एका अनोळखी व्यक्तीने एक कागद काढला आणि एक प्रश्न विचारला. आणि तिथूनच सगळं सुरू झालं.
अवघ्या १२ वर्षांचा कमलेश डंडोलिया आपल्या गावाजवळच्या एका टूरिस्ट लॉजपाशी हिंडत होता. तिथे एक परदेसी (अनोळखी माणूस) त्याला दिसला. “त्याने विचारलं, मला भरिया येते का.” आणि काही उत्तर द्यायच्या आत “त्या माणसाने माझ्या हातात एक कागद दिला आणि मला वाचायला सांगितलं.”
तो माणूसही अंदाज बांधत होता. पातालकोट खोऱ्यातल्या तामिया तालुक्यामध्ये भरिया समुदायाची मोठी वस्ती आहे. मध्य प्रदेशात त्यांची नोंद विशेष बिकट स्थितीतल्या आदिवासी गटांमध्ये होते. कमलेश देखील भरिया आहे आणि भरियाटी ही त्याची आदिवासी भाषा तो एकदम उत्तम बोलू शकत असे.
१२ वर्षांच्या कमलेशने त्या कागदावरची माहिती अगदी मस्त वाचून दाखवली. त्याच्याच जमातीबद्दलची माहिती त्यात होती. सगळी माहिती देवनागरी लिपीत लिहिलेली असल्याने त्याला ते “सोपंही गेलं.” पण पुढच्या विभागात काही वस्तूंची नावं होती आणि तिथे मात्र तो जरा अडखळायला लागला. “शब्द भरियाटीच होते, नक्की. कानाला त्यांचा नाद अगदी ओळखीचा होता, पण शब्द मात्र परके वाटत होते.”
काही तरी आठवायचा प्रयत्न करत तो एक मिनिटभर थांबतो, “एक अगदी खास शब्द होता. एक प्रकारची जंगली जडीबूटी होती. छे... मी लिहून ठेवायला पाहिजे होतं,” तो म्हणतो.
कमलेश एकदम अस्वस्थ झाला आणि विचार करू लागला, “भरियाटीत असे मला माहीत नसलेले किती शब्द असतील, मी विचार करू लागलो.” ही भाषा आपण एकदम चांगली बोलू शकतो हे त्याला माहीत होतं. कमलेश त्याच्या आजी-आजोबांकडे लहानाचा मोठा झाला. “अगदी मिसरुड फुटेपर्यंत मी फक्त भरियाटीमध्येच बोलायचो. आजही अस्खलित हिंदी बोलायला मला त्रासच होतो,” हसत हसत कमलेश सांगतो.
मध्य प्रदेशात भरिया आदिवासींची लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे ( अनुसूचित जमातींची सांख्यिकी , २०१३) मात्र यातल्या फक्त ३८१ जणांनी आपली मातृभाषा भरियाटी असल्याचं सांगितलं आहे. ही माहिती देखील २००१ साली प्रकाशित झालेल्या भारतीय भाषा गणनेतली आहे. त्यानंतर भरियाटी भाषेची वेगळी अशी माहिती उपलब्ध नाही कारण २०११ च्या जनगणनेत तिची वेगळी नोंद नाही. देशातल्या अनेक भाषा दहा हजारांहून कमी व्यक्ती बोलतात. त्यांची एकत्रित नोंद केली जाते, त्यामध्ये कुठे तरी भरियाटी देखील लपून गेलेली आहे.
शासनातर्फे प्रसारित केलेल्या एका व्हिडिओनुसार हे लोक पूर्वी महाराष्ट्रातल्या राजांचे वाहक किंवा हमाल म्हणून काम करत. १८१८ साली झालेल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धामध्ये नागपूरच्या दुसऱ्या मुधोजींचा पराभव झाला आणि ते पळून गेले. त्यांच्यासोबत अनेक भरिया आदिवासी देखील मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बेतुल आणि पंचमढीच्या जंगलात जाऊन स्थायिक झाले.
आज हा समुदाय स्वतःला भरिया (किंवा भरटी) म्हणवतो. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे फिरस्ती शेती. त्यांना वनौषधी आणि झाडपाल्याच्या औषधांचं ज्ञान होतं. अजूनही लोक तेवढ्यासाठी त्यांच्या गावी येतात. “लोक आजही आमच्याकडून जडीबुटी घेण्यासाठी इथे येतात. आज आमच्या अनेक जुन्या जाणत्या लोकांकडे परवाने आहेत आणि ते देशभर कुठेही जाऊन वनौषधी विकू शकतात,” कमलेश सांगतो.
पण त्यांच्या भाषेसारखंच, या झाडपाल्याचं ज्ञानही “आता गावातल्या फक्त जुन्या जाणत्या माणसांकडेच आहे,” तो सांगतो.
तरुण पिढीने पारंपरिक ज्ञान आत्मसात केलेलं नाही. भुरटा (भरियाटीमध्ये मधुमका) आणि त्या त्या ऋतूत जंगलातून मिळणारे चारोळी, मोह आणि आवळ्यासारखे पदार्थ तसंच सरपण विकून त्यांचं घर ते चालवतात.
गावाकडे जाण्यासाठी आजही पक्की सडक नाही. खरं तर महादेव मंदीर किंवा राज खोह गुहेसारखी लोकप्रिय पर्यटनस्थळं त्यांच्याच डोंगरदऱ्यांमध्ये आहेत, तरीही. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या १२ गावांमध्ये त्यांची वस्ती विखुरली आहे. हा भाग पातालकोट म्हणून ओळखला जातो. अनेकांची लहान मुलं शिक्षणासाठी इंदोरसारख्या शहरात वसतिगृहात राहतात.
*****
दहा वर्षांनंतर एकदा कधी तरी कमलेश आपल्या गायी आणि शेरडं चारायला डोंगरात गेला असताना पुन्हा एकदा त्याची गाठ एक अनोळखी माणसाशी पडली. पुन्हा एकदा तो प्रसंग आपल्या आयुष्यात कसा आला हे सांगत असताना कमलेशचा चेहरा खुलतो. त्या माणसाने कमलेशशी बोलण्यासाठी आपली गाडी थांबवली. तेव्हा कमलेशच्या मनात आलं, “कोण जाणो, तोही एक कागत [कागद] काढेल आणि मला वाचायाला सांगेल!”
बारावीत असताना कमलेशने शिक्षण
सोडलं. घरची शेती बघायची होती. सात भावंडांच्या शाळा कॉलेजची फी भरण्याइतके पैसे
नव्हते. गावात पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा होती. त्यानंतर मुलगे तामिया किंवा
आसपासच्या शहरांमध्ये आश्रमशाळेत जायचे आणि मुलींची शाळा सुटायची.
त्या अनोळखी माणसाने कमलेशला विचारलं की त्याला त्याची भाषा, भरियाटी जतन करायची आहे का? जेणेकरून पुढच्या पिढीला ही भाषा कशी बोलली जायची ते तरी समजेल. हा प्रश्न ऐकला आणि कमलेश एका पायावर तयार झाला.
हा अनोळखी माणूस म्हणजे डेहराडूनच्या इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेजेस अँड लिंग्विस्टिक्स चे पवन कुमार हे अभ्यासक. ते भरियाटी भाषेच्या नोंदी घेण्यासाठी आले होते. ते इथे पोचण्याआधी अनेक गावांना गेले होते पण अस्खलित भरियाटी बोलणारं कुणीही त्यांना भेटू शकलं नव्हतं. पवन कुमार नंतर त्या भागात ३-४ वर्षं राहिले. “आम्ही भरियाटीमध्ये अनेक गोष्टी वेबसाइटवर छापल्या आणि एक किताप [पुस्तक] सुद्धा काढलं,” कमलेश सांगतो.
कमलेशने होकार दिला. त्यानंतर काम करण्यासाठी फारसा गर्दी गोंधळ नसणारी जागा निवडणं आलं. “यहां बहुत शोर होता है क्यूंकी टुरिस्टों का आना जाना लगा रहता था,” तो सांगतो. म्हणून भरिया भाषा विकास गट तयार करण्यासाठी त्याने दुसऱ्या गावी मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला.
एक महिनाभरात कमलेश आणि त्याच्या चमूने भरियाटीमध्ये मुळाक्षरांचा एक तक्ता तयार केला, “प्रत्येक अक्षरासाठी मीच चित्रं काढली.” कोणते शब्द घ्यायचे त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांनी मदत केली. पण हे काम तेवढ्यावरच थांबलं नाही. एका संशोधकाच्या मदतीने त्यांनी या मुळाक्षर तक्त्याच्या ५०० प्रती छापल्या. दोन गटांमध्ये ते आपापल्या मोटारसायकलवर निघायचे आणि हे तक्ते नरसिंगपूर, सिवनी, छिंदवाडा आणि होशंगाबाद (आता नर्मदापुरम) मधल्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये देऊन यायचे. “मी एकट्यानेच तामिया, हरराई आणि पार जुन्नरदेवच्या २५० शाळा आणि अंगणवाड्यांना भेट दिली असेल,” कमलेश सांगतो.
काही जागा पार ८५ किलोमीटर दूर होत्या. “हम तीन चार दिन घर पे नही आते थे. हम किसी के भी घर रुक जाते थे रात में और सुबह वापस चार्ट बांटने लगते.”
प्राथमिक शाळेतल्या बहुतेक शिक्षकांना त्यांच्या समुदायाविषयी फारसं काही माहीत नसायचं, कमलेश सांगतो. “पण आमच्या कामाचं त्यांना फार कौतुक वाटत होतं. त्यामुळे जिथे भरियाटी फारशी बोलली जात नव्हती अशा गावांमध्येही आम्ही पोचू शकलो.”
त्यानंतर वर्षभरात कमलेश आणि त्याच्या गटाने अनेक पुस्तकं लिहिली. यामध्ये भरियाटी कशी लिहायची हे शिकवणारं एक पुस्तकही आहे. शिवाय भरियाटीमध्ये आरोग्यावरच्या तीन गोष्टी आणि तीन बोधकथाही आहेत. “आम्ही सगळं काही आधी एका कागदावर लिहायचो,” घरच्या ट्रंकेतनं काही कागद बाहेर काढता काढता तो सांगतो. या लोकांनी घेतलेल्या कष्टांचं फलित म्हणजे भरियाटी भाषेतली एक वेबसाइट .
“आमच्या वेबसाइटचा दुसरा टप्पा सुरू होणार म्हणून आम्ही फार खूश होतो,” तो सांगतो. राठेडमध्ये कमलेशच्या घरी आम्ही बोलत होतो. “आमच्या छोट्या छोट्या पुस्तिका, लोकगीतं, कोडी, मुलांसाठी शब्दांचे खेळ अशा किती तरी गोष्टी मला वेबसाइटवर टाकायच्या होत्या... पण तेव्हाच महासाथ आली.” या गटाच्या सगळ्या प्रयत्नांना खीळ बसली. इतक्यावर भागलं नाही. कमलेशचा फोन रिसेट झाला आणि त्याच्यावरचा सगळा डेटा एका रात्रीत डिलिट झाला. “सब चले गया,” तो अगदी दुःखी होऊन सांगतो. अगदी हस्तलिखित प्रतीसुद्धा राहिल्या आहेत. स्मार्टफोन नव्हता त्याच्याकडे. आणि ईमेल कशी करायची तेही तो याच वर्षी शिकलाय.
जे काही सुखरुप होतं ते त्याने आपल्या दुसऱ्या गावातल्या गट सदस्यांकडे देऊन टाकलं. आता तो त्यांच्या संपर्कात नाही असं तो सांगतो. “त्यांच्याकडे आता काही मिळेल का नाही काही सांगू शकत नाही.”
केवळ करोनाची साथ आली म्हणून भाषा नोंदवून ठेवण्याचं काम थांबलं असं मात्र झालं नाही. तेवढं एकच कारण नव्हतं. भरियाटी भाषेचं दस्तावेजीकरण करण्यातला प्रमुख अडथळा म्हणजे तरुण काय किंवा ज्येष्ठ, कुणालाच यामध्ये काहीही रस वाटत नाहीये. “बुजुर्गों को लिखना नही है और बच्चों को बोलना नही है,” तो म्हणतो. “हळू हळू माझा सगळा उत्साह आणि उमेद संपत गेली आणि मग मी सगळंच थांबवलं.”
कमलेशसोबत काम करणारे काही जण शेतकरी होते. ते दिवसभर शेतात राबायचे. दिवसभर काम केल्यानंतर थकून, भागून घरी यायचे. जेवून लवकर निजावं इतकंच त्यांच्या डोक्यात असायचं. काही काळानंतर त्यांचा प्रतिसादही कमी होत गेला.
“मी एकटा काही काम सुरू ठेवू शकलो नाही,” कमलेश सांगतो. “हे काही एकट्याचं काम नाहीये.”
*****
गावातून फेरफटका मारत असताना कमलेश एका घराबाहेर थांबतो. “आम्ही दोस्त मंडळी जमलो की दिवलू भैयाचा विषय निघतोच.”
दिवलू बगदारिया एक लोककलावंत आहेत. मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते भरिया आदिवासींचं प्रतिनिधीत्व करतात. “आमच्या संस्कृतीसाठी आमची भाषा किती कळीची आहे हे फक्त त्यांनाच माहीत आहे,” कमलेश सांगतो.
आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते घराच्या अंगणात आपल्या नातवंडांना आपल्या भरिया भाषेतलं एक गाणं म्हणून दाखवत होते. आई जंगलात सरपण गोळा करायला गेली होती आणि मुलं तिची वाट बघत बसली होती.
“लिहिणं आणि बोलणं हे दोन्ही महत्त्वाचं आहे,” ४८ वर्षीय दिवलू भैया सांगतात. बोलता बोलत कमलेशकडे झुकून ते पुढे म्हणतात, “खरं तर इंग्लिश आणि हिंदी कसे विषय म्हणून शिकवले जातात तसंच भरियाटी आणि इतर आदिवासी भाषा पर्यायी [विषय] म्हणून का बरं शिकवल्या जाऊ नयेत?” असं म्हणत ते कमलेशने तयार केलेला मुळाक्षरांचा तक्ता आपल्या चावा म्हणजेच नातवाला दाखवू लागतात.
त्यांचा नातू तक्त्यातल्या धदूसकडे (माकड) बोट दाखवतो आणि खुदुखुदु हसायला लागतो. “हा लवकरच भरिया शिकणार बघ,” दिवलू भैया म्हणतात.
आपल्याच समाजाच्या लोकांबरोबर काम करताना आलेले अनुभव आणि आव्हानं लक्षात घेता कमलेशच्या मनात त्यांच्याइतका आशावादी राहिलेला नाही. “हा जर शिकायला आश्रमशाळेत गेला तर तो भरियाटी कधीच बोलू शकणार नाही. आमच्याबरोबर [इथे] राहिला तरच तो ही भाषा बोलेल,” भाषा जतन करण्यासाठी धडपडत असलेला कमलेश सांगतो.
“वैसे तो १०० में से ७५ प्रतिशत तो विलुप्त ही हो चुकी मेरी भाषा,” कमलेश म्हणतो. “अनेक वस्तूंची मूळ भरियाटी भाषेतली नावं आज आम्ही विसरून गेलोय. सगळ्यात हळूहळू हिंदी मिसळलीये.”
लोक जास्त प्रवास करू लागलेत, मुलं शाळेत जायला लागलीयेत. आणि मग हे सगळे घरी येताना सोबत हिंदी शब्द घेऊन येतात. मुलं आपल्या आई-बाबांना हिंदी शिकवतात. आणि मग मागची पिढीसुद्धा आपल्या मुलांप्रमाणे हळूहळू हिंदी बोलायला लागली आणि मग भरियाटीचा वापर कमी कमी होत गेला.
“शाळा सुरू झाली आणि माझ्या बोलण्यातून सुद्धा भरियाटी कमी होत गेली. हिंदीभाषिक मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ जात असे. मग तीच सवय झाली,” कमलेश सांगतो. तो हिंदी आणि भरियाटी दोन्ही बोलतो. पण मज्जा म्हणजे या दोन्ही तो एकत्र कधीच बोलत नाही. “मला त्या एकत्र बोलणं अवघड जातं. माझं सगळं लहानपण माझ्या आजीसोबत गेलं, जी फक्त भरियाटी बोलते.”
कमलेशची आजी सुकतीबाई जवळ जवळ ८० वर्षांची आहे. पण ती आजही हिंदी बोलत नाही. कमलेश सांगतो की तिला आता हिंदी समजतं पण ती त्यामध्ये उत्तर देऊ शकत नाही. त्याची भावंडं मात्र भरियाटी फारशी बोलत नाहीत कारण, “त्यांना लाज वाटते. त्यांना हिंदीच बोलायला आवडतं.” कमलेशची बायको अनितासुद्धा आपली मातृभाषा फारशी बोलत नाही पण तो तिला भरियाटीत बोलायला प्रोत्साहन देत राहतो.
“भरियाटीचा उपयोग तरी काय आहे? रोजगार मिळणार आहे का? सिर्फ अपनी भाषा बोलने से घर चलता है?” हा प्रश्न भाषा टिकावी म्हणून धडपडणाऱ्या या दोघा कार्यकर्त्यांना सतावत राहतो.
“हिंदी टाळणं शक्य नाही,” दिवलू अगदी सरळ मान्य करतात. “पण आपण आपली भाषासुद्धा टिकवून ठेवली पाहिजे.”
कमलेश लगेच म्हणतो, “हल्ली तुमची ओळख तुम्ही आधार कार्ड किंवा वाहनाच्या परवान्याच्या आधारे पण पटवून देऊ शकता.”
पण त्यावर दिवलूंचा पुढचा प्रश्न तयार असतो, “या सगळ्या कागदपत्रांशिवाय तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करायची असेल तर तुम्ही काय करणार?”
कमलेश हसतो आणि झटक्यात म्हणतो, “मी भरियाटीत बोलेन ना.”
“कसं बोललास! भाषा हीसुद्धा आपली ओळखच आहे की,” दिवलू दुजोरा देतात.
*****
भरियाटीचा इतिहास खूप गुंतागुंतीचा असल्याने भाषा म्हणून त्याचं वर्गीकरण नक्की कसं करायचं हे स्पष्ट नाही. कधी काळी ही भाषा द्रविडियन होती पण आता मात्र या भाषेमध्ये अनेक खासकरून शब्दसंग्रह आणि नादांमध्ये इंडो-आर्यन वैशिष्ट्यं सापडतात. ही भाषा मध्य भारतात बोलली जात असल्याने दोन्ही भाषासमूहांशी तिचा संबंध स्पष्ट दिसून येतो. वर्गीकरणाबाबत असलेला हा संभ्रम हेच स्पष्ट दाखवून देतो की इंडिक आणि द्रविडियन प्रभावांची एकमेकांत सरमिसळ होत गेली आहे आणि त्यामुळे भाषाशास्त्रज्ञांना असं कोणतंही काटेकोर वर्गीकरण करणं अशक्य होऊन जातं.
परार्थ समितीच्या मंजिरी चांदे आणि रामदास नगरे तसंच पल्लवी चतुर्वेदी यांचे मनापासून आभार. खालसा कॉलेजमधील प्राध्यापक अनघा मेनन आणि आयआयटी कानपूरच्या मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. चिन्मय धारुरकर यांनीही त्यांच्याकडील माहिती सढळ हस्ते दिली. त्याबद्दल त्यांचे आभार.
भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत त्या नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.