सिद्दू गावडेंना जेव्हा शाळेत जायचं होतं तेव्हा आई-वडलांनी त्यांना ५० मेंढरांमागे पाठवलं. कुटुंबातल्या, शेजारपाजारच्या सगळ्यांप्रमाणे त्यांनी देखील आपला पूर्वापार चालत असलेला व्यवसाय सुरू ठेवावा, मेंढरं राखावी अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शाळेची पायरी काही ते चढलेच नाहीत.
सिद्दू गावडे (ज्यांचा उल्लेख मी आजोबा असा करणार आहे) धनगर आहेत. शेरडं आणि मेंढरं पाळणारे धनगर महाराष्ट्रात भटक्या जमातींमध्ये गणले जातात. वर्षातले जवळपास सहा महिने जनावरांना चारणीला घेऊन जाणारा हा समाज आहे.
उत्तर कर्नाटकाच्या कारदगा या आपल्या गावापासून शंभरेक किलोमीटरवर आपलं जितराब चारणीला घेऊन गेलेल्या लहानग्या सिद्दूने त्याच्यासोबतच्या एका मेंढपाळाला दोऱ्याने काही तरी विणताना पाहिलं. “मला भारी वाटलं ते.” त्या वयस्क धनगराने इतकी सुंदर ‘जाळी’ विणली होती ती त्यांना आजही लक्षात आहे. पांढऱ्या धाग्याची ही जाळी विणून होईपर्यंत शेंगदाण्याच्या टरफलाच्या रंगाची झाली होती.
अगदी अचानक झालेली ही भेट पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. जाळी विणायला तर ते शिकलेच पण पुढची जवळपास ७४ वर्षं त्यांनी ही कला जपली आणि अजूनही त्यांचे हात थांबलेले नाहीत.
जाळी म्हणजे सुती धाग्यांची हाताने विणलेली मोठ्या बटव्यासारखी एक पिशवीच आहे म्हणा ना. खांद्याला अडकवतात ही जाळी. “चारणीला जाणाऱ्या जवळपास प्रत्येक धनगराच्या खांद्याला तुम्हाला जाळी अडकवलेली दिसेल,” आजोबा सांगतात. “यात बगा, दहा भाकरी आन् एक जोड कपडे राहतात. शिवाय पान-सुपारी, चुना, सगळं राहतंय.”
जाळी विणायची तर सगळं एका मापात करावं लागतं. त्यासाठी हे मेंढपाळ कुठलीही पट्टी किंवा इतर काही उपकरणं वापरत नाहीत त्यावरूनच त्यांचं कसब लक्षात यावं. “एक वीत आन् वर चार बोटं असावी,” आजोबा सांगतात. त्यांनी विणलेली प्रत्येक जाळी किमान १० वर्षं तरी टिकतेच. “आता पावसात भिजाया नको. उंदरांना बी लय आवडती कुरतडायला. तेवढं ध्यान ठेवावं लागतंय.”


















