शासन का बरं कदर करत नाही आमच्या मेहनतीची?,”अंगणवाडी सेविका मंगल कर्पे विचारतात.
“देशाला निरोगी, सुदृढ ठेवण्यात आमचा मोठा हातभार लागतो,” मंगलताई आपल्यासारख्या अनेक अंगणवाडी सेविकांच्या योगदानविषयी सांगू लागतात. मंगलताईंसारख्या अंगणवाडी सेविका शासकीय योजना आणि गरोदर, स्तनदा मातांसह त्यांच्या लहान मुलांमधला महत्त्वाच्या दुवा आहेत.
३९ वर्षांच्या मंगलताई अहमदरनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात डोऱ्हाळे गावात अंगणवाडी चालवतात. राज्यभरात त्यांच्यासारख्या २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास (ICDS) यंत्रणेअंतर्गत येणारे आरोग्य, पोषण आणि लहानग्यांच्या शिक्षणासारखे सर्व उपक्रम खेड्या-पाड्यांमध्ये राबवण्याची जबाबदारी त्या पार पाडतात.
त्यांच्या ह्याच कर्तव्यदक्षपणाकडे काणा डोळा करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर, २०२३ पासून अंगणवाडी सेविकांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे.
“आम्ही याधीही बरीच आंदोलनं केलीत,” मंगलताई सांगतात. “आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून ओळख हवी आहे. आम्हाला दरमहा २६,००० [रुपये] पगार हवा आहे. आम्हाला निवृत्तीवेतन हवे आहे, प्रवास आणि इंधन भत्ता हवा आहे,” त्या प्रमुख मागण्या एकामागोमाग सांगू लागतात.












