० किमी प्रवास करून अंबाल्यात जाऊन घरोघरी विक्री केल्याचंही त्यांच्या लक्षात आहे. “माझ्या नवऱ्याच्या मदतीने मी जयपूर, जैसलमेर आणि कर्नालमध्ये फुलकारीची प्रदर्शनं भरवली आहेत,” शशी सांगतात. कालांतराने त्या सगळ्या घाईगोंधळाचा त्यांना कंटाळा आला. आता विक्रीच्या कामात त्या फार लक्ष घालत नाहीत आणि केवळ आवड म्हणून हे काम करतात. त्यांचा मुलगा, दीपांशु रुपेजा, वय ३५ धंदा पाहतो, विक्रीचं आणि पतियाळामध्ये असलेल्या कारागिरांबरोबरचं काम पाहतो.

“मशीनवरची फुलकारी आता सगळीकडे मिळते तरीही हाताने भरलेल्या मालालच आज भरपूर मागणी आहे.” दीपांशु सांगतो. या दोन्ही प्रकारच्या भरतकामातला मुख्य फरक म्हणजे त्यातली सफाई. आणि अर्थात किंमत. हाताने भरलेली फुलकारी २,००० रुपयांपर्यंत विकली जाते आणि मशीनवर भरलेली ५०० ते ८०० रुपयांना.

“किती फुलं भरली आहेत त्यांच्या संख्येवर किंवा नक्षी किती क्लिष्ट आहे त्याप्रमाणे आम्ही कारागिरांना पैसे देतो,” दीपांशु सांगतो. भरतकामाचं कौशल्य किती यावरही मजुरी ठरते. फुलामागे ३ रुपये ते १६ रुपये असा दर असतो.

बलविंदर कौर अशाच एक कारागीर आहेत. दीपांशु त्यांच्यासोबत काम करतो. पतियाळाच्या मियाल गावाच्या रहिवासी असणाऱ्या बलविंदर तिथून ३० किलोमीटरवर असणाऱ्या त्रिपुरीच्या दीपांशुच्या दुकानात महिन्यातून ३-४ वेळा येऊन जातात. रेशीम, धागे आणि फुलकारीची नक्षी छापलेले कपडे भरण्यासाठी त्या घेऊन जातात.

PHOTO • Naveen Macro
PHOTO • Naveen Macro

शशी रुपेजा आपल्या पतीसोबत जोधपूर, जैसलमेर आणि कर्नालमध्ये फुलकारीची प्रदर्शनं भरवायच्या. आता त्यांचा मुलगा दीपांशु धंद्याचं सगळं पाहतो

PHOTO • Naveen Macro
PHOTO • Naveen Macro

बलविंदर कौर एकदम निष्णात कारागीर आहेत. सलवार कमीझवरची शंभरेक फुलं त्या फक्त दोन दिवसांत भरतात

बलविंदर सांगतात की त्या एखाद्या सलवार कमीझवर अगदी दोन दिवसांत १०० फुलं भरू शकतात. “मला कुणी शेजारी बसवून फुलकारी शिकवलेली नाही,” त्या म्हणतात. वयाच्या १९ व्या वर्षापासून त्या हे काम करतायत. “आमच्या घरची ना जमीन होती ना कुणाला सरकारी नोकरी,” बलविंदर सांगतात. त्यांना तीन अपत्यं आहेत. त्यांचे पती मजुरी करायचे. त्यांनी हे काम सुरू केलं तेव्हा त्यांच्या हाताला कसलंच काम नव्हतं.

बलविंदर यांना आजही आपल्या आईचे बोल आठवतात, “ हूं जो तेरी किस्मत है तेनू मिल गया है. हूं कुझ ना कुझ कर, ते खा [तुझ्या नशिबात जे आहे ते तुला मिळालंय. आता दे काम मिळेल ते कर आणि आपलं पोट भर].” त्यांच्या ओळखीच्या एक जण त्रिपुरीतल्या कपडे विक्रेत्यांकडून फुलकारीची कामं घेत असत. “मी त्यांना सांगितलं की मला पैशाची गरज आहे आणि मी एखादी ओढणी भरू का? त्यांनी मला काम दिलं.”

अगदी सुरुवातीला जेव्हा फुलकारी भरण्यासाठी बलविंदर काम घ्यायच्या तेव्हा विक्रेते त्यांच्याकडून काही रक्कम अनामत म्हणून घ्यायचे. कधी कधी त्यांना अगदी ५०० रुपयेसुद्धा ठेवायला लागायचे. पण थोड्याच काळात “विक्रेत्यांना माझ्या कामाची खात्री पटायला लागली,” बलविंदर सांगतात. आज त्रिपुरीतले सगळे फुलकारी विक्रेते त्यांना ओळखतात. “कामाची कमी नाहीये,” त्या म्हणतात. सध्या त्यांच्याकडे महिन्याला १०० कपडे येतात. त्यांना फुलकारी भरणाऱ्या महिलांचा गट केलाय आणि आपल्याला काम मिळालं की त्या या गटाला हे काम देतात. “दुसऱ्यावर विसंबून राहण्याची माझी बिलकुल इच्छा नाही,” त्या म्हणतात.

बलविंदर फुलकारी भरू लागल्या त्याला आता ३५ वर्षं झालीयेत. एका ओढणीचे तेव्हा त्यांना ६० रुपये मिळायचे. नाजूक नक्षी असलेल्या एका ओढणीचे आज त्यांना २,५०० रुपये मिळतात. बलविंदर यांनी भरलेल्या फुलकारीच्या ओढण्या किती तर लोक परदेशी भेट देण्यासाठी म्हणून घेऊन जातात. “माझ्या हाताचं काम किती तरी देशांत पोचलंय – अमेरिका, कॅनडा. मी गेले नाहीये पण माझी कला मात्र परदेशी पोचलीये, यातच आनंद आहे,” त्या अगदी अभिमानाने सांगतात.

या वार्तांकनास मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य मिळाले आहे.

Sanskriti Talwar

ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਤਲਵਾਰ, ਨਵੀਂ ਦਿੱਲੀ ਅਧਾਰਤ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ ਅਤੇ ਸਾਲ 2023 ਦੀ ਪਾਰੀ ਐੱਮਐੱਮਐੱਫ ਫੈਲੋ ਵੀ ਹਨ।

Other stories by Sanskriti Talwar
Naveen Macro

ਨਵੀਨ ਮੈਕਰੋ, ਦਿੱਲੀ ਅਧਾਰਤ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਫ਼ੋਟੋ-ਪੱਤਰਕਾਰ ਅਤੇ ਡਾਕਿਊਮੈਂਟਰੀ ਫ਼ਿਲਮ ਮੇਕਰ ਵੀ ਹਨ। ਉਹ ਸਾਲ 2023 ਦੇ ਪਾਰੀ ਐੱਮਐੱਮਐੱਫ ਫੈਲੋ ਵੀ ਹਨ।

Other stories by Naveen Macro
Editor : Dipanjali Singh

ਦਿਪਾਂਜਲੀ ਸਿੰਘ, ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿਖੇ ਸਹਾਇਕ ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਪਾਰੀ ਲਾਈਬ੍ਰੇਰੀ ਵਾਸਤੇ ਦਸਤਾਵੇਜਾਂ ਦੀ ਖੋਜ ਕਰਨ ਤੇ ਇਕੱਠੇ ਕਰਨ ਵਿੱਚ ਵੀ ਯੋਗਦਾਨ ਪਾਉਂਦੀ ਹਨ।

Other stories by Dipanjali Singh
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale