“आज सहावा दिवस आहे, मी एकही मासा न पकडता घरी जाणार आहे,” वुलर तलावाच्या काठावर उभे असलेले अब्दुल रहीम कावा सांगतात. ६५ वर्षीय कावा आपल्या पत्नी आणि मुलासह एकमजली घरात राहतात.
बांदीपोर जिल्ह्यातल्या कानी बाठी भागात स्थित अणि झेलम व मधुमती नदीच्या प्रवाहातून तयार झालेले, वुलर हे आसपास राहणाऱ्या लोकांसाठी उपजीविकेचं एकमेव साधन आहे. या तलावाकाठी अंदाजे १८ गावं वसलेली आहेत आणि किमान १०० कुटुंबे प्रत्येक गावात वास्तव्यास आहेत.
अब्दुल सांगतात, “मासेमारी हेच अपजीविकेचं साधन आहे. पण तलावात पाणी नाही. आम्ही आता पाण्यातून जाऊ शकतो कारण, कोपऱ्यांमध्ये ते फक्त चार किंवा पाच फूट खोल आहे,” ते काठाकडे हात दाखवून बोलत होते.
तिसऱ्या पिढीतले मच्छिमार अब्दुल गेल्या ४० वर्षांपासून उत्तर काश्मीरमधल्या या तलावात मासेमारी करत आहेत त्यांना हे माहीत असेल. “मी लहान असताना माझे वडील मला सोबत घेऊन जायचे. त्यांना पाहून मी मासे पकडायला शिकलो,” ते सांगतात. अब्दुलच्या मुलानेही हा कौटुंबिक व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे.
अब्दुल आणि त्यांचे सहकारी रोज सकाळी वुलरला जातात आणि त्यांच्या झाल म्हणजे नायलॉनच्या धाग्याने विणलेले जाळे घेऊन तलावात जातात. पाण्यात जाळे फेकून, मासे पकडण्यासाठी कधीकधी ते हाताने तयार केलेली डफली वाजवतात.
वुलर हे आशिया खंडातली सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे, परंतु गेल्या चार वर्षात पाण्यातल्या प्रदुषणामुळे वर्षभर मासेमारी करणं जवळजवळ अशक्य झालं आहे. “पूर्वी आम्ही वर्षातून किमान सहा महिने मासे पकडायचो, पण आता आम्ही फक्त मार्च आणि एप्रिलमध्ये मासेमारी करतो,” अब्दुल सांगतात.


