माझी आई मला नेहमी म्हणायची, “कुमार मी ही माशाची पाटी हातात घेतली नसती ना तर आपण आज जिथवर आलोय ते झालंच नसतं.” मी झालो त्यानंतर एक वर्षाने तिने मच्छी विकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर माझं सगळं आयुष्य माशांनी भरून गेलंय.
घरात मासळीचा वास भरून राहिलेला असायचा. कोपऱ्यात सुकटीची एक पिशवी लटकवलेली असायची. पहिल्या पावसात रोहू मासा यायचा आणि अम्मा त्याचं कालवण करायची. हा मासा चवीला तर मस्तच असतो पण त्याने सर्दीसुद्धा जाते. अम्मा मांगूर, मरळ किंवा सेलप्पी (चिलापी) माशाची आमटी करायची तेव्हा अख्ख्या घरात त्याचा घमघमाट पसरायचा.
लहान असताना मासे धरायचे आहेत म्हणून मी कितीदा तरी शाळा बुडवली असेल. त्या काळी अख्ख्या मदुरई जिल्ह्यात सगळीकडेच पाणी असायचं. जवाहरलालपुरम भागामध्येही विहिरी, नद्या, तळी आणि तलाव होते. मी आणि माझा आजा एका तळ्यावरून दुसऱ्या तळ्यावर जायचो. एक जाळी असायची ती पाण्यात पसरायची, वर ओढायची आणि मासे धरायचे. आम्ही ओढ्यावर जायचो आणि आमिष लावून मासा गळाला लावायचो.
आम्ही ओढ्यावर जाऊ नये म्हणून अम्मा आम्हाला भुताखेताच्या गोष्टी सांगायची. पण तळ्यात कायम पाणी वाहतं असायचं आणि आम्ही सदैव पाण्यापाशीच असायचो. मी गावातल्या इतर मुलांबरोबर मासे धरायला जायचो. मी दहावीत होतो तेव्हा पाणी कमी व्हायला लागलं. तळी आटली आणि त्याचा शेतीवरही परिणाम झाला.
आमच्या गावात, जवाहरलालपुरममध्ये तीन तळी आहेत – एक मोठं तळं, एक छोटं आणि मरुदनकुलम तळं. माझ्या घराजवळच्या मोठ्या आणि छोट्या तळ्याचा लिलाव होतो आणि गावातल्या लोकांना त्याचे हक्क मिळतात. त्यात ते माशाचं बी टाकतात आणि त्यावर आपलं पोट भरतात. ताई (माघ, जानेवारी मध्य – फेब्रुवारी मध्य) या महिन्यात तळ्यातले मासे धरतात. हा माश्याचा हंगाम मानला जातो.
माझे वडील तळ्यातले मासे विकत आणायला जायचे तेव्हा मीही त्यांच्या बरोबर जायचो. सायकलला मागे एक खोकं बांधलेलं असायचं आणि मग मासे विकत घेण्यासाठी आम्ही एका गावाहून दुसऱ्या असं भरपूर फिरायचो.


































