२८ फेब्रुवारी २०२३. संध्याकाळचे सहा वाजलेत. एखादं चित्र काढावं इतक्या सुंदरशा खोलदाडा गावात, क्षितिजावर सूर्य मावळतीला गेलाय. ३५ वर्षीय रामचंद्र दोडके रात्रीची तयारी सुरू करतो. दूरवेर प्रकाशाचा झोत टाकणारी आपली कमांडर बॅटरी नीट आहे ना पाहत तो अंथरुण पांघरुण गोळा करतो.
घरी त्याची बायको जयश्री रात्रीचा स्वयंपाक करतीये. डाळ आणि शाक भाजी. शेजारी त्याचे काका ७० वर्षीय दादाजी देखील रात्रीच्या तयारीला लागलेत. त्यांच्या पत्नी शकुबाईंनी भात घातलाय आणि चपात्या होतायत. त्यांच्या शेतातल्या या भाताचा सुगंध हवेत भरून राहिलाय.
“चला, झाली तयारी,” रामचंद्र म्हणतो. “स्वयंपाक झाला की निघायचं.” जयश्री आणि शकुबाई दोघांना जेवण बांधून देणार असल्याचंही ते सांगतात.
दोडके कुटुंबाच्या या दोन पिढ्या. माना आदिवासी असलेल्या या कुटुंबाचा आज मी पाहुणा होतो. दादाजी बाबासाहेब आंबेडकरांचे पक्के अनुयायी आणि कीर्तनकार. आणि हो, शेतकरी. रामचंद्र कुटुंबाच्या पाच एकर शेतीचं सारं पाहतो. कारण त्याचे वडील भिकाजी, दादाजींचे थोरले बंधू आताशा आजारी असतात आणि शेती त्यांच्याच्याने होत नाही. भिकाजी कधी काळी पोलिस पाटील होते. गावकरी आणि पोलिसांमधला दुवा.
नागपूरच्या भिवापूर तालुक्यातल्या खोलदाडा गावापासून काही मैलाच्या अंतरावर दोडकेंचं शेत. आम्ही तिथेच निघालो होतो, जागलीवर. जागल म्हणजे उभी पिकं जंगली प्राण्यांपासून वाचवण्यासाठी रात्रभर जागून केलेली राखण.
शहरी लोकांना हे अगदी साहसी पर्यटन वाटू शकतं पण माझ्या यजमान दोडके कुटुंबाला मात्र वर्षभरच हे करणं भाग आहे. रब्बीतली मिरची, तूर, गहू आणि उडीद काढणीला आलाय आणि पिकं वाचवायलाच पाहिजेत.
दादाजींचं रान दुसरीकडे आहे पण ते आज रात्री रामचंद्रच्या शेतात जागलीला आले आहेत. आमच्यासोबत कदाचित शेकोटीभोवती बसून जेवतील. थंडीचा कडाका संपू लागलाय आणि रात्रीचं तापमान १४ अंशापर्यंत असावं. रामचंद्र सांगतो की २०२२ चा डिसेंबर आणि २०२३ चा जानेवारी म्हणजे कडाक्याची थंडी होती. रात्री पारा अगदी ६-७ अंशावर खाली येत होता.
जागलीसाठी घरातल्या एकाला तरी रानात थांबावं लागतं. दिवसाचे २४ तास असं काम करायचं, रात्रीची थंडी सहन करायची. त्यामुळे गावातली किती तरी मंडळी आजारी पडली होती. पुरेशी झोप नाही, पिकांची चिंता आणि थंडीमुळे ताप, डोकेदुखी मागे लागली असल्याचं रामचंद्र सांगतो. त्याच्या अनेक समस्यांपैकी ही एक.
आम्ही निघणार तेवढ्यात दादाजी आपल्या बायकोला मानेचा पट्टा द्यायला सांगतात. “डॉक्टरांनी सतत वापरायला सांगितलाय,” ते सांगतात.
आता त्यांना मानेच्या पट्ट्याची काय गरज? माझा प्रश्न.
“जरा दमा. अख्खी रात आहे ना गप्पा मारायला.”
रामचंद्र मात्र हसून कोडं सोडवून टाकतो. “काही महिन्यांपूर्वी म्हातारा ८-फूट उंच मचाणावरून खाली पडला ना. नशीब जोरावर आहे, म्हणून आज आपल्याशी बोलतोय. नाही तर काही खरं नव्हतं.”
*****
खोलदोडा भिवापूर तालुक्याच्या अळेसुर ग्राम पंचायतीत येतं. नागपूरपासून १२० किलोमीटरवर असलेलं हे गाव चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या जंगलांच्या काठावर. हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा वायव्येकडचा भाग.
विदर्भातल्या वनक्षेत्रात असलेल्या शेकडो गावांप्रमाणे खोलदोड्यातही जंगली प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतमाल आणि गाई-गुरांवर संक्रांत आली आहे. बहुतेक शेतांना कुंपणं दिसत असली तरी रात्रीची जागल जगण्याचा भाग झालीये.
दिवसभर शेतातली नेहमीची कामं करायची आणि रात्री, खास करून पिकं काढणीला येतात तेव्हा प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी उभी पिकं श्वापदांच्या तोंडी जाऊ नयेत म्हणून शेतात मुक्काम करतं. ऑगस्ट ते मार्च या काळात कोणतं ना कोणतं पीक शेतात असतंच, तेव्हा जागल करावीच लागते. आणि एरवीही, गरज लागली तर.
मी आज दुपारी गावात आलो तेव्हा सगळीकडे स्मशानशांतता पसरलेली होती. कुठल्याच शेतात माणूस नाही, सगळ्या शेतांना नायलॉनच्या नऊवारी साड्यांची कुंपणं. दुपारचे चार वाजलेत. गावातल्या गल्ल्याही एकदम निर्जन, ओसाड. म्हणायला चार-दोन कुत्री तेवढी दिसली.
“दुपारी २ ते ४.३० गावात सगळे निजलेले असतात. रात्री झोप मिळेल का नाही कुणी सांगू शकत नाही,” मी ही अशी शांतता का असं विचारायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा दादाजीच मला म्हणाले होते.
“दिवसभर शेतात चकरा मारायच्या. २४ तासाची नोकरी असल्यासारखं काम झालंय,” ते म्हणतात.
तिन्ही सांजा झाल्या की गावात पुन्हा एकदा लगबग सुरू होते. बाया स्वयंपाकाला लागतात आणि गडी रात्रीच्या जागलीच्या तयारीला. गुराख्यांबरोबर गायी जंगलातून सांजेला घरी परततात.
एकशे आठ उंबरा असलेलं खोलदोडा हे गाव ताडोबा वनक्षेत्रात येतं. सभोवताली साग आणि आणि इतर वृक्षांचं घनदाट जंगल आहे. गावात बहुतांश लोक माना या आदिवासी समुदायाचे आणि मोजकी घरं दलितांची (बहुतांश महार) आहेत.
गावाचं शिवार ११० हेक्टरवर पसरलं असून माती काळी आणि सुपीक असली तरी शेती पण पावसावर अवलंबून. पिकांमध्ये धान आणि द्विदल धान्यं घेतली जातात. काही जण गहू, भरड धान्यं आणि भाजीपाला देखील पिकवतात. इथे लोक आपल्याच शेतात काम करतात. जोडीला जंगलातलं गौण वनोपज आणि मजुरी. गावातली काही तरुण मंडली पोटापाण्यासाठी शहरात गेली आहेत कारण शेतीतून सगळ्यांचं भागेनासं झालं आहे. दादाजींचा मुलगा पोलिस शिपाई असून नागपूरमध्ये असतो. काही जण मजुरीच्या शोधात भिवापूरला जातात.
*****
रात्रीचा स्वयंपाक होत होता तोपर्यंत आम्ही गावात काय हाल हवाल पहायला म्हणून एक चक्कर मारायला गेलो.
आमची भेट तीन बायांशी झाली. शकुंतला गोपीचंद नन्नावरे, शोभा इंद्रपाल पेंदाम आणि पर्बता तुळशीराम पेंदाम. तिघी पन्नाशी पार केलेल्या. त्या जरा लवकरच रानात निघाल्या होत्या. सोबतीला एक कुत्रं. “भीती तर वाटतेच ना, पण का करावं?” घरचं काम, शेतात मजुरी वर रात्रीची जागली असं सगळं करणं कष्टाचं नाही का या माझ्या प्रश्नावर शकुंतलाताई सांगतात. रात्री त्या एकमेकीच्या सोबतीने रानात चक्कर मारतील.
दादाजींच्या घरासमोर, गावातल्या रस्त्यावर गुणवंता गायकवाड आपल्या मित्रांशी गप्पा मारताना दिसतात. “तुमचं नशीब असेल तर वाघ दिसणार तुम्हाला,” त्यातला एक जण म्हणतो. “आम्हाला काय, रानातून वाघ सारखेच इथून तिथे जात असतात,” गुणवंता म्हणतात.
आम्ही गावाचे उपसरपंच राजहंस बनकर यांची त्यांच्या घरी भेट घेतो. ते रात्रीचं जेवण उरकून शेतात जाणार. दिवसभराच्या कामानंतर ते थकून गेले आहेत. बनकर ग्राम पंचायतीचा सगळा कारभार पाहतात.
नंतर आम्हाला सुषमा घुटके भेटतात. गावाच्या सध्याच्या पोलिस पाटील असलेल्या सुषमा ताई आपले पती महेंद्र यांच्यासोबत गाडीवर मागे बसून रानात निघाल्या आहेत. त्यांनी सोबत डबा, एक-दोन रग, काठी आणि दूरवर प्रकाशझोत टाकणारी बॅटरी घेतलीये. वाटेत किती तरी जण शेताकडे निघालेले दिसतात. हातात काठ्या, बॅटऱ्या आणि पांघरुणं.
“चला आमच्या बरोबर,” सुषमा ताई हसत हसत त्यांच्या शेतात येण्याचं निमंत्रण देते. “रात्री चिक्कार गोंधळ ऐकायला मिळेल तुम्हाला,” ती म्हणते. “रात्री दोन-अडीचपर्यंत जागे राहिलात ना, सगळी लगबग पहायला मिळते.”
रानडुकरं, नीलगायी, हरणं, सांबर, मोर, ससे – सगळे प्राणी रात्रीच खायला शेतात येतात. कधी कधी तर वाघ आणि बिबट्याही पहायला मिळत असल्याचं ती सांगते. “आमची शिवारं प्राण्यांचीच आहेत हो,” सुषमाताई मजेत म्हणते.
इथून थोडी घरं सोडली की आत्माराम सावसाखळेंचं घर लागतं. पंचावन्न वर्षीय सावसाखळे राजकारणी आहेत, वाडवडलांकडून आलेली त्यांची २३ एकर जमीन असून तेही जागलीच्या तयारीत आहेत. त्यांचे मजूर शेतात पोचले पण असतील, ते म्हणतात. “आता इतकं मोठं रान एकट्याने कसं राखावं?” ते म्हणतात. त्यांच्या रानात किमान सहा-सात मचाणं दिसतात. शेतात वेगवेगळ्या पट्ट्यात वेगवेगळी पिकं आहेत. त्यावर नजर ठेवता यावी म्हणून ही सोय केलेली आहे. सध्या त्यांच्या रानात गहू आणि हरभरा आहे.
रात्रीचे साडेआठ वाजेतोवर खोलदाड्यातली बहुतेक घरं रात्रीसाठी त्यांच्या दुसऱ्या घरी मुक्कामाला गेली आहेत –कुठे, तर आपल्याच शेतात.
*****
रामचंद्रने देखील आपल्या शेतात किती तरी मचाण उभारली आहेत. त्यात बसलं की तुम्हाला एकमेकांचे आवाज तर ऐकू येतात पण तुम्हाला कुणी दिसत नाही. तिथे तुम्ही निवांत एखादी डुलकी काढू शकता. सात-आठ फूट उंच, लाकडाचे खांब आणि त्यावर लाकडी बैठक. छप्पर म्हणून पेंढा किंवा ताडपत्री. काही काही मचाणात दोन माणसं मावू शकतात. पण बहुतेक एकाच माणसासाठी तयार केली जातात.
भिवापूरच्या जंगलाला लागून असलेल्या या भागामध्ये इतके वेगवेगळ्या तऱ्हेचे मचाण पहायला मिळतात की थक्क व्हावं. रात्र रात्र जागलीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमधली वास्तुकलाच पहायला मिळते आपल्याला.
“यातलं कुठलं पण एक मचाण निवडा,” ते मला सांगतात. रानाच्या मध्यात असलेलं मचाण मी निवडलं. हरभरा तयार व्हायला असल्याने राखणीसाठी तिथे ते उभारलेलं होतं. छताला पेंढा असलेल्या मचाणात उंदीर येणार अशी माझ्या मनात शंका. आम्ही चढू लागलो आणि ते डुलायला लागलं. रात्रीचे ९.३० वाजले होते. आम्ही सगळे एका शेकोटीभोवती बसलो. थंडी वाढत होती. बाहेर काळाकुट्ट अंधार. आकाश मात्र निरभ्र.
जेवता जेवता, दादाजी बोलू लागतातः
“चार महिने झाले असतील. एका रात्री मी बसलो होतो आणि अचानक, मध्यरात्री मचाण आलं की खाली. सात फुटावरून मी थेट जमिनीवर पडलो, डोक्यावर. मानेला आणि पाठीला जबर मार बसला.”
हे सगळं झालं अडीच वाजता. नशिबाने खाली कडक जमीन नव्हती. पण दादाजी सांगतात ते पुढचे दोन तास तसेच पडून होते. एक तर पडल्यामुळे ते धास्तावले होते धक्का बसलेला आणि खूप वेदनाही होत होत्या. मचाण उभारलं होतं त्यातलं एक मेडकं रोवलं होतं तिथली माती सैल झाली आणि ते हललं.
“मला काही जागचं हलता येईना. मदतीला पण कुणी नाही.” रात्री जागलीवर तुमच्यासोबत कुणीही नसतं. आजूबाजूच्या रानात लोक राखणीला आलेले असले तरी. “मला वाटलं, संपलं आता सगळं,” ते म्हणतात.
पहाटे पहाटे ते कसेबसे उभे राहिले, मान आणि पाठ प्रचंड दुखत असतानाही ते चालत घरी गेले. दोन-तीन किलोमीटर अंतर, चालत. “मी घरी पोचल्यावर घरचे, दारचे सगळेच धावत मदतीला आले,” दादाजींच्या पत्नी शकुबाईंचं तर अवसानच गळालं.
रामचंद्र त्यांना भिवापूरला घेऊन गेला, तिथनं त्यांना नागपूरच्या एका खाजगी दवाखान्यात हलवलं. त्यांच्या मुलाने दवाखान्याची सगळी सोय केली.
क्ष किरण तपासणी आणि एमआरआयमध्ये मेंदूला धक्का बसल्याचं निदान झालं. नशीब म्हणजे कुठेही हाडाला इजा झाली नव्हती. या अपघातानंतर उंच्यापुऱ्या, किरकोळ अंगकाठी असणाऱ्या दादाजींना जास्त काळ बसून राहिलं किंवा उभं राहिलं तर घेरी येते. त्यामुळे ते निजून राहतात. आणि भजनं गातात.
“जागलीची अशी किंमत मोजावी लागली मला? आणि का बरं? कारण मी पिकं राखली नाहीत तर ते जंगलातले प्राणी येतील आणि शेतातून माझ्या हाती काहीही लागणार नाही,” ते मला सांगतात.
आपल्या तरुणपणी अशी जागली करायची गरजच नसल्याचंही ते सांगतात. गेल्या वीस वर्षांत जंगली प्राण्यांचे हल्ले वाढले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जंगलं आकसत चालली आहेत आणि आहे त्या क्षेत्रात जंगलातल्या श्वापदांना पुरेसं पाणी आणि शिकार मिळत नाहीये, ते म्हणतात. शिवाय त्यांची संख्याही वाढत चाललीये. आणि याच कारणाने हजारो शेतकरी रात्री डोळ्याला डोळा लागू देत नाहीत आणि आपली पिकं या ‘चोरांपासून’ जपण्यासाठी जागलीवर जातायत.
अपघात, वन्यप्राण्यांचे हल्ले, उंचावरून पडणं, अपुरी झोप या सगळ्याचा परिणाम म्हणजे मानसिक आणि शारीरिक आजारपणं. फक्त खोलदोड्याच्या नाही तर विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी हेच आता नित्याचं झालंय. खिळखिळ्या शेती व्यवस्थेचा पाय आणखी खोलात चाललाय.
गेल्या दोनेक वर्षांत मी गावाकडे फिरत असताना माझ्या लक्षात येतंय की स्लीप अपनिया या आजाराने शेतकऱ्यांच्या चिंताग्रस्ततेत भर पडली आहे. या आजारामध्ये झोपेत तुमचा श्वास क्षणभर थांबतो आणि परत सुरू होतो.
“शरीरावर खूप परिणाम होतात – दिवसभर कष्ट करायचे आणि रात्रीसुद्धा धड झोप मिळत नाही,” रामचंद्र आपली कैफियत मांडतो. “कधी कधी तर एक दिवससुद्धा शेत सोडता येत नाही.”
तुम्ही भात किंवा डाळी, मसूर वगैरे खात असाल ना तर इतकाच विचार करा की हे धान्य जंगली प्राण्यांच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी कुण्या तरी शेतकरी बाई किंवा गड्याने रात रात जागून हे पीक राखलंय.
“आम्ही भोंगे वाजवतो, आगाटी करतो, शेतांना कुंपणं घालतो. इतकं करूनही तुम्ही शेतात नसाल तर जे काही पेरलंय ते गेलं म्हणून समजा,” रामचंद्र सांगतो.
*****
जेवण झाल्यानंतर आम्ही रामचंद्रच्या मागोमाग एका रांगेत चालत निघालो. शेतांच्या गोधडीतून माग काढण्यासाठी, काळ्याकुट्ट अंधाराला भेदत जाणारा विजेरीचा प्रकाश फक्त सोबत होता.
रात्रीचे ११ वाजले आणि आम्हाला लोकांचे हाकारे ऐकू येऊ लागले. “ओय...ओय...ई....” काही अंतरावर अधून मधून हे आवाज येतच होते. शेतात घुसू पाहणाऱ्या जंगली प्राण्यांना घाबरवण्यासाठी आणि आम्ही इथे आहोत हे सांगण्यासाठी लोकांचे हे हाकारे सुरू होते.
रामचंद्र जेव्हा एकटा असतो तेव्हा तो दर तासाने शेतात चक्कर टाकून येतो. हातात लांब आणि जाडजूड काठी असते. मध्यरात्री २ ते पहाटे ४ या दोन तासांत तर डोळ्यात तेल टाकून पहारा द्यावा लागतो. कारण तेव्हाच जंगली प्राणी सगळ्यात जास्त बाहेर येतात. डोळ्याला डोळा जरी लागला तरी लक्ष शेतावर ठेवण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न असतो.
मध्यरात्रीच्या सुमारास गावातला एक जण आम्हाला सांगायला येतो की अळेसुरमध्ये रात्रभर कबड्डीचे सामने सुरू आहेत. मग काय, आम्ही सामन्याला हजर. दादाजी रामचंद्रच्या मुलासोबत शेतातच थांबतात. वाहनावर १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अळेसुरला आम्ही निघतो.
एकूण २० चमू या स्पर्धेसाठी आले होते, रात्रभर सामने चालणार आणि अंतिम सामना सकाळी १० वाजता होणार होता. गावकरी रात्रभर कधी शेतात तर कधी कबड्डीच्या सामन्याला अशा वाऱ्या करणार
तिथे जाईपर्यंत आम्हाला वाटेत रानडुकरांचा एक कळप लागला, त्यांच्या मागे दोन कोल्हे. काही वेळाने हरणांचा एक कळप जंगलाच्या एका भागात पळत गेला. वाघाचा मात्र मागमूस नाही.
अळेसुरमध्ये बरीच गर्दी गोळा झाली होती. जवळच्याच गावातल्या अगदी कट्टर ‘वैरी’ असलेल्या दोन गटांमध्ये सामना रंगला होता. आणि हवाही त्यामुळे भारल्यासारखी वाटत होती. एकूण २० चमू या स्पर्धेसाठी आले होते, रात्रभर सामने चालणार. अंतिम सामना सकाळी १० वाजता होणार होता. गावकरी रात्रभर कधी शेतात तर कधी कबड्डीच्या सामन्याला अशा वाऱ्या करणार हे नक्की.
जवळपास वाघ असल्याची मोलाची माहिती ते एकमेकांना देतात. “जपून रहा बरं,” एक जण रामचंद्रला सांगतो. अळेसुरच्या कुणाला तरी संध्याकाळीच त्याचं दर्शन झालेलं असतं.
वाघ दिसणं हे एखाद्या गूढकथेसारखं आहे.
थोडा वेळ तिथे थांबून आम्ही परत रामचंद्रच्या शेतात परततो. मध्यरात्र आहे. २ वाजलेत. त्याचा मुलगा आशुतोष खोपीशेजारच्या खाटेवर झोपी गेलाय. दादाजी त्याच्यावर लक्ष ठेवत शांत बसून आहेत. शेकोटीचा जाळ सारत बसलेत. आम्ही दमलोय पण झोप आली नाहीये. मग आम्ही शेतात आणखी एकदा चक्कर मारून येतो.
दहावीनंतर रामचंद्रने शिक्षण सोडलं. इतर काही काम असतं तर त्याने शेती केलीच नसती असं तो सांगतो. त्याने आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी नागपूरला हॉस्टेलला ठेवलंय कारण त्यांनी शेतीत पडू नये अशीच त्याची इच्छा आहे. आशुतोष सध्या सुट्ट्यांसाठी घरी आलाय.
आणि अचानक सगळीकडून जोरजोरात आवाज येऊ लागतात. शेतकरी हातातल्या थाळ्या बडवत, घसा फुटेस्तोवर आरोळ्या देतायत. जंगली प्राण्यांना घाबरवण्यासाठी रात्रभर अधून मधून ते असा गोंगाट करत राहणार.
माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून दादाजी हसू लागतात. रामचंद्रसुद्धा. “तुम्हाला नवल वाटत असेल,” ते म्हणतात. “पण इथे रात्रभर हे असंच चालतं. कुठला काही प्राणी जवळून जात असल्याचं जाणवलं की शेतकरी आरडाओरडा सुरू करतात.” पंधरा मिनिटांनंतर सगळा गोंगाट शांत होतो.
मला वाटतं, पहाटे ३.३० च्या सुमारास, चांदण्यांनी लखडलेल्या खुल्या आभाळाखाली आम्ही आपापल्या झुलत्या मचाणांकडे जातो. किड्यांची किरकिर वाढू लागते. मी मचाणात आडवा होतो. अगदी पाठ टेकवण्यापुरती जागा असते. फाटलेली ताडपत्री वाऱ्यामुळे हलत राहते. चांदण्या मोजत मोजत मी झोपी जातो. झोपेतही मला अधून मधून मला लोकांचे हाकारे आणि गोंगाट ऐकू येत राहतो. अगदी तांबडं फुटेपर्यंत. मचाणावरून मी निवांतपणे आजूबाजूची हिरवीगार शेतं आणि त्यावरचे दवाचे मोती मोदत राहतो.
रामचंद्र आणि दादाजी बऱ्याच आधी उठलेत. दादाजी शेतातल्या संत्र्याच्या एकमेव झाडाची फळं काढून मला देतात. घरी न्यायला म्हणून.
रामचंद्र शेतात झर्रकन एक चक्कर मारून येतो आणि मीही त्याच्या मागोमाग जातो. कुठे काही पिकांची नासधूस झाली आहे का ते तो पाहून घेतो.
आमही गावात परतलो तेव्हा सकाळचे ७ वाजले होते. रात्री काही नुकसान झालं नाही हे नशीब समजा असं तो म्हणतो.
नंतर जेव्हा शेतात जाईल तेव्हाच खरं तर रात्री शेतात कुणी प्राणी येऊन गेले का ते त्याला नक्की समजेल.
तर, मी माझ्या यजमानांचा निरोप घेतो. त्यांच्या शेतातल्या नुकताच सडलेला सुवासिक तांदूळ मला भेट म्हणून मिळतो. हाच तांदूळ हाती यावा यासाठी रामचंद्रने आजवर किती तरी रात्री जागून काढल्या आहेत.
मी अखेर परतीची वाट धरतो. खोलदोडा मागे पडतं. जागलीनंतर शेतातून आपापल्या घरी परतणारे पुरुष आणि बाया नजरेस पडतात. माझं साहसी पर्यटन इथेच संपतं. त्यांचा कष्टाने भरलेला दिवस मात्र आता कुठे सुरु होतोय.