७ डिसेंबर २०२३. गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहारात रेफात अलरीर मारला गेला. कोण होता तो? पॅलेस्टाइनमधला आमच्यासारखाच एक अनुवादक, लेखक, अभ्यासक, स्तंभलेखक आणि कार्यकर्ता. पण, ज्या दिवशी तो मरण पावला, त्याच दिवशी त्याने लिहिलेल्या शेवटच्या कवितांपैकी एक कविता जगभरात किमान १०-१२ भाषांमध्ये अनुवादित झाली आणि कित्येकांपर्यंत पोचली.
या अशा जगात आणि काळाच्या अशा टप्प्यावर आम्ही भाषांविषयी पारीवर करत असलेल्या कामाचा मागोवा घेत आहोत. रेफात अलरीर यांचे हे शब्द आज आठवतायतः
आज आमचा संघर्ष मुखर करण्यासाठी आणि आमच्यावरचा हल्ला परतवून लावण्यासाठी आमच्याकडे केवळ आमची भाषा आहे. स्वतःला आणि इतरांना अनेक गोष्टी समजावून सांगण्यासाठी आज आमचे शब्द हेच मोठं धन आहेत आणि तेच आम्हाला वापरायचे आहेत. आणि हे शब्द शक्य तितक्या जास्त भाषांमध्ये आम्हाला न्यायचे आहेत. जितक्या जास्त लोकांच्या मनाला आणि हृदयाला भिडेल अशा भाषेवर माझा विश्वास आहे...मानवतेच्या भल्यासाठी घडलेली सर्वात उत्तम गोष्ट कोणती तर अनुवाद. आपसांतले अडथळे दूर करून एकमेकांमध्ये पूल बांधण्याचं, आपसांतली समज वाढवण्याचं काम अनुवादाने होतं. अर्थात “वाईट” अनुवादांमुळे गैरसमज होऊ शकतात हेही तितकंच खरं आहे.
अनुवादामध्ये लोकांना जोडण्याची, नवी समज तयार करण्याची असलेली ताकद हाच पारीभाषाच्या कामाचा गाभा आहे.
आणि त्या अर्थी २०२३ हे आमच्यासाठी उल्लेखनीय वर्ष ठरलं आहे.
या वर्षी छत्तीसगडी आणि भोजपुरी या दोन भाषांमध्ये आम्ही अनुवादाचं काम सुरू केलं. आता पारीवरचा मजकूर १४ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होतो.
याच वर्षी आम्हाला आमचं नाव मिळालं – पारीभाषा! आमच्या कामाचा आवाका 'इंग्रजीचा इतर भाषांमध्ये अनुवाद' यापलिकडे आहे. पारी खऱ्या अर्थाने बहुभाषी आणि ग्रामीण पत्रकारितेचा अस्सल आवाज असेल ही आमची भूमिका या नावातून स्पष्ट होते.
या देशातल्या साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात भाषांचं, बोलीचं महत्त्व काय आहे याचा वेध घेण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत. भाषा आणि अनुवाद या विषयांभोवती गुंफलेल्या वार्तांकन आणि चर्चांमधून आम्ही याविषयी पारीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.




