मार्च महिन्यातली दुपार. उन्हाची तलखी. औरापानी गावातल्या एका छोट्या चर्चच्या सफेद इमारतीत काही मंडळी जमली आहेत.

जमिनीवर गोलात बसलेल्या सगळ्यांचं एकच दुखणं आहे. सगळ्यांना रक्तदाबाचा काही ना काही त्रास आहे. उच्च तरी नाही तर कमी तरी. म्हणून ते महिन्यातून एकदा एकत्र जमतात, रक्तदाब किंवा बीपी तपासतात आणि औषधगोळ्या मिळेपर्यंत गप्पा टप्पा करतात.

“मला इकडे यायला आवडतं कारण मला इथे माझ्या मनातल्या चिंता सांगता येतात,” रुपी बघेल सांगतात. सगळे त्यांना लाडाने रुपी बाई म्हणतात. त्या ५३ वर्षांच्या आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून इथे येतायत. पोटापुरती शेती करणाऱ्या रुपी गौण सरपण आणि महुआसारखं गौण वनोपज गोळा करून चार पैसे कमावतात. रुपी बैगा आहेत आणि छत्तीसगडमध्ये त्यांची नोंद विशेष बिकट परिस्थितीतील आदिवासी समूह म्हणून करण्यात आली आहे. औरापानी बैगा बहुल गाव आहे.

बिलासपूरच्या कोटा तालुक्यात येणारं हे गाव छत्तीसगडच्या अचानकमार-अमरकंटक बायोस्फियर रिझर्व्ह (एएबीआर)मध्ये येतं. “मी पूर्वी जंगलात जाऊन बांबू आणायचे आणि झाडू बनवायचे आणि विकायचे. पण आताशा मला जास्त चालणंच होत नाही त्यामुळे मी घरीच बसून असते,” फुलसोरी लकडा सांगतात. बीपीमुळे येणाऱ्या थकव्याने आपल्या आयुष्यावर कसा परिणाम झालाय ते साठीच्या फुलसोरी सांगतात. आता त्या घरी बसून आपली शेरडं सांभाळतात, दिवसभर शेण गोळा करतात. बैगा लोक बऱ्याच गोष्टींसाठी जंगलावर अवलंबून असतात.

PHOTO • Sweta Daga
PHOTO • Sweta Daga

बिलासपूर जिल्ह्यातल्या औरापानी गावात जमलेल्या या सगळ्यांचं एकच दुखणं आहे. त्या सगळ्यांना रक्तदाबाचा म्हणजेच बीपीचा त्रास आहे. उच्च किंवा कमी. हे सगळे दर महिन्यात एकदा एकत्र भेटतात, बीपी तपासून घेतात आणि तब्येतीची काळजी कशी घ्यायची हे शिकून घेतात. (बेन रत्नाकर, जन स्वास्थ्य सहयोग क्लस्टर समन्वयक, काळी ओढणी)

एनएफएचएस-५, २०१९-२०२१ नुसार छत्तीसगडमध्ये १४ टक्के ग्रामीण जनतेला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं दिसून येतं. “एखाद्या व्यक्तीचा वरचा रक्तदाब जर १४० किंवा त्याहून जास्त असेल किंवा खालचा रक्तदाब ९० किंवा त्याहून जास्त असेल तर अशा व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे असं निदान केलं जातं,” असं एनएफएचएसमध्ये म्हटलेलं आहे.

असंसर्गजगन्य आजारांच्या लवकर निदानासाठी उच्च रक्तदाबाचं वेळेत निदान कळीचं आहे असं राष्ट्रीय आरोग्य अभियानाने सांगितलं आहे. रक्तदाब कमी व्हावा म्हणून आपल्या जीवनशैलीत कसे आणि काय बदल करायचे हे या आधारगटामध्ये सगळ्यांना शिकवलं जातं. “मैं मिटिंग में आती हूं तो अलग चीझ सीखने के लिए मिलता है. जैसे योगा, जो मेरे शरीर को मजबूत रखता है,” फुलसोरी सांगतात.

जन स्वास्थ्य सहयोग ही सामाजिक संस्था गेल्या तीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. ३१ वर्षीय सूरज बैगा तिथेच काम करतो. त्याने दिलेल्या माहितीचा उल्लेख फुलसोरी यांच्या बोलण्यात येतो. उच्च किंवा कमी रक्तदाबाचा परिणाम काय होतो हे सूरज गटाला समजावून सांगतो. आपल्या मेंदूमध्ये काही खटके आहेत त्याचा रक्तदाबाशी काय संबंध आहे हेही तो सगळ्यांना समजावून सांगतो. “आपल्या मेंदूतले हे खटके निकामी किंवा कमकुवत व्हायचे नसतील तर आपल्याला नियमितपणे औषधं घेण्याची गरज आहे तसंच व्यायामही करायला पाहिजे,” तो सांगतो.

मनोहर उरांव ८७ वर्षांचे आहेत. मनोहरकाका गेल्या १० वर्षांपासून या आधार गटाच्या बैठकांना येत आहेत. “आता माझं बीपी नियंत्रणात असला तरी माझ्या रागावर नियंत्रण मिळवायला मात्र मला फार जास्त काळ लागला.” त्यानंतर पुढे ते म्हणतात, “टेन्शन घ्यायचं नाही हे मी शिकलोय आता!”

जन स्वास्थ्य सहयोग फक्त बीपी नाही तर इतर आजारांवरही असे अनेक आधार गट चालवते. ५० गावांमध्ये मिळून एकूण ८४ गट काम करतात आणि त्यामध्ये येणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या वर आहे. काम करणारे तरुणही येतात मात्र इथे येणाऱ्यांमध्ये वयस्क मंडळींची संख्या मोठी आहे.

PHOTO • Sweta Daga
PHOTO • Sweta Daga

डावीकडेः महारंगी एक्का अशाच एका गटात येतात. उजवीकडेः बसंती एक्का गावपातळीवर काम करणारी आरोग्य कार्यकर्ती आहे. गटातल्या सदस्यांचं बीपी तपासण्याचं काम ती करते

“वृद्ध मंडळी आता काम करू शकत नाहीत म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जाण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो, त्यात ते एकाकी होतात. आणि आयुष्याच्या सरत्या काळात ते मानाने जगू शकत नाहीत,” जनस्वास्थ्य सहयोगमध्ये कार्यक्रम समन्वयक म्हणून काम करणाऱ्या मीनल मदनकर सांगतात.

याच गटाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि त्यांना आधार देण्याची गरज आहे. तसंच खाण्याबद्दलचा सल्लाही त्यांना आवश्यक असतो. “आपली काळजी कशी घ्यायची ते समजतं, भात, बटाटा वगैरेपेक्षा भरडधान्यं माझ्या तब्येतीसाठी जास्त चांगली आहेत, ते समजलं. आणि माझी औषधंही मला मिळतात इथे,”

गटाचं सत्र संपलं की सगळ्यांना कोदोची खीर दिली जाते. या खिरीची चव आवडली तर लोक आपल्या खाण्याच्या सवयी बदलतील आणि पुढच्या महिन्याच्या मिटिंगला येतील असं संस्थेच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. बिलासपूर आणि मुंगेली जिल्ह्यातल्या बहुतेकांना ‘लीन डायबेटिस’ म्हणजेच कृश व्यक्तींमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे. आणि त्याचा थेट संबंध बदलती आहारपद्धती आणि त्यामध्ये समाविष्ट झालेला रेशनवरचा पॉलिश केलेला तांदूळ याच्याशी लागतो.

“शेती आणि आहारपद्धतींमध्ये बदल झाला आहे. इथले लोक वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्यं पिकवत आणि खात होते. आणि ही धान्यं जास्त पोषक होती, आरोग्यासाठी चांगली होती. पण आता जेवण म्हणजे पॉलिश केलेला तांदूळ असं होऊन बसलंय,” मीनल सांगतात. आलेले बरेच लोक मान्य करतात की ते आता पूर्वीच्या भरडधान्यांपेक्षा गहू आणि तांदूळ जास्त प्रमाणात खातायत.

PHOTO • Sweta Daga
PHOTO • Sweta Daga

एनएफएचएस-५, २०१९-२०२१ नुसार छत्तीसगडमध्ये १४ टक्के ग्रामीण जनतेला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं दिसून येतं. आधार गटामध्ये येणाऱ्यांना जीवनशैलीतील बदल आणि योग शिकून बीपी कमी कसं करता येतं याचं प्रशिक्षण दिलं जातं

पूर्वीच्या पीकपद्धतीत आता बदल झाले आहेत. पूर्वी वेगवेगळ्या डाळी आणि तेलबिया केल्या जात होत्या. त्यातून आवश्यक प्रथिनं आणि जीवनसत्त्वं मिळत होती. पण आता तसं होत नाही. मोहरी, भुईमूग, तीळ आणि करडईसारखे पदार्थही त्यांच्या जेवणातून आता नाहीसे झाले आहेत.

बीपीची तपासणी आणि इतर चर्चा झाल्यानंतर मज्जा सुरू होते – अंग ताणण्याचे व्यायाम आणि योगासनं. कुणी विव्हळतं, कुणी कंटाळून व्यायाम करतं पण व्यायामाच्या शेवटी मात्र हसण्याचे आवाज भरून राहतात.

“एखाद्या मशीनला वंगण केलं तरच ते चालू राहते. तसंच आहे. आपल्या स्नायूंना तेलाची गरज असते. एखाद्या मोटरसायकलसारखं आपण आपलं हे इंजिनसुद्धा ऑइलिंग करून नीट ठेवलं पाहिजे,” सूरज सांगतो. आणि यावर गटातले सगळे हसून घेतात आणि हळूहळू आपापल्या घरी जायला निघतात.

Sweta Daga

ਸਵੇਤਾ ਡਾਗਾ ਬੰਗਲੁਰੂ ਦੀ ਇੱਕ ਲੇਖਕ ਅਤੇ ਫੋਟੋਗ੍ਰਾਫਰ ਹਨ ਅਤੇ 2015 ਦੀ ਪਾਰੀ ਦੀ ਫ਼ੈਲੋ ਹਨ। ਉਹ ਮਲਟੀਮੀਡੀਆ ਪਲੇਟਫਾਰਮਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹਨ ਅਤੇ ਜਲਵਾਯੂ ਪਰਿਵਰਤਨ, ਲਿੰਗ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਅਸਮਾਨਤਾ ਬਾਰੇ ਲਿਖਦੀ ਹਨ।

Other stories by Sweta Daga
Editor : PARI Desk

ਪਾਰੀ ਡੈਸਕ ਸਾਡੇ (ਪਾਰੀ ਦੇ) ਸੰਪਾਦਕੀ ਕੰਮ ਦਾ ਧੁਰਾ ਹੈ। ਸਾਡੀ ਟੀਮ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪੱਤਰਕਾਰਾਂ, ਖ਼ੋਜਕਰਤਾਵਾਂ, ਫ਼ੋਟੋਗ੍ਰਾਫਰਾਂ, ਫ਼ਿਲਮ ਨਿਰਮਾਤਾਵਾਂ ਅਤੇ ਅਨੁਵਾਦਕਾਂ ਨਾਲ਼ ਮਿਲ਼ ਕੇ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੈ। ਡੈਸਕ ਪਾਰੀ ਦੁਆਰਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ਤ ਟੈਕਸਟ, ਵੀਡੀਓ, ਆਡੀਓ ਅਤੇ ਖ਼ੋਜ ਰਿਪੋਰਟਾਂ ਦੇ ਉਤਪਾਦਨ ਅਤੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ਨ ਦਾ ਸਮਰਥਨ ਵੀ ਕਰਦੀ ਹੈ ਤੇ ਅਤੇ ਪ੍ਰਬੰਧਨ ਵੀ।

Other stories by PARI Desk
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale