“मी माझ्या भीतीचं वर्णन कसं करु? भीतीपोटी ह्र्दय वेगानं धडधडत असतं. माझ्या डोक्यात कायम हाच विचार सुरु असतो की मी कधी एकदा परत मोकळ्या जागेत जाईन,” खेकडे आणि मासे पकडणाऱ्या ४१ वर्षीय पारुल हालदार त्यांच्या मनात गोठून राहिलेल्या भीतीबद्दल सांगतात. खेकडे पकडण्यासाठी खेकड्यांच्या शोधात सुंदरबनातील घनदाट खारफुटीच्या जंगलात जाताना मनात अशी भीती दाटून राहिलेली असते. खेकड्यांच्या हंगामात त्या त्यांची होडी घेऊन खारफुटीच्या जंगलातील नदी-नाले आणि खाड्यांमधून खाली जातात. लपून बसलेल्या वाघांची भीती सदोदित मनात असते.
लक्सबगान गावची रहिवासी असलेल्या पारुल, त्यांची लाकडी होडी घेऊन गरळ नदीत पोहचतात, तेव्हा एक तिरका दृष्टीक्षेप जाळीदार कुंपणाच्या पलीकडे टाकतात, जिथून पुढे मरिचीझापी जंगल आहे. हे जंगल साउथ २४ परगणा जिल्ह्याच्या गोसाबा तालुक्यात, त्यांच्या गावाशेजारी आहे. पारुलचे पती, ईशर रोनोजित हालदार सात वर्षांपूर्वी वाघाने केलेल्या हल्ल्यात मारले गेले.
होडीचं वल्हं त्या होडीच्या कडांवर टेकवतात. त्या आणि त्यांची ५६ वर्षांची आई, लोखी मंडल रखरखत्या उन्हात मासे धरायला पडतात. त्यांच्या मुलीप्रमाणेच लोखी सुद्धा मासेमारी करतात.
पारुल केवळ १३ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी ईशर यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या सासरकडचे गरीब कुटुंबातले होते, पण ते कधीच मासे किंवा खेकडे पकडण्यासाठी जंगलात गेले नव्हते. “मी त्यांना समजावलं/पटवून दिलं आणि जंगलात घेऊन आले,” त्यांना आठवतं. “१७ वर्षानंतर त्यांचा याच जंगलात मृत्यू झाला.”
पारुल त्या क्षणी नि:शब्द होतात. ईशर तेव्हा ४५ वर्षांचे होते. आज आपल्या चार मुलींचा सांभाळ पारुल एकट्या करत आहेत.
घामाने चिंब झालेल्या पारुल आणि लोखी ते जड वल्हे पुन्हा ओढतात. या स्त्रिया खारफुटीच्या जंगलापासून सुरक्षित अंतर ठेवून होडी पुढे नेतात. या ठिकाणी सध्या मासेमारी बंद करण्यात आली आहे. खारफुटीचं जंगल मासेमारीसाठी एप्रिल ते जून, ३ महिने बंद केलं जातं. जेणेकरून माशांची संख्या वाढेल. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. या दरम्यान, पारुल उदरनिर्वाहासाठी त्यांच्या तलावातील मासे विकतात.












