आम्ही तिला भेटलो तेव्हा तिचं वय होतं १०४. आतल्या खोलीतून बाहेर येताना मदतीसाठी पुढे आलेले हात झटकत ती आमच्यासमोर येऊन बसली. आपली काठी सोडता इतर कुठलाही आधार भबानी दीदाने कधी घेतला नाही. त्या वयातही चालणं, बोलणं, उभं राहणं... सगळं स्वतःच्या मर्जीने. आणि खरं तर पश्चिम बंगालच्या पुरुलियाच्या चेपुआ गावातल्या तिच्या मोठ्या खटल्यातल्या अनेक पिढ्याच तिच्यावर विसंबून होत्या. शेतकरी आणि घर चालवणारी ही कारभारीण त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती.
स्वातंत्र्यसैनिक भबानी महातो २९ ऑगस्टच्या मध्यरात्री कधी तरी झोपेतच हे जग सोडून गेल्या. वय १०६य भबानी दीदा गेली आणि माझ्या पेंग्विन इंडिया प्रकाशित द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियाज फ्रीडम (मराठी आवृत्तीः अखेरचे शिलेदारः भारतीय स्वातंत्र्याचं पायदळ, मधुश्री प्रकाशन) या माझ्या पुस्तकातले चौघंच आता आपल्यासोबत उरले. खरं तर पारीवरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या दालनातल्या अलौकिक अशा व्यक्तिमत्वांमध्येही उठून दिसणारी व्यक्ती म्हणजे भबानी दीदा. चार तास आमच्याशी बोलल्यानंतरही स्वातंत्र्यलढ्याशी आपल्या काडीचाही संबध नाही असं सांगणारी या सगळ्यांमधली ती एकटीच. “माझा त्या लढ्याशी किंवा तसल्या कशाशीही काय संबंध?” मार्च २०२२ मध्ये आम्ही पहिल्यांदा तिला भेटायला गेलो तेव्हा ती आम्हाला म्हणाली होती. वाचाः भबानी महातोः क्रांतीची धगधगती चूल








