गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगर उतारांवर स्लेजमध्ये पर्यटकांना बसवणं आणि वेगाने खाली आणणं हे अब्दुल वहाब ठोकर यांचं दर वर्षीचं काम. पण, १४ जानेवारी २०२४ रोजी आपल्या या ढकलगाडीवर बसलेल्या ठोकर यांच्या चेहऱ्यावर निराशा सोडून दुसरं काही नाही. समोरचं दृश्य धक्कादायक. बर्फच नसलेले ओकेबोके आणि मातकट डोंगर.
“चिला-इ-कालां [हिवाळ्याचं टोक] आहे पण गुलमर्गमध्ये बर्फाचा पत्ता नाही,” ४३ वर्षीय ठोकर सांगतात. ते गेली २५ वर्षं या बर्फात स्लेज ओढतायत आणि हा असा हिवाळा त्यांनी पहिल्यांदा पाहिलाय. “असंच सुरू राहिलं तर आम्ही सगळे कर्जाच्या खाईत जाणार,” ते चिंतेने म्हणतात.
बर्फाने आच्छादलेल्या गुलमर्गच्या पर्वतरांगा जगभरातल्या लाखो पर्यटकांनी फुलून गेलेल्या असतात. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या गुलमर्गचं अर्थकारण आणि इथल्या २००० लोकांची उपजीविका या पर्यटनावर विसंबून आहे. ठोकर यांच्यासारखे काही जण बाहेरून कामासाठी इथे येतात.
बारामुल्लाच्या कालनतारा गावाचे रहिवासी असलेले ठोकर दररोज मिळेल त्या वाहनाने ३० किमी प्रवास करून गुलमर्गला येतात, कामाच्या शोधात. “सध्या मला कुणी गिऱ्हाईक मिळालं तरी १५०-२०० च्या वर कमाई होत नाही. कारण बर्फातली रपेट बंद झालीये,” ते सांगतात. “सध्या आम्ही पर्यटकांना फक्त गोठलेल्या पाण्यावरून फिरवून आणतोय.”
“हिवाळ्यामध्ये गुलमर्ग म्हणजे एक जबरदस्त अनुभव असल्याचं जम्मू काश्मीरची अधिकृत वेबसाइट म्हणते, बर्फाने आच्छादलेले हे डोंगर म्हणजे स्कीइंगसाठी नंदनवन. इथल्या डोंगरांचे उतार नैसर्गिक आहेत, त्यामध्ये कसलाही फेरफार केलेला नाही आणि अगदी पट्टीच्या स्की करणाऱ्यांनाही मोठं आव्हान देतात!’”













