कोमलला रेल्वे गाठायचीये. ती घरी निघालीये. आसामच्या राँगिया जंक्शनला.
आता परत कधीही इथे यायचं नाही, अगदी आपल्या मतिमंद आईला भेटायलाही नाही, असा निश्चय तिने मनाशी केला होता.
दिल्लीमध्ये जीबी रोडवरच्या कुंटणखान्यात राहणं आणि काम करणं त्यापेक्षा बरं होतं. ज्या घरात तिचं लैंगिक शोषण झालं तिथे जाण्यापेक्षा किती तरी बरं. ती सांगते ज्या कुटुंबाकडे तिची रवानगी करण्यात येतीये, त्या कुटुंबातच १७ वर्षांचा तिचा एक भाऊ आहे. १० वर्षांची असल्यापासून आजवर त्याने तिच्यावर किती तरी वेळा बलात्कार केलाय. “मला माझ्या भावाचा चेहराही पाहण्याची इच्छा नाहीये. तिरस्कार वाटतो त्याचा,” कोमल सांगते. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्याने तिला मारहाण केली होती. तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी द्यायचा तो. एकदा तर त्याने कसल्याशा टोकदार वस्तूने तिला मारलं. त्याचा वण आजही तिच्या कपाळावर स्पष्ट दिसतोय.
“हे कारोणे मुर घोर जाबे मोन नाइ. मोइ किमान बार कोइशु होहोतोक [म्हणून मला घरी जायची इच्छा नाहीये. किती तरी वेळा मी त्यांना सांगितलं],” कोमल पोलिसांशी झालेलं आपलं बोलणं सांगते. असं असतानाही पोलिसांनी तिला आसामच्या गाडीत बसवून दिलं. ३५ तासांचा प्रवास, कसलीही सोय केली नाही. ती नीट पोचली की नाही हे पाहण्यासाठी तिला फोनचं सिम कार्डसुद्धा दिलं नाही. तिथे गेल्यावर तिच्यावर परत हिंसा होत नाहीये ना हे पाहण्याचा कसलाही विचार त्यांनी केला नाही.
अल्पवयीन आणि तरुण मुलींची विक्री केली जाते. अशा मुलींच्या विशेष गरजा ओळखून त्यांना मदत करावी लागते. कोमललाही तशाच मदतीची गरज होती.





