नागराज बंदन आजही घरी शिजत असलेल्या रागी कलीचा घमघमाट विसरलेले नाहीत. अगदी दररोज त्या सुगंधाची, रागी कालीची ते आतुरतेने वाट बघत असायचे.
आज पन्नास वर्षांनंतर रागी काली बनतं
पण त्याची चव मात्र कुठे तरी हरवून गेलीये. “आजकाल जी नाचणी मिळते ना तिला तसा
सुगंधही नाही आणि तेव्हाइतकी चांगली चवही नाही,” ते म्हणतात. आताशा रागी कलीसुद्धा
अगदी क्वचित कधी बनत असल्याचं ते पुढे सांगतात.
नागराज इरुला आदिवासी आहेत आणि
निलगिरी पर्वतराजीतल्या बोक्कापुरम पाड्याचे रहिवासी आहेत. त्यांचं लहानपणच
सभोवताली नाचणी आणि इतरही अनेक भरडधान्यं पिकत असताना गेलं. रागी म्हणजेच नाचणी,
चोलम (ज्वारी), कम्बू (बाजरी) आणि सामइ (वरई). घरी खाण्यासाठी म्हणून थोडा वाटा
बाजूला ठेवून बाकी धान्य बाजारात विकलं जायचं.
नागराज मोठे झाले आणि शेतीचं पाहू
लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या वडलांच्या काळात जितकं पिकायचं
त्यामध्ये मोठी घट झाली आहे. “आजकाल आम्हाला फक्त खाण्यापुरतं पिकतंय. कधी कधी तर
तितकंही नाही,” ते पारीला सांगतात. पण तरीही ते आजही आपल्या दोन एकरांत नाचणी
पिकवतात. त्यासोबत विविध शेंगावर्गीय भाज्या, वांगी वगैरे.
इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा बदल
जाणवतोय. मारी सांगतात की त्यांच्या वडलांना १०-२० पोते नाचणी व्हायची. पण आज
मात्र २ एकरात फक्त २-३ किलो नाचणी पिकत असल्याचं ४५ वर्षीय मारी सांगतात.
नागराज आणि मारी यांचा अनुभव फार
वेगळा नाही. सरकारी आकडेवारीनुसार निलगिरीमधलं नाचणीचं उत्पादन १,३६९ हेक्टर
(१९४८-४९) वरून ८६ हेक्टर (१९९८-९९) इतकं खालावलं आहे.
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार या
जिल्ह्यात भरड धान्याखाली केवळ एक हेक्टर क्षेत्र असल्याची नोंद झाली आहे.
“मागच्या वर्षी नाचणी झालीच नाही,” नागराज सांगतात. २०२३ सालच्या पेऱ्याबद्दल ते बोलत होते. “पेरणीच्या आधी पाऊस झाला आणि नंतर झालाच नाही. त्यामुळे सगळंच बी जळून गेलं.”
इरुला शेतकरी सुरेश सांगतात की आता
नवं बी वापरायला सुरुवात केल्यापासून नाचणीची वाढ संथ गतीने व्हायला लागलीये. “शेतीच्या
भरवशावर राहणंच अशक्य झालंय,” ते सांगतात. त्यांच्या दोन्ही मुलांनी शेती करणं सोडून
दिलंय आणि ते आता कोइम्बतूरला रोजंदारीवर कामं करतायत.
पाऊसही बेभरवशाचा झालाय. “पूर्वी कसं
सहा महिने पाऊस पडायचा [मे अखेर ते ऑक्टोबर]. पण आता कधी पाऊस येईल काही सांगता
येत नाही. डिसेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडतो,” नागराद म्हणतात. पिकाचा कमी उतारा येतोय
त्याचा सगळा दोष पावसाचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. “आजकाल पावसाच्या भरवशावर
राहणं म्हणजे वेडेपणा झालाय.”
नीलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र
समजलं जातं. सह्याद्रीच्या पश्चिम घाटांमधल्या दक्षिणेकडच्या या क्षेत्राची नोंद
युनेस्कोने
जैवविविधतेने
समृद्ध
अशी केली आहे. मात्र परदेशी वनस्पतींची लागवड, उंचावरच्या दलदल
क्षेत्रामध्ये पीक लागवड तसंच इंग्रज राजवटीच्या काळात चहाचे मळे अशा सगळ्या कारणांमुळे
“या क्षेत्राच्या जैवविविधतेचं नुकसान झालं आहे” असं वेस्टर्न घाट इकॉलॉजी
पॅनेलच्या २०११ साली आलेल्या एका
शोधनिबंधात
नमूद केलं आहे.
मोयार नदीसारखे नीलगिरीतले जलस्रोत
इथून बरेच लांब आहेत. हा परिसर बोक्कापुरममध्ये येतो आणि हे गाव मुदुमलाई व्याघ्र अभयारण्याच्या
बफर झोनमध्ये येतं. त्यामुळे इथे बोअरवेल घ्यायला मनाई आहे. बोक्कापुरममध्ये शेती
करणारे बी. सिद्दन सांगतात की
वन
हक्क कायदा २००६
आल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. “२००६ च्या आधी आम्हाला
जंगलातून पाणी आणता येत होतं पण आता तर आम्हाला जंगलात जाऊ पण देत नाहीयेत,” ४७
वर्षीय सिद्दन सांगतात.
“इतक्या तलखीत नाचणी येणार तरी कशी?” नागराज विचारतात.
आपल्या शेतीतलं नुकसान भरून
काढण्यासाठी आणि पोटापाण्यासाठी म्हणून नागराज मसिनागुडीच्या पाड्यांवरच्या
शेतांमध्ये मजुरीला जातात. “मला दिवसाला ४००-५०० रुपये मिळू शकतात. पण कधी? काम
मिळालं तर,” ते म्हणतात. त्यांच्या पत्नी नागी देखील रोजंदारीवर काम करतात आणि जवळच्या
चहाच्या मळ्यांमध्ये कामाला जातात. या जिल्ह्यातल्या बऱ्याच बायांसाठी हाच
रोजगाराचा स्रोत आहे. त्यांना दिवसाला ३०० रुपये मजुरी मिळते.
*****
आमच्यासारखंच इथल्या हत्तींनाही नाचणी आवडते बरं, शेतकरी चेष्टेत सांगतात. “नाचणीच्या सुगंधानेच हत्ती आमच्या रानांमध्ये येऊन पोचतात,” सुरेश सांगतात. बोक्कापुरम पाडा सिगुर हत्ती मार्गा मध्ये आहे. आणि हत्ती इथूनच पूर्व घाटांमधून पश्चिम घाटांकडे प्रवास करतात.
या आधी, त्यांच्या तरुणपणी हत्तींचा
वावर इतका जास्त नव्हताच. “हत्तींना तरी आम्ही काय दोष देणार?” सुरेश म्हणतात. “पाऊसच
नाही. जंगलं देखील सुकत चाललीयेत. हत्ती तरी काय खाणार मग? त्यामुळे त्यांना
जंगलाच्या बाहेर पडून अन्न शोधावं लागतं.” २००२ ते २०२२ या काळात नीलगिरीमध्ये ५११
हेक्टरवरचं वनक्षेत्र नष्ट झाल्याची नोंद
ग्लोबल
फॉरेस्ट वॉच
ने केली आहे.
बोक्कापुरमपासून काही किलोमीटर
अंतरावर मेलभूतनाथम पाड्यावर रंगय्यांचं शेत आहे. ते सुरेश यांच्या म्हणण्याला
दुजोरा देतात. पन्नाशीचे रंगय्या एक एकरात शेती करतात पण त्या जागेचा
त्यांच्यापाशी पट्टा नाही. “आमच्या कुटुंबाने पार १९४७ च्या आधीपासून इथे शेती
केलीये,” ते सांगतात. रंगय्या सोलिगा आदिवासी आहेत आणि त्यांच्या शेतापाशी असलेल्या
सोलिगा मंदिराची व्यवस्था पाहतात.
हत्तींच्या त्रासामुळेच रंगय्यांनी
नाचणी आणि इतर भरड धान्यं घेणं बंद केलं होतं. “ते [हत्ती] येऊन सगळंच खाऊन जायचे,”
ते सांगतात. “एकदा का हत्ती तुमच्या शेतात येऊन नाचणी खाऊन गेला, की तो परत परत तिथे
येणारच.” अनेक शेतकऱ्यांनी केवळ याच कारणामुळे नाचणी घेणं बंद केलं असल्याचं ते
सांगतात. त्या ऐवजी रंगय्या आता कोबी आणि इतर शेंगावर्गीय भाज्यांची लागवड करतात.
शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी
लागते. आपल्याला झोप लागली तर हत्ती आपल्यावर हल्ला करतील याची भीती मनात असते. “शेतकरी
नाचणी करत नाहीयेत कारण त्यांना हत्तींची भीती आहे.”
इथले शेतकरी म्हणतात की त्यांनी आजवर
कधीही बाजारातून नाचणी विकत घेतली नाहीये. पिकवायचं आणि खायचं असंच त्यांचं जगणं
होतं. आता नाचणी पिकत नाही त्यामुळे खाल्लीही जात नाही.
एका स्थानिक सामाजिक संस्थेने त्यांना आणि इतर शेतकऱ्यांना हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांना अटकाव करता यावा म्हणून सौरऊर्जेवर चालणारी कुंपणं दिली आहेत. त्यानंतर अर्ध्या रानात रंगय्या नाचणी घेतायत. उरलेल्या भागात भाजीपाला. गेल्या हंगामात शेंगा आणि लसणाच्या विक्रीतून त्यांची ७,००० रुपयांची कमाई झाली.
नाचणीचा पेरा घटल्यामुळे लोकांच्या
खाण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या आहेत. “भरड धान्यांचा पेरा कमी झाला आणि
तेव्हापासून आम्हाला रेशनच्या दुकानावर धान्य विकत घेण्याची पाळी आली – आम्हाला हा
प्रकारच कधी माहीत नव्हता,”
ललिला मुकासामी सांगतात. त्या एका सामाजिक संस्थेमार्फत गावपातळीवरचं काम पाहतात.
रेशनच्या दुकानावर जास्त करून गहू आणि तांदूळच मिळतो, त्या सांगतात.
“माझ्या लहानपणी मी दिवसातून तीन
वेळी रागी कली खायचे, पण आजकाल क्वचित कधी. आता सगळं अर्सी सापट [भाताचे पदार्थ].
त्यात वेळ पण जास्त जात नाही,” ललिता सांगतात. इरुला आदिवासी असलेल्या ललिता
अनईकट्टी गावच्या रहिवासी आहेत आणि इथल्या लोकांबरोबर गेल्या १९ वर्षांपासून काम
करतायत. आजकाल आजारपणं वाढण्याचं कारण लोकांच्या खाण्यात झालेले बदल असल्याचं
त्यांचं निरीक्षण आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रीसर्च
म्हणजेच भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थानच्या एका
अहवालानुसार
,
या भरड धान्यांमधले “काही पोषक द्रव्यं, जीवनसत्त्वं, खनिजं आणि स्निग्ध आम्लं यांचा
उपयोग कुपोषणाशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी होतो तसंच शरीर-मनाची झीज झाल्याने होत असलेल्या काही आजारांना
अटकाव करण्यासाठीही होतो.”
तेलंगणामध्ये असलेली ही संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषदेशी संलग्न आहे.
“रागी आणि तेनई म्हणजे आमचं रोजचं खाणं
होतं. सोबत मोहरीची पानं आणि काट कीरइ (जंगलात मिळणारा पालक) च्या भाजी असायची,”
रंगय्या सांगतात. इतक्यात हे पदार्थ खाल्ल्याचं त्यांना आठवतही नाही. “आजकाल जंगलात
जाणंच चक्क बंद झालंय.”
कीस्टोन फौंडेशनच्या श्रीराम परमसिवन
यांची या वार्तांकनासाठी मदत झाली. त्यांचे आभार.