ख्वाजा मोइनुद्दिन यांना आजही मतदानाचा तो दिवस आणि त्या दिवशी घातलेला कडक इस्त्रीचा कुर्ता अगदी स्पष्ट आठवतो. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक – १९५१-५२. विशीतल्या या तरुणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या छोट्याशा गावात दौडत दौडत उड्या मारत ते मतदान केंद्रावर पोचले होते. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या देशाचा श्वास नसानसात भरला होता.
७२ वर्षं उलटली. मोउनुद्दिन चाचांनी आज नव्वदी पार केली आहे. १३ मे २०२४ रोजी ते परत एकदा तसाच कडक इस्त्रीचा कुरकुरीत कुर्ता घालून घरातून बाहेर पडले. या वेळी दौडत नाही तर काठीचा आधार घेत त्यांनी मतदान केंद्र गाठलं. पावलातला जोश गेला होता आणि वातावरणातला उत्साहही.
“तब देश बनाने के लिये व्होट किया था, आज देश बचाने के लिये व्होट कर रहा हूँ,” बीड शहरातल्या आपल्या घरी ते आमच्याशी बोलत होते.
त्यांचा जन्म अंदाजे १९३२ च्या आसपासचा. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातला. मोठेपणी तहसिल कचेरीत चाचा चौकीदार म्हणून कामाला होते. पण १९४८ साली त्यांना पळून ४० किलोमीटरवरच्या बीड शहरात कुठे तरी आसरा घ्यावा लागला होता. भारतीय संघराज्य शासनाने हैद्राबाद संस्थान खालसा करून भारतात समाविष्ट केलं तेव्हा उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम.
१९४७ साली फाळणी झाली. रक्तपात झाला. काश्मीर, त्रावणकोर आणि हैद्राबाद या तीन संस्थानांनी भारतात समाविष्ट होण्यास नकार दिला. हैद्राबादच्या निजामाला स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं होतं. भारतातही नाही आणि पाकिस्तानातही जायचं नव्हतं. मराठवाड्याचा संपूर्णी इलाका तेव्हा निजामाच्या राजवटीत होता.
१९४८ च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय सैन्य हैद्राबादमध्ये घुसलं. आणि चारच दिवसांत निजाम शरण आला. अनेक वर्षांनी खुल्या झालेल्या शासन स्थापित सुंदरलाल आयोगाच्या अहवालानुसार भारत सरकारने केलेल्या कारवाईमध्ये किमान २७,००० ते ४०,००० मुसलमान मरण पावले. आणि मोइन चाचांसारख्या अनेक तरुणांना जीव मुठीत घेऊन पळून जावं लागलं होतं.
“आमच्या गावातली विहीर मढ्यांनी भरली होती,” ते सांगतात. “आम्ही पळून बीडला गेलो. तेव्हापासून हेच शहर माझं घर आहे.”









