“ही शाळा,” अतुल भोसलेंच्या आवाजात एक विलक्षण उत्साह होता. ते त्यांच्या वस्तीतली शाळा दाखवत होते. एकमजली, जेमतेम दोन खोल्यांचं शाळेचं बांधकाम. वळणवळणाच्या पायवाटेतून वाट काढत गेलं की पहिली नजर शाळेवरच जाते. भोवताली नजर टाकली तर नुसती ओसाड जमीन. तिथून एका किलोमीटरहूनही कमी अंतरावर वस्ती लागते. महाराष्ट्रातल्या गुंडेगाव गावाच्या हद्दीबाहेरची अतुल यांची पारध्यांची ही वस्ती आणि त्यांना अभिमान वाटणारी त्यांची शाळा.
फिटक पिवळ्या रंगाची पक्क्या बांधकामाची शाळा. तिच्या भडक निळ्या खिडक्या, भिंतींवरची हास्यचित्रं आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा – अगदी आकर्षक. जवळची वस्ती म्हणजे मात्र काही विटा-मातींची तर काही नुसत्याच ताडपत्रीच्या झोपड्या असलेली २० घरं.
“आता, आमच्याकडं विकास म्हनजे ही शाळाच. विकासाची निशानी, ” ४६ वर्षांचे अतुल त्यांच्या पाउतकावस्तीची कैफियत सांगू लागतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर तालुक्यात आहे ही वस्ती.
“दुसरं काय पण नाय. वस्तीत यायला रस्ता नाय, पानी नाय, लाइट नाय की पक्की घरं नायत. शाळाच हाय. जवळ. लेकरं जाऊन लिहायला-वाचायला तरी शिकत्यात,” ते म्हणतात. आपल्या वस्तीतल्या या शाळेचा अतुल यांना अभिमान वाटतो. त्यांची मुलं साहिल आणि शबनम वस्तीतल्या इतर सात मुली आणि नऊ मुलांसोबत इथेच शिकतात.
पण आता हीच शाळा शासनाने दुसरीकडे हलवून दुसऱ्या शाळेला जोडायचं ठरवलं आहे. असं झालं तर दारिद्र्यरेषेच्या पार खाली असलेल्या या समुदायासाठी हा धक्कादायक निर्णय आहे. भटकंती करून जगणारे, विमुक्त जमात असणारे पारधी महाराष्ट्रात अनुसूचित जमातीत येतात.
दीडशे वर्षाहून अधिक काळ या जमातीला भेदभाव सहन करत वंचित रहावं लागलं आहे. पारधी आणि इतर आदिवासी जमाती तसंच इतरही काही जातसमुदायांवर इंग्रज सरकारने गुन्हेगार जमात कायद्याखाली ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारला. हा १८७१ सालचा गुन्हेगार जमात कायदा आणि त्यात नंतरच्या काळात झालेल्या सुधारणांच्या आधारे २०० हून जास्त समुदायांना “गुन्हेगार जमात” जाहीर करण्यात आलं – यातही ज्यांना ब्रिटीश राजवट मंजूर नव्हती अशांचाच समावेश होता. पारधी ही त्यापैकीच एक जमात होती. म्हणजेच या जमाती जन्मतःच गुन्हेगार असून गुन्हे करणे हाच त्यांचा व्यवसाय आहे हा या कायद्याचा मथितार्थ. १९५२ साली स्वतंत्र भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि या जमातींना ‘विमुक्त’ केलं. मात्र गुन्हेगारीचा ठपका तसाच राहिला. इतरांप्रमाणे रोजगाराचा हक्क लांबची बाब झाली. शाळेत जाऊ पाहणाऱ्या त्यांच्या मुलांनाही मारहाण आणि धमकावण्याचे प्रकार होऊ लागले.
















