नारायण कुंडलिक हजारे यांना बजेट हा शब्द माहित आहे कारण ते कधीच जास्त नसतं.
“आपलं तेवढं बजेटच नाही,” अगदी चार शब्दांत नारायण काका १२ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याच्या बातमीतली हवाच काढून टाकतात.
पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटबद्दल विचारल्यावर ते बराच विचार करतात. आणि अगदी ठामपणे सांगतात, “हे असलं काही मी कधीच ऐकलेलं नाही. आजवरच्या ६५ वर्षाच्या आयुष्यात कधीच नाही.”
आणि त्यांच्याकडे 'असलं काही' माहीत होण्याचं काही साधनही नाही. “माझ्यापाशी मोबाइल फोन नाही. घरात टीव्हीसुद्धा नाही.” काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका मित्राने त्यांना रेडिओ भेट दिलाय पण त्याच्यावरसुद्धा दर वर्षी सादर होत असलेल्या या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. “आमचा अडाणी माणसाचा काय संबंध, तुम्हीच सांगा,” ते म्हणतात. ‘किसान क्रेडिट कार्ड’ किंवा ‘वाढीव कर्जमर्यादा’ वगैरे शब्द काकांच्या दुनियेतले नाहीत.
![](/media/images/2-1738822924148-MK-I_just_dont_have_that_k.max-1400x1120.jpg)
तुळजापूरचे नारायण हजारे शेतकरी आहेत आणि गाड्यावर दर हंगामात फळं विकतात. त्यांनी ‘आजवरच्या ६५ वर्षाच्या आयुष्यात’ बजेटबद्दल काहीही ऐकलेलं नाही
काका त्यांच्या हातगाड्यावर दर हंगामात असतील ती फळं विकतात. “पेरूचा हा शेवटचा बहार आहे. पुढच्या आठवड्यापासून द्राक्षं येतील आणि त्यानंतर आंबा,” काका सांगतात. धाकट्या तुळजापूरचे रहिवासी असलेले नारायण काका गेल्या तीस वर्षांपासून फळं विकतायत. गाड्यावरचं २५-३० किलो फळ विकून ३००-४०० रुपये मागे पडले तर दिवस पावला म्हणायचं. त्यासाठी ८-१० तास फिरावं लागतं.
नारायण हजारेंना बजेट माहीत नसलं तरी त्या पलिकडचं काही तरी ते नक्की जाणतात. “पैशाची काळजी करू नका. कधी वाटलं तर येऊन फळं घेऊन जात जावा. पैसे काय, द्याल नंतर,” असं म्हणत आपला गाडा घेऊन ते कामाला निघतात.