“आम्ही पहिल्यांदा हैद्राबादला आलो तेव्हा मिळेल ते काम केलं. आमच्या मुलीला चांगल शिक्षण देणं एवढंच आमच्या डोळ्यासमोर होतं,” गुडला मंगम्मा म्हणतात. मंगम्मा आणि त्यांचे पती गुडला कोटय्या यांनी २००० साली तेलंगणा राज्यातील महबुबनगर हे आपलं गाव सोडलं आणि ते राज्याची राजधानी हैद्राबादला आले. तेव्हा त्यांची मुलगी कल्पना नुकतीच जन्माला आली होती.
पण हैद्राबाद शहरात त्यांच्यासाठी कसलीही दयामाया नव्हती. कुठलही दुसरं काम मिळायचं नाही तेव्हा कोटय्या हाताने मैला साफ करून चार पैसे कमवायचे. त्यांनी सांडपाण्याचे नाले साफ करायला सुरुवात केली.
कोटय्या हे चकाली समाजातील (तेलंगणामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट), पण हैद्राबादमधे त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. "आमचा पूर्वापार व्यवसाय हा धोबीकामाचा, पण आता आम्हाला फार काम मिळत नाही. बहुतेकांकडे आजकाल वॉशिंग मशीन आणि इस्त्र्या आहेत," मंगम्मा काम न मिळाल्याचे कारण सांगतात.
कोटय्यांनी बांधकाम मजूर म्हणून देखील काम केलं. "बांधकामाच्या जागा कायम आमच्या घरापासून खूप दूर असायच्या आणि यायचा जायचा खर्च यांनाच करावा लागत होता. त्यापेक्षा नालेसफाईचे काम घराच्या जवळ मिळत असल्याने तेव्हा तेच जास्त सोयीस्कर वाटलं," मंगम्मा म्हणतात. त्यांच्या सांगण्यानुसार कोटय्या आठवड्यातून तीन वेळा तरी नालेसफाईचे काम करत व त्याचे त्यांना दिवसाचे २५० रुपये मिळत.
२०१६ च्या मे महिन्यातली ती सकाळ मंगम्माना आजही अगदी स्पष्ट आठवते. कोटय्या ११च्या सुमारास घराबाहेर पडले. गटार साफ करायला निघालोय, पाण्याची एक बादली बाहेर ठेव म्हणजे आल्यावर स्वच्छ होऊनच आत येत येईन असे त्यांनी जाताना सांगितले. "माझे पती काही महानगरपालिकेचे पूर्णवेळ सफाई कामगार नव्हते. आम्हाला पैश्याची निकड होती म्हणून ते ही कामं करायचे," मंगम्मा सांगतात.














