“हे सिक्स पॅक अगदी सहज तयार झालेत. मी काही कधी व्यायाम करत नाही. शाहबाझचे बायसेप्स पाहिले का?” आपल्या सहकाऱ्याकडे बोट दाखवत आदिल हसत हसत मला विचारतो.
मोहम्मद आदिल आणि शाहबाज अन्सारी मेरठच्या जिम आणि फिटनेस साहित्याच्या कारखान्यात काम करतात. जिमला जाणारे लोक आठवड्यात उचलतात तेवढं वजन हे दोघं रोजच उचलतात. त्यांच्यासाठी हा काही कुठला संकल्प नाही. उत्तर प्रदेशच्या मेरठमधल्या मुस्लिम कुटुंबातल्या अनेक तरुणांसाठी पोटापाण्याचा हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडचा हा जिल्हा क्रीडासाहित्य तयार करण्याचं मोठं केंद्रच आहे.
“काहीच दिवसांपूर्वी ही पोरं आपापल्या बायसेप्स आणि ॲब्स [पोटाचे स्नायू]ची तुलना करण्यासाठी फोटो काढत बसली होती,” मोहम्मद साकिब सांगतो. ३० वर्षांचा साकिब सूरज कुंड रोडवरच्या जिम साहित्याच्या शोरुममध्ये गल्ल्यावर बसला आहे. मेरठ शहरातला हा एक किलोमीटरचा रस्ता म्हणजे क्रीडा साहित्याची मोठी बाजारपेठ आहे आणि साकिबच्या कुटुंबाने ही शोरुम भाड्याने घेतली आहे.
“आज कसंय अगदी घरी गृहिणी वापरतात त्या डम्बेल असतील किंवा व्यावसायिक खेळाडू वापरतात ते जिमचे विविध प्रकार, सगळ्यांना आणि जिम किंवा तंदुरुस्तीसाठी क्रीडा साहित्य हवं आहे,” तो म्हणतो.
आम्ही बोलत असतानाच या रस्त्यावरून अनेक विजेवर चालणाऱ्या तीनचाकी गाड्यांची येजा सुरू असते. यांना इथे मिनी-मेट्रो म्हणतात. लोखंडी पाइप, कांबी असा कच्चा माल तसंच घरगुती वापरासाठीचं जिम आणि लोखंडी बार अशा तयार वस्तू असं सामान येऊन पडत असतं. “जिमची यंत्रं सुटी सुटी तयार केली जातात आणि इथे आम्ही त्यांची जुळणी करतो,” आपल्या शोरूमच्या काचेच्या दरवाजातून बाहेरच्या गाड्यांची आणि येणाऱ्या मालाची पाहणी करत साकिब सांगतो.





















