दिया खरं तर तिथून सुटलीच असती.
ती बसमध्ये बसली होती. बस भरून कधी सुटणार याचाच तिला खरं तर घोर लागलेला होता. सुरत ते झालोड तिकिट काढलं होतं. तिथून एक तासभराचा प्रवास आणि गुजरातची सीमा पार करून ती राजस्थानच्या कुशलगडला आपल्या घरी पोचली असती.
खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक रवी तिच्या मागून बसमध्ये आला. आणि ती काही म्हणायच्या आत तिच्या हाताला धरून त्याने तिला बसमधून खाली उतरवलं.
लोक आपापल्या घाईत होते. कुणी सामान चढवत होतं, कुणी लेकरांना आवरत होतं. एक माणूस संतापून एका तरुण मुलीला ओढून नेतोय हे कुणी पाहिलंही नाही. “मला ओरडायची पण भीती वाटत होती,” दिया सांगते. रवीचा संताप काय आहे हे ती पुरतं ओळखून होती. त्यामुळे तिने शांत बसायचं ठरवलं.
आणि मग त्या रात्री ती परत एकदा बांधकामावरच्या आपल्या घरी आली. गेल्या सहा महिन्यांपासून हे घर म्हणजे तिच्यासाठी तुरुंग होता. दियाला झोप लागलीच नाही. सगळं अंग ठणकत होतं. रवीच्या मारहाणीत किती तरी ठिकाणी कापलं होतं, जखमा झाल्या होत्या. “त्याने मुठी आवळून मारलं. लाथा घातल्या,” ती सांगते. “तो मारत होता पण त्याला कुणीही थांबवू शकलं नाही.” कुणी पुरुष मध्ये पडला तर त्याचा दियावर डोळा आहे असा आरोप केला जायचा. बाया ही सगळी मारहाण पाहत होत्या पण त्या काही मध्ये पडल्या नाहीत. आणि कुणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाच तर रवी म्हणायचा, ‘मेरी घरवाली है, तुम क्यों बीच में आ रहे हो?’
“तो मला मारायचा आणि दर वेळी मला मलम पट्टी करण्यासाठी दवाखान्यात जावं लागायचं, ५०० रुपये खर्च व्हायचे. माझा दीर कधी कधी पैसे द्यायचा आणि सोबत दवाखान्यात यायचा. तो इतकंच म्हणायचा, ‘तू घर पे चले जा’,” दिया सांगते. पण ते कसं जमवून आणायचं हे दोघांनाही माहित नव्हतं.
दिया आणि रवी भिल आदिवासी असून राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. राज्यातले सर्वात जास्त गरीब लोक या जिल्ह्यात राहत असल्याचं २०२३ बहुआयामी गरिबी अहवाल सांगतो. अगदी कमी शेतजमीन, सिंचनाचा अभाव, रोजगार नाही आणि एकूणच दारिद्र्य यामुळे कुशलगड तालुक्यातून भिल आदिवसींना मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागतं. या तालुक्यातले ९० टक्के लोक भिल आहेत.
इतर कोणत्याही नवरा-बायकोसारखे दिया आणि रवी देखील गुजरातमध्ये बांधकामावर काम करायला आलेलं एक जोडपं असल्यासारखेच दिसतात. पण दियाचं हे स्थलांतर प्रत्यक्षात अपहरण होतं.
दिया शेजारच्या सज्जनगडमध्ये दहावीत शिकत होती. वय १६. तेव्हा पहिल्यांदा तिला रवी तिथल्या बाजारात भेटला. गावातल्याच एका बाईने तिला चिठ्ठीवर त्याचा फोन नंबर लिहून दिला होता. ‘त्याला तुला भेटायचंय असंच. जा,’ असं ती म्हणाली होती.
दियाने काही त्याला फोन केला नाही. पुढच्या आठवड्यात तो बाजारात आला असताना ती त्याच्याशी जरासं बोलली होती. “हमको घुमाने ले जायेगा बोला, बागिडोरा. बाइक पे. मला दोन वाजता शाळेबाहेर यायला सांगितलं. शाळा सुटण्याआधी एक तास,” दिया सांगते. दुसऱ्या दिवशी तो शाळेबाहेर उभा होता. मित्रासोबत.
“आम्ही बागिडोराला गेलोच नाही. आम्ही बसस्टँडवर गेलो. त्याने मला अहमदाबादच्या बसमध्ये बसायला भाग पाडलं,” ती सांगते. तिच्या घरापासून पार ५०० किलोमीटर लांब. दुसऱ्या राज्यात.
दिया हादरून गेली होती पण कसं तरी करून तिने आपल्या घरी आई-वडलांना फोन केला. “माझा चाचा मला घ्यायला अहमदाबादला आला. पण रवीला तोपर्यंत गावाकडच्या त्याच्या मित्रांकडून हे कळलं होतं त्यामुळे त्याने मला तिथून सुरतला नेलं.”
त्यानंतर ती कुणाशीही फोनवर बोलताना दिसली की तो बिथरायचा आणि मग हिंसेला सुरुवात झाली. फोन मागितला की त्यात भरच पडायची. दियाला आठवतं, एक दिवस तिला काही करून घरच्यांशी बोलायचं होतं म्हणून ती त्याच्या हातापाया पडून रडत फोन मागत होती तर त्याने तिला “बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. मी खाली रबल होतं त्यात पडले. सगळ्या अंगभर खरचटलं,” ती सांगते. अजूनही पाठ कुठे कुठे दुखते ते दाखवते.
*****
दियाला पळवून नेलंय हे समजलं तेव्हा तिच्या आईने, कमलाने तिला परत आणण्याची सगळी खटपट केली. ३५ वर्षीय कमला रोजंदारीवर काम करते. बांसवाडा जिल्ह्यातल्या आपल्या एका खोलीच्या झोपडीत बसलेली कमला सांगते की ही बातमी कळल्यावर ती धाय मोकलून रडली होती. “बेटी तो है मेरी. अपने को दिल नही होता क्या?”
रवीने दियाला पळवून नेलं त्यानंतर काही दिवसांनी कमलाने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
स्त्रियांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीत देशात राजस्थानाचा तिसरा क्रमांक लागतो. मात्र गुन्हा दाखल करण्याचं प्रमाण मात्र सर्वात कमी म्हणजे ५५ टक्के इतकं असल्याचं २०२० च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून दिसून येतं. दाखल केलेल्या तक्रारींपैकी दोन तृतीयांश केस फाइलपर्यंतही पोचत नाहीत. दियाच्या तक्रारीचंही तेच झालं.
“त्यांनी तक्रार मागे घेतली,” कुशलगडचे पोलिस उप अधीक्षक रूप सिंग सांगतात. कमला सांगते बांजडिया या त्यांच्या जात पंचायतीने या प्रकरणात लक्ष घातलं. जात पंचायतीत फक्त पुरुष असतात. त्यांनी कमला आणि तिचा नवरा किशन यांना गळ घातली की पोलिसांकडे जाण्याऐवजी देज मागावा. भिल आदिवासींमध्ये लग्नामध्ये मुलाला मुलीच्या पालकांना काही पैसे द्यावे लागतात. (जर लग्न मोडलं तर पुरुष हा पैसा परत मागू शकतो जेणेकरून त्याला दुसरं लग्न करता येतं.)
पोलिसांकडे केलेली अपहरणाची तक्रार मागे घ्या आणि १-२ लाख रुपये घेऊन टाका असं त्यांना सांगण्यात आलं. आता या ‘लग्ना’ला समाजाची मान्यता मिळाली. दियाचं वय भरत नव्हतं किंवा तिची संमती नव्हती या दोन्ही गोष्टींकडे चक्क दुर्लक्ष केलं गेलं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी – ५ नुसार राजस्थानातल्या २०-२४ वयोगटातल्या २५ टक्के स्त्रियांचं लग्न १८ वर्षं पूर्ण होण्याआधी झालं आहे.
टीना गरासिया कुशलगडमध्ये काम करणारी सामाजिक कार्यकर्ती आहे. स्वतः भिल आदिवासी असणाऱ्या टीनाला दियासारख्या घटना म्हणजे पळून जाऊन केलेलं लग्न असल्याचं बिलकुल मान्य नाही. “आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्यावरून तरी वाटतं की या मुली काही त्यांच्या मर्जीने गेलेल्या नाहीत. एक तर आपल्याला काही तरी फायदा मिळेल हा विचार करून किंवा या नात्यात आपण सुखी असू या विचाराने देखील त्या जातात,” बांसवाडा जिल्ह्यात काम करणाऱ्या आजीविका ब्यूरोची ती प्रमुख आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून स्थलांतरित स्त्रियांसोबत काम करत आहे.
“त्यांचं असं स्थलांतर म्हणजे मला मोठा कट वाटतो, मानवी तस्करीचा एक मार्ग. आतलेच आहेत जे मुलींना अशा नात्यांमध्ये अडकवतात,” टीना सांगते. मुलीशी ओळख करून देण्याचेही पैसे घेतले जातात असा त्यांचा दावा आहे. “मुलगी १४-१५ वर्षांची असते. तिला एखादं नातं म्हणजे खरंच काय कळत असतं? किंवा आयुष्य म्हणजे तरी काय कुठे कळतं?”
जानेवारी महिन्यातल्या एका सकाळी कुशलगडच्या ऑफिसमध्ये टीनाला भेटायला तीन पालक आपल्या मुलींना घेऊन आले होते. आणि त्या सगळ्यांची कहाणी बरीचशी दियासारखीच होती.
सीमा १६ वर्षांची असताना तिचं लग्न झालं आणि ती कामासाठी नलऱ्यासोबत गुजरातला स्थलांतरित झाली. “मी कुणाशीही बोलले तरी त्याचा जळफळाट व्हायचा. एकदा त्याने मला इतक्या जोरात मारलं की मला त्या कानाने अजूनही नीट ऐकू येत नाही,” ती म्हणते.
“भयंकर होती मारहाण. अंग इतकं दुखायचं की मला जमिनीवरून उठता देखील यायचं नाही. मग तो म्हणायचा की मी कामचोर म्हणजे कामचुकार आहे. मग मी तशीच ठणकत्या अंगाने कामाला जायचे,” ती सांगते. तिची सगळी कमाई त्याच्या हातात जायची आणि “तो साधा आटादेखील विकत आणायचा नाही, सगळा पैसा दारूवर उडवायचा.”
जीव देण्याची धमकी देऊन कशी बशी ती त्याच्या तावडीतून सुटली. तेव्हापासून तो दुसऱ्या एका बाईबरोबर राहतोय. “मी गरोदर आहे पण तो काडीमोडही घेत नाहीये किंवा मला पैसेही देत नाहीये,” आता तिच्या कुटुंबाने त्याच्या विरोधात बायकोला सोडून गेल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाविरोधी कायदा २००५ च्या कलम २०.१ (ड) पोटगी देणं बंधनकारक आहे आणि फौजदारी कायद्याच्या कलम १२५ मध्येही हेच नमूद केलं आहे.
राणी १९ वर्षांची आहे. एक मूल तीन वर्षांचं आणि दुसरं पोटात आहे. तिचाही नवरा सोडून गेला आहे. राणीनेही शिवीगाळ आणि मारहाण सहन केली आहे. “तो रोज दारू प्यायचा आणि भांडायला सुरुवात करायचा, ‘गंदी औरत, रंडी है’,” ती म्हणते.
तिने पोलिसात तक्रार केली होती मात्र बांजडियांनी मध्ये पडून ५० रुपयांच्या स्टँप पेपरवर सासरच्यांकडून लिहून घेतलं की त्याचं वागणं सुधारेल. एक महिना उलटला त्यानंतर परत मारहाण सुरू झाली. बांजडियांनी काहीही केलं नाही. “मी पोलिसांकडे गेले आहे पण मी आधीचू तक्रार मागे घेतल्यामुळे सगळे पुरावे गायब झाले आहेत,” राणी सांगते. ती कधीही शाळेत गेली नाहीये मात्र आता कायद्याचे धडे मात्र ती आता गिरवत आहे. अनुसूचित जमाती –सांख्यिकी २०१३ नुसार भिल आदिवासी स्त्रियांमध्ये साक्षरतेचं प्रमाण फक्त ३१ टक्के होतं.
आजीविका ब्यूरोच्या ऑफिसमधल्या कार्यकर्त्या दिया, सीमा आणि राणीसारख्या मुली-स्त्रियांना कायदेशीर आणि सर्वच प्रकारची मदत करतात. त्यांनी एक छोटी पुस्तिकाही छापली आहे – श्रमिक महिलाओं का सुरक्षित प्रवास. यामध्ये फोटो आणि चित्रांचा वापर करून हेल्पलाइन, दवाखाने, श्रमिक कार्ड आणि इतरही योजनांची माहिती देण्यात आली आहे.
पण हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी हे सगळं करणं सोपं नाही. पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या असंख्य चकरा आणि न्याय कधी मिळेल याची कसलीही खात्री नाही. त्यात पदरात लहान मुलं त्यामुळे त्यांना कामासाठी परत कुठे जाताही येत नाही.
टीना सांगते, “आम्ही पाहिलंय की काही वेळा मुलींना घर सोडून जाण्यासाठी उद्युक्त केलं गेलंय आणि मग त्यानंतर एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे त्यांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे इथे तस्करीचा पैलूच महत्त्वाचा आहे. खरंच, दुसरं तिसरं काही नाही. ही मुलींची तस्करी आहे. आणि हे प्रमाण वाढत चाललंय,” टीना म्हणते.
*****
आधी अहमदाबादला आणि नंतर सुरतला दियाला लगेचच कामाला लावण्यात आलं होतं. ती रवीसोबत उभी राहून रोकडी – रोजंदारी करायची. मुकादम मजूर अड्ड्यांवरून ३५०-४०० रुपये रोजावर मजुरांना कामावर न्यायचे. ती आणि रवी फूटपाथवर ताडपत्री बांधून रहायचे. त्यानंतर रवी ‘कायम’ झाला म्हणजेच त्याला एका बांधकामावर महिन्याच्या पगारावर काम मिळालं.
“पण त्याला मिळणारा पगार मला कधी पहायलाच मिळाला नाही. पैसे त्याच्याकडेच असायचे.” दिया सांगते. दिवसभर अंगमेहनत करून आल्यावर ती घरची सगळी कामं करायची. साफसफाई, स्वयंपाक आणि धुणी-भांडी. कधी कधी आजूबाजूच्या बाया गप्पा मारायला यायच्या. पण रवीची तिच्यावर अगदी एखाद्या ससाण्यासारखी नजर असायची.
“माझ्या बाबांनी तीन वेळा मला इथून निघता यावं म्हणून कुणाच्या तरी हाती पैसे पाठवले. पण मी निघण्याची तयारी सुरू केली की कुणी तरी त्याला जाऊन सांगायचं आणि मग तो मला थांबवायचाय त्या दिवशी मी कशी तरी बसमध्ये जाऊन बसले पण कुणी तरी त्याला सांगितलं आणि तो माझ्या मागे आला,” दिया सांगते.
तिची सगळी कमाई त्याच्याच हाती जायची, इथली भाषा माहित नाही कारण दियाला फक्त तिची वांगडी ही भाषा बोलती यायची. सुरतमध्ये तिचं बोलणं कुणालाच समजायचं नाही. मुकादम फक्त पुरुषांमार्फत महिला कामगारांना कामावर घ्यायचे कारण पुरुषांना थोडं फार गुजराती आणि हिंदी येतं.
त्या दिवशी बसमधून दियाला रवीने परत नेलं त्यानंतर चार महिन्यांनी तिला दिवस गेले. तिच्या मर्जीविरुद्ध. मारहाण कमी झाली पण पूर्णपणे थांबली नाही.
आठवा महिना लागल्यावर रवीने तिला तिच्या माहेरी सोडलं. प्रसूतीसाठी तिला झालोडच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या मुलाचा जन्म तिथेच झाला. जन्मानंतर १२ दिवस त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं त्यामुळे तिला बाळाला अंगावर पाजता आलं नाही. त्यानंतर तिचं दूध आटलं.
तोपर्यंत रवी हिंसक आहे किंवा छळ करतो याची दियाच्या घरच्यांना कल्पना नव्हती. ती काही दिवस माहेरी राहिल्यानंतर तिने आता त्याच्याकडे परत जावं असा त्यांचा आग्रह होता. कामासाठी स्थलांतर करणाऱ्या तरुण स्त्रिया आपल्या अगदी तान्ह्या मुलांना घेऊन कामावर परततात असा अनुभव आहे. “लग्न झालेल्या मुलीचा एकच सहारा असतो – तिचा नवरा,” कमला सांगते. “ते एकत्र राहणार, एकत्र काम करणार.” माहेरी तिचा आणि तिच्या बाळाचा खर्च म्हणजे आधीच हलाखीची परिस्थिती असलेल्या या घरावरही ताणच येत होता.
रवी आता फोनवरून दियाला त्रास देऊ लागला. बाळाच्या उपचारासाठी देखील तो पैसा द्यायचा नाही. दिया आता माहेरी होती त्यामुळे थोडं धाडस दाखवायआणि म्हणायची, “ठीक आहे, मग माझ्या बाबांकडून घेते पैसे,” कमला सांगते आणि म्हणते, “बहुत झगडा करते थे.”
अशाच एका भांडणात तो तिला म्हणाला, “मी दुसऱ्या बाईबरोबर राहीन.” तीही चिडून म्हणाली, “मग, मीही दुसऱ्याबरोबर जाईन.” आणि तिने फोन बंद केला.
त्यानंतर काही तासांतच शेजारच्या तालुक्यातल्या आपल्या घरून रवी आणि त्याच्यासोबत पाच जण तिथे तीन बाइकवर तिथे आले. मी आता नीट वागेन, आपण परत सुरतला जाऊ असं काय काय विनवत त्याने सोबत येण्याची गळ घातली.
“त्याने मला त्याच्या घरी नेलं. माझ्या बाळाला बाहेरच्या खाटेवर निजवलं. त्यानंतर माझ्या घरवाल्याने मला थोबाडीत मारली, केसाला धरून मला आत खोलीत नेलं. त्याचे भाऊ आणि काही मित्र देखील आत आले. गळा दाबला आणि इतरांनी माझे हात खाली दाबून ठेवले आणि त्याने दुसऱ्या मोकळ्या हाताने ब्लेडने माझं डोकं भादरलं,” दिया सांगते.
हा प्रसंग दियाच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. “मला त्यांनी एका ठंब्याला (लाकडी खांब) दाबून ठेवलं होत. मी बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडले पण कुणीच आलं नाही.” त्यानंतर बाकीचे गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं. “त्याने माझे कपडे फेडले आणि माझ्यावर बलात्कार केला. तो गेला आणखी तिघं आले आणि त्यांनी आळीपाळीने माझ्यावर बलात्कार केला. माझ्या इतकंच लक्षात आहे. त्यानंतर मी बेहोश झाले.”
ती शुद्धीवर आली तेव्हा तिला आपल्या तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. “माझा घरवाला माझ्या आईला फोनवर सांगत होता की ती काही येणार नाही. आम्ही बाळाला तुमच्याकडे सोडतोय. माझ्या आईने नकार दिला आणि मी स्वतःच येते म्हणाली.”
कमला सांगते की रवीच्या घरी पोचल्यावर तो फक्त ‘बाळाला घेऊन जा’ म्हणाला. “मी म्हटलं, नाही. मला माझ्या लेकीला भेटायचंय.” आणि त्यानंतर “घरी मयत झाली असावी” तसं डोकं भादरलेली दिया थरथरत लडखलडत बाहेर आली. “मी माझ्या नवऱ्याला, सरपंचाला आणि गावाच्या मुखियाला बोलावून घेतलं आणि त्यांनी पोलिस बोलावले,” कमला सांगते.
पोलिस येईपर्यंत ज्यांनी हे केलं ते सगळे पसार झाले होते. दियाला दवाखान्यात नेण्यात आलं. “माझ्या अंगावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या,” ती सांगते. “त्यांनी बलात्कार झाला आहे का याची तपासणी केली नाही. माझ्या जखमांचे कसलेही फोटो घेण्यात आले नाहीत.”
कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे संरक्षण कायदा, २००५ च्या कलम ९ मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की शारीरिक हिंसा झाली असेल तर पोलिसांनी शारीरिक तपासणी करून घेतलीच पाहिजे. दियाच्या घरच्यांनी पोलिसांना सगळं काही सांगितलं होतं तरीही त्यांनी तपासणी केली नाही. आम्ही पोलिस उपअधीक्षकांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की दियानी तिचा जबाब बदलला होता. तिने बलात्काराचा उल्लेख केला नव्हता आणि असं वाटत होतं की तिला कुणी तरी पढवून आणलंय.
हिंसाचार सहन करणाऱ्या स्थलांतरित महिलांची परिस्थिती अधिकच बिकट असते – मुकादम पुरुषांमार्फत त्यांना कामावर घेतात. आणि ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना कसलीही मदत मागणं अवघड होऊन जातं
आपल्यावर बलात्कार करणाऱ्या रवी आणि आणखी तिघांची नावं तिने पोलिसांना दिली होती. त्यांना अटक करण्यात आली. त्याच्या घरच्या इतर काहींनाही अटक झाली. ते सगळे सध्या जामिनावर बाहेर आहेत. रवीचे मित्र आणि नातेवाईक दियाचा जीव घेण्याच्या धमक्या देत असल्याचं तिच्या कानावर आलं आहे.
२०२४ च्या जानेवारी महिन्यात जेव्हा आम्ही दियाला भेटलो तेव्हा ती म्हणाली की आता पोलिस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या चकरा तिच्या रोजच्या कामाचा भाग झाल्या आहेत. तिच्या दहा महिन्यांच्या मुलाला फिटचं निदान झालं असल्यामुळे त्याची काळजी घेणं हेही मोठं काम आहे.
“दर वेळी कुशलगडला यायचं म्हणजे बसचे प्रत्येकाचे ४० रुपये लागतात,” दियाचे वडील किशन सांगतात. कधी कधी त्यांना अगदी अचानक बोलावलं जातं. मग ते खाजगी गाडी करतात. त्यांच्या घरून ३५ किलोमीटर अंतर जाण्यासाठी २००० रुपये भाडं होतं.
खर्च वाढत चाललाय पण किशन सध्या कामावर गेलेले नाहीत. “या केसचा काही निकाल लागत नाही तोपर्यंत मी कसा जाणार? पण काम केलं नाही तर घर तरी कसं चालवणार?” ते विचारतात. “बंजाडियांना ही केस मागे घेण्यासाठी आम्हाला ५ लाख रुपये देऊ केले होते. माझा सरपंच म्हणाला, ‘घेऊन टाक’. मी म्हटलं, नाही. त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होऊ दे.”
दिया आता १९ वर्षांची आहे. आम्ही तिच्याशी तिच्या घरी बोलत होतो. आरोपींना शिक्षा होईल अशी तिला आशा आहे. तिचे नवे केस आता इंचभर वाढलेत. “त्यांना माझं काय करायचं होतं ते त्यांनी केलंय. आता मला कसली भीती? मी लढणार. हे असं सगळं केल्यावर काय होतं, ते त्यालाही कळू दे. किमान दुसऱ्या कुणा बरोबर असं वागायची तरी त्याची हिंमत होणार नाही.”
तिचा आवाज तापू लागतो आणि ती म्हणते, “त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”
लिंगाधारित आणि लैंगिक हिंसापीडित मुली आणि स्त्रियांना आवश्यक सेवा मिळवण्यात सामाजिक, संस्थांच्या पातळीवर आणि इतरही अनेक अडचणी येतात. डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स इंडियासोबत पारीने भारतभरातून याबद्दल वार्तांकन हाती घेतले आहे. हा लेख त्या मालिकेतला पहिला लेख आहे.
हिंसापीडित स्त्रिया आणि त्यांच्या घरच्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.