गावातल्या पोस्ट ऑफिसचे दरवाजे किरकिर करत उघडतात आणि आम्हाला तिथे येताना पाहून तिथले पोस्टमन स्वतःच खिडकीतून डोकावून पाहतात.
रेणुका प्रसाद अगदी हसून आमचं
पोस्टात स्वागत करतात. घरातल्या एका खोलीचं हे पोस्ट ऑफिस. दिवाणखान्यातल्या एका
दरवाज्यातून आम्ही आत जातो. या छोट्याशा खोलीत आत शिरल्या शिरल्या कागद आणि शाईचा
वास नाकात भरून जातो. रेणुका प्रसाद त्या दिवशीचं शेवटचं टपाल गठ्ठ्यात ठेवत होते.
हसतच ते मला बसायची खूण करतात. “ये, ये. अगदी निवांत बस.”
बाहेरचा गरमा इथे त्यांच्या घरात आणि
पोस्टात जाणवत नाही. एका खिडकीतून अधून मधून वारा आत येतो. चुनासफेदी केलेल्या
भिंतींवर हाताने तयार केलेली काही पोस्टर, नकाशे आणि अनेक याद्या टांगलेल्या
दिसतात. खोली छोटीच, पण नीटनेटकी. आणि इतकी महत्त्वाची जागा तशीच असायला पण हवी
ना. एक बाक आणि टपाल ठेवण्याचं फडताळ यातच खोलीतली बरीचशी जागा व्यापून गेलीये.
तरीही तिथे गर्दी वाटत नाही.
चौसष्ट वर्षीय रेणुकाप्पा तुमकुर
जिल्ह्याच्या देवरायपटणामध्ये ग्रामीण डाक सेवक आहेत. तिथली सहा गावं त्यांच्या
अखत्यारीत येतात.
देवरायपटणामधल्या या पोस्टाची अधिकृत
वेळ सकाळी ८.३० ते १ अशी असली तरी रेणुकाप्पा मात्र अनेकदा सकाळी ७ वाजताच काम
सुरू करतात ते पार ५ वाजेपर्यंत. ते एकटेच इथे कामाला आहेत. “इतकं सगळं काम
साडेचार तासात पूर्णच होऊ शकत नाही,” ते सांगतात.
तुमकुर तालुक्यातल्या जवळच्याच बेलगुंबाहून पत्रं, मासिकं आणि इतर कागदपत्रांनी भरलेली टपालाची पिशवी येते आणि त्यांचं काम सुरू होतं. सर्वात आधी सगळ्या टपालाची नोंद करून मग ते टपाल टाकायला निघतात, ते थेट २ वाजेपर्यंत. देवरायपटणा, मारनायकपालय, प्रशांतनगरा, कुंदुरु, बंडेपालय आणि श्रीनगरा या गावांमध्ये ही सगळी गावं सहा किमीच्या परिसरात येतात. तिथे ते टपाल पोचतं करून येतात. ते त्यांच्या पत्नी रेणुकांबांसोबत राहतात. त्यांना तीन मुली आहेत, त्या आता त्यांच्यासोबत राहत नाहीत.
ज्या गावांना त्यांना जावं लागतं
त्या गावांचा एक हाताने तयार केलेला नकाशा त्यांनी मेजाच्या वर लावला आहे. त्यावर
त्या गावांचं अंतर आणि कन्नडमध्ये चार दिशादर्शक खुणा नोंदवलेल्या आहेत. खाली
नकाशाची सूचीदेखील हाताने लिहिलेली आहे. पूर्वेला २ किलोमीटरवर असलेलं मारनायकपालय
सगळ्यात जवळचं गाव. प्रशांतनगरा, पश्चिमेला अडीच किमीवर,
कुंदुरु आणि बांदेपाल्या अनुक्रमे उत्तरेला आणि दक्षिणेला तीन किमीवर. आणि
श्रीनगरा ५ किमीवर.
ऊन असो वा पाऊस, या पोस्टातले एकमेव
पोस्टमन असलेले रेणुकाप्पा पत्र घरपोच पोचवणारच.
आणि हा सगळा प्रवास ते त्यांच्या एका
जुन्या सायकलवर करतात – गोष्टी-सिनेमांमध्ये पाहिलेल्या पोस्टमनसारखेच. सायकलवर
गावात येणारे, त्यांना पाहून पळत येणाऱ्या लोकांशी हसून बोलणारे रेणुकाप्पा.
“रेणुकाप्पा, घरी पूजा आहे, नक्की या!” त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या एक मावशी त्यांना निमंत्रण देऊन जातात. ते हसतात आणि मानेनेच होय अशी खूण करतात. गावातले आणखी एक काका तिथनं जातात आणि जाता जाता त्यांना रामराम करून जातात. रेणुकाप्पा देखील हसून हात हलवतात. गावकरी आणि त्यांचं नातं अगदी जिव्हाळ्याचं असल्याचं सहज जाणवतं.
ते दररोज टपाल वाटत अंदाजे १० किमी प्रवास करतात. पोस्ट बंद करण्याआधी त्यांना वाटलेल्या प्रत्येक टपालाची नोंद एका जुन्या जाडजूड वहीत करून ठेवावी लागते.
रेणुका प्रसाद सांगतात की लोक हल्ली
ऑनलाइन संपर्कात राहतात त्यामुळे पत्रांची संख्या आटली आहे, “पण मासिकं, बँकेचा
पत्रव्यवहात मात्र गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढला आहे आणि त्यामुळे माझं कामही
वाढलंय.”
त्यांच्यासारखे ग्रामीण डाक सेवक
पोस्ट खात्यातील अतिरिक्त सेवक गणले जातात आणि त्यामुळे त्यांना पेन्शन तर नाहीत
पण बाकी भत्तेही मिळत नाहीत. त्यांना पोस्टाची सगळी कामं करावी लागतात, स्टॅंपची
विक्री, टपालाचं वाटप आणि पोस्टाची इतर कामं. ते नियमित नागरी सेवांचा भाग
असल्यामुळे त्यांना सीसीएस (पेन्शन) नियम, २०११ लागू होत नाही. सध्या तरी त्यांना
कुठलेही लाभ देण्याचा शासनाचा मानस दिसत नाही. १ एप्रिल २०११ पासून ग्रामीण डाक
सेवकांसाठी लागू झालेली सर्विस डिस्चार्ज बेनिफिट वगळता त्यांना शासनाचे इतर
कोणतेही लाभ मिळत नाहीत.
रेणुकाप्पा निवृत्त झाले की त्यांना
मिळणारा २०,००० रुपये मासिक पगार थांबेल आणि पेन्शन नसल्याने त्यांची इतर कुठलीच
नियमित कमाई होणार नाही. “माझ्यासारखे पोस्टमन किती तरी वर्षं वाट पाहतोय की
परिस्थिती काही तरी बदलेल. आमच्या कष्टांची कोणी तरी दखल घेईल असं आम्हाला वाटत
होतं. इतरांना जी पेन्शन मिळते त्याचा अगदी थोडा वाटा, अगदी एक-दोन हजार रुपये
सुद्धा आमच्यासाठी पुष्कळ आहेत,” ते म्हणतात. “पण असं काही घडेपर्यंत मी निवृत्त
झालेला असेन.”
तिथे भिंतीवर एक छोटी-छोटी कात्रणं चिकटवलेलं, लॅमिनेट करून लावलेलं पोस्टर मला दिसलं. त्याविषयी विचारल्यावर ते एकदम खुलले. “ते पोस्टर म्हणजे माझ्यासाठी गंमत आहे. मी त्याला अनचेचिटी (स्टँप) पोस्टर म्हणतो,” ते म्हणतात.
“हा माझा छंद आहे. एक दोन
वर्षांपासून वर्तमानपत्रात प्रसिद्ध कवी, स्वातंत्र्यसैनिक किंवा इतर खास व्यक्तींच्या
सन्मानात स्टँप प्रकाशित होऊ लागले आहेत.” हे असे स्टँप आले की रेणुकाप्पा ते
कापून ठेवतात. “नवा स्टँप कधी येईल याची वाट पाहण्यात गंमत आहे.”
या वार्तांकनासाठी टीव्हीएस अकादमी
तुमकुरच्या श्वेता सत्यनारायण यांनी मोलाची मदत केली आहे. त्यांचेय आभार. या
प्रकल्पासाठी पारी एज्युकेशन गटाने पुढील विद्यार्थ्यांसोबत काम केलं - आस्था आर.
शेट्टी, द्रुती यू, दिव्याश्री एस, खिशी एस जैन, नेहा जे, प्रणित एस हुळुकुडी, हानी
मंजुनाथ, प्रणती एस, प्रांजला पी. एल, संहिता इ बी, परिणिता कालमठ, निरुता एम.
सुजल, गुणोतम प्रधू, आदित्य हरित्सा, उत्सव के एस