तीसेक वर्षांपूर्वी संजय कांबळेंना बांबूचं काम शिकायचं होतं पण शिकवायला कुणीच तयार नव्हतं. आणि आज अस्ताला चाललेली ही कला सगळ्यांनी शिकवायची त्यांची इच्छा आहे तर शिकायलाच कुणी पुढे येत नाही. “काळाचा महिमा आहे, दुसरं काय?” पन्नाशीचे संजय दादा सांगतात.
आपल्या एक एकर रानातल्या बांबूपासून ते प्रामुख्याने इरली तयार करतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात भातशेती करणारे शेतकरी बांबूपासून तयार झालेलं इरलं पावसापासून संरक्षण म्हणून वापरतात. “वीसेक वर्षांपूर्वी शेतात काम करताना प्रत्येक शेतकरी इरलं वापरत होता कारण शाहूवाडी तालुक्यात पाऊस लई होता,” केरले गावचे संजय दादा सांगतात. ते स्वतः देखील शेतात काम करत असताना इरलं वापरायचे. हा एक प्रकारचा रेनकोट किमान सात वर्षं टिकतो आणि त्यानंतरही, “अगदी सहज दुरुस्त करता येतो हो,” ते म्हणतात.
पण काळ बदलला.
गेल्या २० वर्षांत म्हणजे २००३ ते २०२३ या काळात कोल्हापूर जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या पावसाचं प्रमाणच कमी होत गेलंय. १३०८ मिमी पडणारा पाऊस आता ९७३ मिमीवर आला आहे.
“पाऊस इतका कमी होईल आणि माझी ही कलाच पडद्याआड जाईल, कुणाला वाटलं होतं?” संजय दादा विचारतात.
“जून ते सप्टेंबर हा आमचा शेतीचा हंगाम कारण इथली शेती आजही पावसावर अवलंबून आहे,” दादा सांगतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये पाऊस लहरी झाला असल्यामुळे अनेक जण शेती सोडून पुण्या-मुंबईला कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. तिथे कुठे हॉटेलमध्ये, खाजगी बस कंपन्यांमध्ये, गवंडी म्हणून, रोजंदारीवर तर कुठे पथारी टाकून काही विक्री करणं अशी कामं ते करतायत. किंवा राज्यभरात इतर ठिकाणी शेतात मजुरीला देखील जातायत.


















