पश्मिनाच्या एका नियमित आकाराच्या शालीसाठी पुरेशी सूतकताई करायची तर फहमीदा बानो यांना एक महिना लागतो. चांगथांगी शेळीची अत्यंत तलम लोकर वेगळी करणं आणि त्याचं सूत कातणं हे अतिशय जिकिरीचं आणि नाजूक काम असतं. पन्नाशीला आलेल्या एका कारागिराच्या मते, महिनाभराच्या या कष्टप्रद कामातून फहमीदा बानो यांना अंदाजे हजारभर रुपये मिळू शकतात. कमाईचं गणित समजावून सांगत फहमीदा म्हणतात- "जर मी सतत काम केलं तर दिवसाला ६० रुपये कमवू शकेन."
‘मौल्यवान’ म्हटली जाणारी ही शाल ज्या किमतीला विकली जाईल त्याचा हा क्षुल्लक म्हणावा असा हिस्सा. गुंतागुंतीच्या रेखीव नक्षीकामाची लयकारी आणि विणकामातल्या कलाकुसरीची अदाकारी यावर पश्मिना शालीची किंमत अवलंबून असते- ८ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत, कितीही.
महिलांनी घरकामांच्या मधल्या वेळात हाताने पश्मिनाची सूतकताई करणं ही इथली परंपरा. अशी हस्तकला करणाऱ्या फहमीदासारख्यांच्या पदरात तुटपुंजी मजुरी पडते. त्यामुळे हे काम करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे.
फिरदौसा यासुद्धा श्रीनगरच्याच रहिवासी. आता त्या आपल्या कुटुंबाचं आणि घराचं हवं-नको पाहण्यात व्यस्त असतात; पण लग्न व्हायच्या आधी त्या सूतकताई करायच्या. लहान असतानाच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, "घरातली मोठी माणसं आम्हाला सूतकताई करा असं आग्रहाने सांगायची. म्हणायची, त्यातून डोक्याला काम मिळेल आणि तुमचं मन गुंतून राहील. नुसत्या कुचाळक्या करत वेळ घालवण्यापेक्षा सूतकताई करा असं त्यांचं सांगणं असायचं." फिरदौसा यांच्या दोन किशोरवयीन मुली सूतकताई करत नाहीत. त्यांना शिक्षण, घरकाम यातून वेळ मिळत नाही. शिवाय या कामातून पैसेही फारसे मिळत नाहीत.
फिरदौसा सांगतात त्यानुसार सूत कातणं हा काश्मिरी संस्कृतीचा एक भाग आहे. खास काश्मिरी नाजूकपणाचं प्रतीक असणारं नद्रू (कमळाचं देठ) आणि सूतकताई यांच्यातील परस्पर संबंध उलगडताना त्या म्हणतात : "पूर्वी स्त्रिया एकमेकींशी स्पर्धा करायच्या - कशाबद्दल; तर कमळाच्या देठातल्या तंतूइतकी नाजूक सूतकताई कोण करतंय याबद्दल..."










