अनोपाराम सुतार यांनी आजवर एकही वाद्य वाजवलेलं नाही. पण कुठल्या लाकडापासून सुरेल वाद्य बनेल हे मात्र त्यांना अगदी पक्कं माहीत आहे. “मला लाकडाचा कुठलाही तुकडा द्या. त्याचं वाद्य चांगलं वाजणार का नाही ते लगेच सांगतो मी,” खरताल बवनणारे अनोपाराम सांगतात.
राजस्थानात लोकसंगीतात आणि भजनांसोबत वाजणारं खरताल हे एक तालवाद्य आहे. याचे चार भाग असतात. एका हातात दोन आणि दुसऱ्या हातात दोन. एक भाग अंगठ्याने पकडला जातो आणि दुसरा इतर चार बोटांनी. दोन्ही भाग एकमेकांवर आपटले की टाळी वाजवल्यासारखा आवाज येतो. या वाद्याचे दोनच बोल आहेत – ता आणि का. “कलाकार बनवाते है,” अनोपाराम सांगतात. खरताल बनवणाऱ्यांची त्यांची ही आठवी पिढी आहे.
राजस्थानी खरतालांमध्ये खंजिरीसारख्या घुंगरं नसतात. मंजीरा किंवा करतालांना मात्र घुंगरं जोडलेली असतात.
अनोपाराम त्यांच्या कामात अगदी तरबेज आहेत. ते दोन तासात एक खरताल बनवू शकतात. “पूर्वी मला एक अख्खा दिवस लागायचा,” ते सांगतात. अनोपाराम यांचं सुतार घराणं किमान २०० वर्षांपासून खरताल बनवण्याचं काम करतायत. “बचपन से यही काम है हमारा.”
ते सांगतात की त्यांचे वडील उसलाराम फार शांतपणे आणि न चिडता ही कला शिकवायचे. “मी किती तरी चुका केल्या असतील, लेकिन वो कभी चिल्लाते नही थे. प्यार से समझाचे थे.” सुतार समाजात खरताल तयार करण्याचं काम केवळ पुरुष मंडळी करतात.














