दिवाळीला अजून दहा दिवस होते; तेव्हा मुकेश राम महम्मदपूर गावच्या आपल्या घरी परतला होता. हिमाचल प्रदेशातल्या सिमला जिल्ह्यात बांधकाम मजूर म्हणून तो काम करत होता.
दिवाळीच्या सहाव्या दिवशीची छट पूजा चुकवायची नाही या हिशेबाने ४० वर्षीय मुकेश बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातल्या आपल्या घरी परतला. बायको प्रभावती देवी आणि चार मुलं त्यामुळे एकदम आनंदात होती.
परत आल्यानंतर त्याने घरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलपूर पुराना बाजार इथल्या एका बांधकामावर मजुरीचं काम घेतलं. सकाळी ८ वाजता तो घरातून बाहेर पडायचा आणि संध्याकाळी ६ वाजता परत यायचा.
२ नोव्हेंबर २०२१ला तो उशिरा घरी परतला आणि डोकं ठणकतंय असं म्हणू लागला.
डोकेदुखीचा ठणका काही कमी झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर डोळे उघडे ठेवणंही त्याला अवघड व्हायला लागलं. कामावर जायचं म्हणून तो कसाबसा तयार झाला पण घराबाहेर पडणंही शक्य होणार नाही इतपत तो आजारी होता.
मुकेशची ही अवस्था पाहून प्रभावतीने त्याला गोपालगंज शहरामधल्या दवाखान्यात नेण्यासाठी गाडी भाड्याने घेतली. दवाखाना घरापासून ३५ किलोमीटरवर होता. “सुबेरे ले जात, ले जात, ११ बजे मौगत हो गेल (सकाळी आम्ही दवाखान्यात पोहोचेपर्यंत तो मरण पावला. ११ वाजले होते.)’’
३५ वर्षांची विधवा प्रभावती जेव्हा आपल्या पतीचा मृतदेह घेऊन घरी आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला- त्यांचं घर सील करण्यात आलं होतं. महम्मदपूर स्थानकातल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्या घरावर छापा टाकला होता.










